कृष्णाकांठ४०

''तुझे शिक्षण बुडेल, ही मला चिंता आहे''. असे आईने मला जरूर म्हटले होते. परंतु मी जे करतो आहे, त्यापासून मागे वळविण्याचा तिने प्रयत्न मात्र केला नाही. तिने सांगितले,
''महात्मा गांधींचे काम करतो आहेस, तुला नको कसे म्हणू मी? पण तुझा थोरला भाऊ सरकारी नोकरीत आहे. तो नाराज होणार नाही, याची काळजी घे.''
तिचे म्हणणे खरे होते. माझे थोरले बंधू जे सरकारी नोकरीत होते, त्यांना माझे हे राजकीय काम बिलकूल पसंत नव्हते. त्यांनी एकदा मला स्पष्ट बोलूनच दाखविले होतेः ''तुझ्या या उद्योगामुळे केव्हा तरी माझी नोकरी जाणार नि आपण सर्वजण उघडे पडणार''.

पण मी त्यांच्या बोलण्याची फारशी काळजी केली नाही आणि माझे काम मी तसेच चालू ठेवले.

ह्या वेळेपर्यंत चळवळीच्या वातावरणाने, नुसते कराडच नव्हे, तर पुरा कृष्णाकाठ भारून गेला होता. गावोगावी सभा होत. बाहेरचे मोठे मोठे कार्यकर्ते सभेसाठी येत, तिरंगी झेंड्याच्या मिरवणुका निघत. आता ही चळवळ काही शहरापुरती मर्यादित राहिली नव्हती. मी कराड तालुक्यातल्या गावागावांमध्ये माहीत झालो होतो. मला लोक बोलवीत असत. सभेमध्ये मी ब-यापैकी बोलत असे. त्यामुळे माझे कौतुक होत असे.

कराड शहरामध्ये नित्यनियमाने सकाळी प्रभात-फेरी काढण्याचे काम मी तसेच चालू ठेवले होते. आणि एक दिवस प्रभात-फेरीचे काम करणा-या आम्हां दहा-पंधरा मंडळींवर खटल्याचे समन्स लागले. आणि कोर्टाचे निमंत्रण आले. आम्हांला आमच्या गावच्या वकील मंडळींनी सल्ला दिला, की ही प्रभात-फेरीची केस आपण कोर्टात लढवली पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही कायदेशीररीत्या ती केस कोर्टात लढवावी, अशा निर्णयाला आलो. त्यावेळी कराडचे एक काँग्रेसभक्त वकील श्री. वामनराव फडके यांनी आमचे वकीलपत्र घेतले. आणि ही केस सुरू झाली. मोठी मजेदार केस होती. वामनराव मोठ्या विनोदी भाषेत सरकारी साक्षीदारांच्या साक्षी घेत असत. पुण्याच्या दैनिक 'ज्ञानप्रकाश'मध्ये मी या प्रभात फेरीच्या खटल्याचा सविस्तर वृतांत प्रसिद्धीसाठी पाठवत असे. वर्तमानपत्रात त्याचे वृत्तांत आले, की पोलिस चौकशी करीत असत, की या सर्व बातम्या देतो कोण? पण त्यांना हे माहीत नव्हते, की चळवळ सुरू झाल्यापासून महत्त्वाच्या राजकीय चळळीची बातमी द्यायचे काम एक बातमीदार म्हणून 'ज्ञानप्रकाश' च्या संपादकांशी मीच पत्रव्यवहार करीत होतो. १९३१ च्या मध्यापर्यंत जवळजवळ वर्ष, दीड वर्ष वृत्तपत्र-बातमीदार म्हणून मी 'ज्ञानप्रकाश' च्या ऑफिसशी संपर्क ठेवला होता. मी लिहिलेली अनेक बातमीपत्रे 'ज्ञानप्रकाश' मधून प्रसिद्ध झाली होती. मी काही त्यांचा अधिकृत बातमीदार नव्हतो, त्यामुळे ते 'एका बातमीदाराकडून' असे त्या वृत्तावर लिहीत आणि तो प्रसिद्ध करीत. हे सहज आठवले, म्हणून ही गोष्ट आज मी प्रथमच बोलतो आहे.

प्रभात-फेरीची केस चालू असतानाच काहीतरी निमित्ताने पोलिसांनी मला बोलवून पोलिस कस्टडीत ठेवून दिले. आणि 'तुझ्यावर केस भरणार आहोत. चौकशी करतो आहोत', अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. पुढे नक्की काय झाले, मला माहीत नाही. परंतु त्यांनी मला काही न करता सोडून दिले.

मी माझा प्रभात-फेरी काढण्याचा व बाहेरगावी सभेला जाण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. कराड तालुक्यात या वेळी या चळवळीला दोन-तीन केंद्रे बनली होती. मसूर, इंदोली आणि तांबवे. या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे मसूरचे राघूआण्णा लिमये, डॉक्टर फाटक, विष्णुमास्तर निगडीकर, सीतारामपंत गरूड, त्याचप्रमाणे इंदोलीचे दिनकरराव निकम आणि त्यांचे साथी. तर तांबव्याला आमचे मित्र काशिनाथपंत देशमुख यांनी आपल्याभोवती कार्यकर्त्यांचा एक मोठा संच उभा केला होता. आणि जंगल-सत्याग्रहाचा एक मोठा कार्यक्रमही घडवून आणला होता. तेथली काही मंडळी जेलमध्येही गेली होती.