कृष्णाकांठ१६६

एका आठवड्यांनंतर मला म्हातारबांच्या खोलीतून काढून इतर कार्यकर्त्यांबरोबर ठेवले. कारण त्यांनी बघितले, की माझी आणि म्हातारबांची चांगलीच दोस्ती झाली आहे. त्यांना ते कदाचित योग्य वाटले नसेल.

कार्यकर्त्यांच्या खोलीत गेल्यानंतर मग तुरुंगातले गांधीप्रणीत वातावरण त्या खोलीत सुरू झाले. पहाटे साडे चार वाजता उठून प्रार्थना म्हणाव्यात, 'रघुपति राघव...' भजन करावे आणि त्या वातावरणामध्ये डोळे झाकून स्वस्थ बसावे. जणू काही समाधिस्त होत आहोत, अशा भावनेने. माझे फक्त दोनच आठवडे सातारा जेलमध्ये गेले. परंतु मला त्यांची चांगलीच आठवण राहावी, असे ते दिवस होते. म्हातारबांची आणि माझी त्यानंतर कधीच गाठ पडली नाही. पण त्यांचा लौकिक मी पुढे ऐकत राहिलो होतो.

सातारहून पुढे मला कराडला घेऊन गेले. तोपर्यंत सरकारी निर्णय झाला होता, की मला स्थानबद्ध न करता माझ्यावर खटले भरावेत. त्यासाठी ऑगस्ट १९४२ मध्ये तांबवे येथील सभेत मी केलेल्या भाषणाबद्दल माझ्यावर खटला दाखल करण्यात आला. खटला अर्धा तास चालला. खटल्यात केलेले आरोप मी मान्य केले. कारण ते खरे होते. सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा मला देण्यात आली आणि माझा पेशा वकिलीचा असल्यामुळे न्यायाधीशांनी मला 'बी' वर्ग दिला.

चार-सहा दिवसांनी माझी येरवडा जेलला रवानगी झाली. यावेळी मात्र कॅम्प जेल किंवा इतरत्र कोठे न नेता जो प्रमुख जेल होता, त्याच्या अवाढव्य दरवाज्यातून मी प्रथमच आत गेलो आणि तेथल्या एका आवारामध्ये 'बी' क्लास राजबंद्यांसाठी ज्या राहुट्या बांधल्या होत्या, त्यांमध्ये माझी रवानगी केली. मला आश्चर्य वाटले, की जेलमध्ये आल्यानंतर राहुट्यांमध्येच राहण्याचा माझा योग दिसतो आहे. १९३२ सालीही मी अशाच तंबूत राहिलो होतो. आता पुन्हा तशीच एक राहुटी माझ्यासाठी देण्यात आली होती.

या आवारातील राजबंद्यांची ही राहुटीची वसाहत म्हणजे एक छोटेसे खेडेगाव होते. प्रत्येकाला एक राहुटी अशा हिशेबाने आम्ही तेथे वीस एक राजबंदी असू. जुने शिक्षा संपलेले लोक जात असत. नवे येत असत. असा नित्यक्रम सुरू होता. मी ज्या वेळी गेलो, त्यावेळी लांब मुदतीचे शिक्षा झालेले बरेच प्रमुख कार्यकर्ते तेथे होते. श्री. सदाशिवराव पेंढारकर तेथे होते, श्री. स्वामी रामानंद तेथे होते. माझे सोलापूरचे मित्र श्री. पुल्ली तेथे होते. ही सर्व मंडळी तेथे असल्यामुळे ओळखीच्या घरी गेल्यासारखे वाटत होते. श्री. सदुभाऊंच्याकडून त्यांच्या खटल्याच्या हकीकती ऐकल्या. त्यांना झालेल्या लांब मुदतीच्या शिक्षेचा त्यांच्या मनावर किती परिणाम झाला आहे, असे मी विचारले. त्यांनी सांगितले,

''शिक्षा कमी-जास्त असल्या, तरी आपण सर्वजण एका चळवळीतले आहोत. सर्व शिक्षा पुरी होईपर्यंत जेलमध्ये राहावे लागेल, असे वाटत नाही.''

अकरा वर्षांपूर्वी मी जेलमध्ये असताना माझा जो अनुभव होता, तो आणि या वेळचा अनुभव यांत पुष्कळ गुणात्मक फरक होता, असे म्हटले पाहिजे. या वेळी मला नवीन शिकण्याचा ध्यास होता. मन पुष्कळ संस्कारक्षम होते. आता तसा मी राहिलो नव्हतो. माझी काही निश्चित मते, धोरणे बनत चालली होती. आवडी-निवडी नक्की होत चालल्या होत्या. माझ्या राजकीय अनुभवामध्ये खूपच भर पडली होती. त्यामुळे हा पाच महिन्यांचा 'ब' वर्गाचा जेलचा अनुभव मला काहीसा वेगळा वाटला. नेहमीप्रमाणे याही जेलमध्ये वाचण्याची व्यवस्था उत्तम होती. आमच्या आवाराच्या शेजारीच पहिल्या वर्गातील स्थानबद्धांचा कॅम्प होता. त्यांच्याकडूनही आमच्याकडे पुस्तके येत असत. मी ज्या वेळी त्या जेलमध्ये गेलो, तेव्हा तेथे आलेल्या काही मंडळींत एका पुस्तकावर विशेष चर्चा चालू होती. ते लोकप्रिय झालेले पुस्तक म्हणजे 'आर्थर कोस्लर'चे 'डार्कनेस ऍट नून' ही कादंबरी. या कादंबरीवर वाचकांच्या उड्या पडताना मी पाहिल्या. पुस्तक हातात यायला वेळ लागला. पण मी ते मोठ्या उत्सुकतेने वाचले. कम्युनिस्ट राजवटीने केलेल्या राजकीय छळाची ती एक हृदयद्रावक कहाणी होती. या कादंबरीत, कम्युनिस्ट रशियाचे, मानवी मूल्ये संपलेली राजवट अशा तऱ्हेचे चित्र रंगविले गेले आहे. पुस्तक कलापूर्ण आहे. लेखकाच्या तळमळीबद्दल कुणाला शंका येणार नाही. पण हे पुस्तक वाचून त्याचा माझ्यावर जो परिणाम राहिला, तो हा, की हे काहीसे प्रचारकी थाटाचे पुस्तक आहे. अर्थात हे माझे मत, मला माहीत होते, की अनेकांना ते आवडणार नाही. आर्थर कोस्लर बद्दल मनात नितांत आदर आहे. परंतु एका देशातल्या राजकीय परिस्थितीचे निदान एखाद्या कादंबरीच्या रूपाने करता येणे शक्य नाही. आजही पाठीमागे वळून पाहताना, स्टालिनने युद्धाच्या काळात दडपशाहीचे जे भयानक सत्र सुरू केले होते, त्याचे कोणीच समर्थन करणार नाही; पण ही गोष्ट खरी, की त्या वेळी आम्ही जेलमध्ये हे पुस्तक वाचत होतो, त्याच वेळी चाललेल्या भयानक जागतिक युद्धामध्ये स्टालिनच्या नेतृत्वाखालीच रशियन सेना महापराक्रम करून फॅसिझमच्या पराभवाची शक्यता निर्माण करत होती. मी माझे मत आमच्या कॅम्पमधील काही मंडळींशी बोललो. त्यांनी स्टालिनच्या आताच्या युद्धकाळातील कार्याचे महत्त्व मान्य केले.