कृष्णाकांठ१५२

त्यामुळे मी त्यांना भूमिगत चळवळीच्या व्यापातून मुक्त केले होते. दुसरे माझे कार्व्यातील मित्र श्री. आत्माराम बापू जाधव हे मात्र भूमिगत चळवळीत पुष्कळ दिवस अत्यंत हुशारीने काम करीत राहिले. ते बुद्धीने अतिशय तल्लख होते. योजना ठरविण्यात तयार. कोणत्या वेळी काय करावे, याची झटकन् सूचना करण्यात तरबेज, अशा या व्यक्तीचा मला फार उपयोग झाला. श्री. आत्माराम बापूंच्या जोडीनेच मला उल्लेख केला पाहिजे, अशी व्यक्ती म्हणजे श्री. माधवराव जाधव. श्री. माधवराव जाधव यांनी आपले स्वत:चे व्यक्तिमत्त्व या चळवळीत तयार केले. अक्षरश: शेकडो कार्यकर्त्यांचे एक जाळेच त्यांनी आपल्या भोवती बांधले होते आणि धाडसाने ते युद्धप्रयत्नांना नवेनवे अडथळे आणण्याचे काम करू लागले होते. कराडच्या पोस्ट ऑफिसमध्ये भर दिवसा जाऊन तेथील साहित्य घेऊन जाण्यात त्यांनी जे धैर्य, जे कौशल्य दाखविले, त्यामुळे सबंध कराड शहरात तो चर्चेचा विषय झाला. त्यांनी अशी अनेक धाडसाची कामे केली आहेत. पुढच्या काळात म्हणजे १९४४ मध्ये तर ते चुकून पोलिसांच्या तावडीत सापडले असताना कराडचा जेल फोडून ते बाहेर पडले. या सर्व मंडळींचा उल्लेख केल्याशिवाय माझ्या भूमिगत जीवनातील वातावरणाचे स्वरूप ख-या अर्थाने स्पष्ट होणार नाही, म्हणून मी हे लिहिले आहे.

या काळात काही तरी धाडसाचा कार्यक्रम केला पाहिजे, अशी माझ्यामध्ये आणि श्री. कासेगावकर वैद्य यांच्यामध्ये चर्चा झाली आणि शिरवडे रेल्वे स्टेशन जाळण्याचा कार्यक्रम त्यांनी आणि श्री. सदाशिवराव पेंढारकर यांनी आपल्या नेतृत्वाखाली पार पाडावा, असे ठरले. कासेगावकर वैद्य यांनी या कामाचे नेतृत्व शेवटी श्री. सदाशिवराव पेंढारकर यांना दिले आणि सदाशिवराव पेंढारकरांनी हे काम मोठ्या धाडसाने आणि यशस्वी रीतीने पार पाडले. त्यांनी दहा-पाच तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळविले होते. त्यात माझा भाचा बाबूराव कोतवाल हाही सामील होता, असे मला नंतर कळले. त्यांच्यामध्ये राष्ट्रीय वृत्ती पहिल्यापासून होती. परंतु मी त्याला कधी 'तू हे कर'असे सांगितले नव्हते. त्याने स्वयंस्फूर्तीनेच हे काम करावयाचे ठरविले होते आणि त्यात तो पडतो आहे, त्याचा मला एक प्रकारचा आनंदही झाला. त्यावेळी तो हायस्कूलचा विद्यार्थी होता. आणि हायस्कूलचा विद्यार्थी असतानाच राष्ट्रीय चळवळीत काम करणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा असल्याने मला त्यात आश्चर्य वाटले नाही. या सर्व मंडळींनी एका संध्याकाळी शिरवडे रेल्वे स्टेशनवर हल्ला केला. तेथे असलेल्या बंदूकधारी पोलिसांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्या बंदुका पळविल्या आणि रेल्वे स्टेशन जाळले.

ज्या दिवशी हा कार्यक्रम होणार होता, त्या दिवशी मी ओगलेवाडीला श्री. व्यंकटराव ओगले यांच्या घरी होतो. श्री. शांताराम बापू आणि कासेगावकर वैद्य या दोघांना याची कल्पना होती.

श्री. व्यंकटराव ओगले हा खरोखरीच मनाचा मोठा दिलदार माणूस होता आणि नखशिखांत राष्ट्रभक्त होता. बाहेरचे लोक त्यांना कदाचित उद्योगपती म्हणून ओळखत असतील. परंतु मी या गृहस्थांना एक भूमिगत कार्यकर्ताच समजत होतो. आम्हांला जेव्हा दुसरीकडे उतरण्याची सोय नसे, तेव्हा तास, दोन तासांच्या नुसत्या निरोपाने आम्ही त्यांच्या घरी पोहोचत असू. आम्ही त्यांच्या चेह-यावर नेहमी हास्यच पाहिले आहे. तसे ते मोठे कलाकार होते. ते उत्तम चित्रकार होते. त्यांना संगीताचे उत्तम ज्ञान होते. त्यांच्या घरी कलाकारांचे नेहमी येणे-जाणे असे. त्यामुळे त्या माणसाचे व्यक्तिमत्त्व मला मोठे आकर्षक वाटे. आम्ही त्यांच्याकडे मुक्कामाला असलो, की संध्याकाळी ते आमच्यांत गप्पा मारायला येऊन बसत आणि भूमिगत जीवनामध्ये गप्पा मारणारी काही माणसे भेटल्याशिवाय वेळ जात नाही, असा माझा अनुभव आहे.

भूमिगत जीवन हे मोठे एकाकी जीवन असते. वेळ जाता जात नाही. जेव्हा काही करावयाचे असते किंवा जेव्हा कुणाला भेटावयाचे असते किंवा जेव्हा प्रवास करावयाचा असतो, तेव्हा वेळ केव्हा जातो, ते कळत नाही. परंतु एखाद्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर वेळ जाणे मोठे कठीण असते. मी कायद्याचा विद्यार्थी होतो, तेव्हापासून सिगारेट्स् ओढायला लागलो होतो. भूमिगत चळवळी मध्ये सिगारेट्स ओढणे अधिक वाढले होते. जेव्हा सिगारेट्स मिळत नसत, तेव्हा मी विडीचाही उपयोग केला आहे. श्री. व्यंकटरावांच्याकडे असल्यानंतर सिगारेटची कमतरता कधी भासली नाही.