पण आईने त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून, मला उचलून विठ्ठलाच्या पायांवर घातले आणि मग आम्ही तेथून परतलो.
त्यानंतर मी अनेक वेळा पंढरपूरला गेलो आहे. पण माझ्या या पहिल्या दर्शनाची आठवण मी विसरत नाही. नावलौकिक मिळाल्यानंतर, सत्ताधारी झाल्यानंतर, मी विठ्ठलाचे निवांत दर्शन अनेक वेळा केले आहे. पण खेकसणा-या बडव्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, आईने उचलून विठ्ठलाच्या पायांवर जे घातले, त्याची अपूर्वाई मला नेहमीच जास्त वाटत आली आहे. गर्दीतले ते चार-दोन दिवस, चंद्रभागेच्या वाळवटांत पडलेले ते भजनाचे फड आणि तेथे चाललेली मनसोक्त भजने, त्यांचे ते ठराविक आवाज आणि चित्र आजही माझ्या डोळ्यांसमोर येतात. नवल वाटते, की असे हे शेकडो वर्षे पंढरपूरला चालू राहिले आहे.
पुढे पुढे, मी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो, यामध्ये श्रद्धेचा भाग किती, असे लोक मला विचारीत. मी त्यांना नेहमी सांगत आलो, की ''मी कुठल्या एका दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे, असे कधी मानत नाही. परमेश्वर म्हणून कुणी एक व्यक्ती कुठे बसून आहे आणि सर्व जग चालविते आहे, असे माझे मत नाही. परंतु आपल्याला न समजणारी अशी एक जबरदस्त शक्ती आहे व तिचे अस्तित्व मानणे आवश्यक आहे, त्याशिवाय अनेक गाष्टींचा उलगडाच होत नाही.''
बुद्धिवादाने, ईश्वर आहे, हे सिद्ध करता येत नाही; तसेच तो नाही, हेही सिद्ध करता येत नाही, म्हणून ज्या ठिकाणी शेकडो वर्षे समाजपुरुष नतमस्तक होत आला, तेथे नतमस्तक होणे मी श्रेयस्कर मानतो. मंदिरात जाण्याच्या पाठीमागची माझी भावना हीच आहे. याच भावनेने मी तुळजापूरला जातो, प्रतापगडला जातो. यामध्ये देवभोळेपणाचा भाग नसतो. परंतु हे करण्याने माझ्या मनाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभते, ही गोष्ट मी कबूल केली पाहिजे.
अशा तऱ्हेने कालक्रमणा चालू होती. माझ्या कुटुंबातील आई-भावांच्या सुखदुःखाची साथ, माझे कार्य, छंद आणि वाचन यांमध्ये मी वाढत होतो. परंतु एका छंदाबद्दल सांगावयाचे राहून गेले. आणि तो म्हणजे नाटकांचा.
महाराष्ट्रातील इतर गावांसारखेच आमच्या कराडलाही नाटकांचे वेड होते.
आमच्या वेळी कराडात गणेशोत्सवात नाटकांचे प्रयोग करणारे दोन-तीन गट होते. पैकी रविवार पेठेतील एक व शनिवार पेठेतील दुसरा एक वेगळा गट होता. गणेशोत्सवात ते हौसेने पौराणिक आणि ऐतिहासिक नाटके बसवीत असत. उघड्या रस्त्यावर स्टेज बांधून तेथे ही नाटके होत. हजारो माणसे जमत. तेव्हा लाऊड-स्पीकरची व्यवस्था नव्हती. स्पष्टपणे ऐकू येत नसे, तरीसुद्धा माणसे शांतपणे बसून राहत असत.
मी तीन-चार वर्षे तरी ओळीने ही नाटके आवडीने पाहत होतो. नाटकातले बरेवाईट मला हळूहळू समजायला लागले. नाटकातील काम करणा-या लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या. त्यामुळे माझे स्नेहसंबंध वाढत गेले. मी गावात जवळ-जवळ सर्वांच्या ओळखीचा झालो होतो.