कृष्णाकांठ१६२

जिल्ह्यात जाणे शक्य नव्हते. म्हणून मी एक-दोन आठवडे मुंबईची भेट ठरवली. मी जवळ जवळ तीन-चार महिन्यांनी मुंबईला येत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील जे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला होते, त्यांची भेट घेणे मला अतिशय उपयुक्त वाटले. जिल्ह्यातल्या पोलिसांच्या दडपशाहीमुळे बरेचसे प्रमुख कार्यकर्ते मुंबईस मुक्काम ठोकून होते. मुंबई शहर, तसे म्हटले, तर भूमिगतांचे मायपोट होते. येथे गुप्त राहण्याची सोय करणे सोपे होते. तसेच आर्थिक दृष्ट्या संरक्षण देणारी माणसे होती. अनेकविध मंडळींचा संपर्क राहत असे. अशा चळवळीचे केंद्र मुंबई शहर करणे हे फार सोईस्कर होते. पत्री सरकारची चळवळ म्हणून जी पुढे प्रसिद्ध झाली, तिचा हा संक्रमण-काळ होता. जिल्ह्यातील चळवळीच्या एकंदर स्वरूपामध्ये होत असलेला बदल अपरिहार्य आहे, असे माझ्या मित्रमंडळीजवळ मी कबूल केले. परंतु कुणी तरी चळवळीच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कसोशीने नजर ठेवली पाहिजे, असे विशेषत: श्री. किसन वीर यांच्याशी मी बोललो. श्री. आबांनाही ही गोष्ट मान्य होती आणि योग्य वेळी जिल्ह्यात जाऊन हे काम करण्याचे त्यांनी ठरविले होते.

माझी स्वत:ची मन:स्थिती मात्र घरगुती प्रश्नांनी व्यापून गेली होती आणि आतापर्यंत आलेल्या अडचणींमध्ये एक नवीनच मानसिक यातना निर्माण झाली. ती म्हणजे सौ. वेणूबाईच्या प्रकृति-अस्वास्थ्याची. आमच्या दादांच्या मृत्यूपूर्वी थोडेच दिवस तिची सुटका झाली होती आणि ती त्यांच्या शेवटच्या आजारात त्यांच्या जवळ बसून होती. आतापर्यंत आलेल्या संकटांनीच ती मनाने हलून गेली होती. त्यात दादांचा आठ-दहा दिवसांच्या आजाराने झालेला मृत्यू तिने शेजारी बसून पाहिला होता. त्यामुळे दादांचा मृत्यू झाला, त्या क्षणी ती कित्येक तास बेशुद्ध पडली आणि माझ्या घरच्या माणसांच्या यातनांमध्ये आणखी एक भर पडली. या सर्व हकीकती पुढे मला समजत गेल्या, तेव्हा मला स्वाभाविकच मानसिक त्रास झाला आणि पती म्हणून मी तिच्या आजाराची काळजी घेतली पाहिजे, या जबाबदारीच्या जाणिवेने अस्वस्थ झालो. मुंबईतला माझा चर्चेचा पंधरा दिवसांचा मुक्काम संपवून मी पुन्हा पुण्याला परत आलो व तेथे माझ्या एका नातेवाइकांच्या मार्फत गाडी पाठवून वेणूबाईला, मी जेथे राहत होतो, तेथे घेऊन आलो. कराडच्या त्या वेळच्या डॉक्टरांवर माझा विश्वास उरला नव्हता. तेव्हा पुण्यामध्ये कुण्या चांगल्या डॉक्टरला तिला दाखवता आले, तर पाहावे, म्हणून मी हा उद्योग केला. भूमिगत अवस्थेमध्ये माझी जबाबदारी आणि माझ्या आजारी पत्नीची जबाबदारी घेण्याचे ज्या माझ्या पुण्याच्या मित्रांनी कबूल केले आणि पार पाडले, त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. पुण्यातल्या एक-दोन नामांकित डॉक्टर्सना मी सौ. वेणूबाईची तब्बेत दाखविली. काही निश्चित निदान होईना. परंतु ती अतिशय अशक्त होत चालली होती. चार सहा, चार सहा, तासांनी बेशुद्ध पडे. शुद्धीवर आणण्याकरता परिश्रम करावे लागत. डॉक्टर्स औषधे देत होते. परंतु त्यांचा काही फारसा उपयोग होत नव्हता. मी आठ-दहा दिवसांचा हा प्रयोग केल्यानंतर माझ्या नातेवाइकांच्या बरोबर तिला फलटणला-तिच्या माहेरी पाठवून दिले. कारण कराडला माझे घर दु:खी होते, आणि वेणूबाईच्या प्रकृतीच्या देखरेखीच्या गोष्टी कोणी करू शकेल, असा कर्ता माणूस तेथे कुणी नव्हता. आईच्या अडचणीत आणखी भर घालावी, अशी माझी इच्छा नव्हती. त्यामुळे तिच्या माहेरी-फलटणला जाणे हाच एक मार्ग मला दिसत होता. माहेरी पण तसे कोणी कर्ते मनुष्य नव्हते. परंतु तिची एक वयस्कर चुलती, एक धाकटी बहीण आणि मुंबईला शिकत असलेला धाकटा भाऊ असे त्यांचे कुटुंब होते. दुस-या दोन सावत्र बहिणी होत्या; परंतु त्या आपापल्या गावी होत्या. निदान तिची आपुलकीने चौकशी करणारी माणसे तरी त्या ठिकाणी होती, त्यामुळे मला माझा निर्णय चुकीचा वाटला नाही.

सौ. वेणूबाईला मी फलटणला पाठवून दिल्यानंतर माझी प्रकृती ढासळली. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी काही औषधपाणी दिले आणि मला सांगितले, की तुम्ही पुण्यात न राहता आजूबाजूच्या एखाद्या गावी जाऊन राहा. या डॉक्टर मंडळींना मी माझी राजकीय परिस्थिती सांगितली होती आणि त्यांनी ती गुप्ततेने पाळली होती, हे विशेष आहे, हे येथे नमूद केले पाहिजे. पुण्याच्या शेजारच्या घोडनदी या गावी एक-दोन आठवडे मी एका सामान्य कुटुंबाच्या घरी विश्रांतीसाठी काढले. डॉक्टरांनी दिलेली औषधे बरोबर होती. परंतु वातावरण बदलण्याची गरज होती. त्यामुळे या नव्या, मोकळ्या वातावरणामध्ये मी मनाने पुष्कळ हलका झालो.