कृष्णाकांठ४२

आम्हां चळवळीत काम करणाऱ्यांनाही हे एक अनोखे चित्र होते. तलवारी शिवाय राज्य कसे मिळणार, असा जो प्रश्न विचारला जात होता, त्याला हे खास उत्तर होते, असे म्हटले, तरी चालेल. जनआंदोलनातून एकदा का ही नवी शक्ती निर्माण केली व सरकारला असलेल्या सहकार्याचा हात काढून घेतला, की राज्य कोलमडू शकते, हा तर गांधीजींच्या असहकाराचा मूलमंत्र होता, आणि त्याचे येथे प्रात्यक्षिक चालू होते. आमच्या जिल्ह्यामध्ये बिळाशी भागात घडलेल्या या प्रयोगाचा जनमानसावर फार मोठा प्रभाव पडला आणि कायदेभंगाच्या चळवळीला उत्तेजनच मिळाले.

सरकारी प्रचारातून त्याला बंड हे नाव अशासाठी दिले गेले, की त्यामुळे तेथील जनतेवर अत्याचार करायला सरकारला पुढे सबब मिळावी. आणि शेवटी घडलेही तसेच. सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे शेकडो पोलिस त्या भागामध्ये पाठविले गेले. गावागावांतून पोलिसांनी लोकांना दमदाटी देऊन भयभीत करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या घरांत शिरून त्यांना हाणामारी करण्याचाही उपद्व्याप केला. नाही म्हटले, तरी अशा संघटित पोलिस अत्याचाराचा लोकांच्या मनावर भीतिदायक परिणाम होतोच. ते तेथेही घडले. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची बातमी मात्र सरकारने प्रसिद्ध होऊ दिली नाही. तेथले काही कार्यकर्ते अधूनमधून कराड-सातारला येत असत. त्यांच्याकडून ह्या हकीकती समजू लागल्या. श्री. चरणकर आणि त्यांचे सहकारी यांना पकडून तरूंगात ठेवून दिले होते. इतर भागाशी त्या लोकांचा संबंध तोडला होता. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या मनात त्या भागातील लोकांच्याविषयी चिंता निर्माण झाली.

महिना, पंधरा दिवस जाऊ दिल्यावर, यासंबंधी काही तरी केले पाहिजे, याचा विचार करण्यासाठी कराडला श्री. पांडूआण्णा शिराळकर यांच्या माडीवर निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली. सातारहून आलेल्या एका वकिलांनी बिळाशीच्या भागातील दडपशाहीची सर्व वस्तुस्थिती सांगून एक गंभीर चित्र उभे केले. तेथल्या लोकांना दिलासा देण्यासाठी व आपण त्यांच्याबरोबर आहोत, हे दाखविण्यासाठी कुणी तरी प्रत्यक्ष त्या भागात जाऊन आले पाहिजे, असे सुचवले. सूचना रास्त होती आणि त्याचा विचार कार्यकर्त्यांत सुरू झाला. त्यातून अशी कल्पना निघाली, की दोन तरुण कार्यकर्त्यांना त्या भागात पाठवावे आणि शक्य झाले, तर बिळाशीमध्ये त्यांनी एक सभा घ्यावी. कार्यकर्ते कोण असावेत, अशी जेव्हा चर्चा झाली, तेव्हा राघूआण्णा लिमये आणि मी अशी दोघांनी जायची तयारी दाखविली. आमच्या पुढाऱ्यांच्या पुढचा प्रश्न सुटला. आणि आमच्या भेटीचा तपशील आमचा आम्हीच ठरवून, काय झाले, त्याचा रिपोर्ट जिल्ह्याच्या वरिष्ठांना कळवावा, असा निर्णय झाला.

चार दिवसांच्या आत राघूआण्णा लिमये आणि मी बिळाशीच्या भागात जाण्यासाठी एका सकाळी निघालो. आम्हांला आमच्या प्रवासासाठी व इतर खर्चासाठी काही थोडे पैसे दिले होते. एक -दोन दिवस पुरेल एवढे खाण्याचे साहित्य जवळ घेऊन आम्ही निघालो होतो.
 
कराड ते पेठनाका हा प्रवास आम्ही सर्व्हिस मोटारने केला व तेथे उतरलो. नेहमीच्या रस्त्याने बिळाशीपर्यंत जाणे आम्हांला शक्य नव्हते. तेव्हा पेठपासून बिळाशी हा प्रवास आम्हांला मधल्या वाटेने करावा लागणार होता.

आम्ही कोण आहोत आणि कुठे चाललो आहोत, याची माहिती कुणालाही द्यायची नव्हती. पण त्या भागातल्या काही कार्यकर्त्यांची नावे व त्यांना विश्वास पटेल, असा परवलीचा शब्द आमच्याजवळ दिला गेला होता. या सर्व शिदोरीवर आमची बिळाशीची यात्रा आम्ही करणार होतो. पेठपासून मधल्या आडरस्त्याने चार-दोन डोंगर ओलांडून बिळाशीला पोहोचायचे होते. त्याप्रमाणे आम्ही आमचा प्रवास सुरू केला. मधल्या वाटेने निदान तीस-पस्तीस मैलांचा हा प्रवास होता.