कृष्णाकांठ१५१

कराडच्या गटामध्ये आम्हांला दोन नवे शक्तिशाली कार्यकर्ते ऑगस्टनंतर मिळाले, ते म्हणजे श्री. लक्ष्मणराव कासेगावकर वैद्य आणि सदाशिव पेंढारकर हे होत. श्री. लक्ष्मणराव कासेगावकर वैद्य यांना मी कराडमध्ये असताना ओळखत होतो. परंतु ते भूमिगत चळवळीत कधी लक्ष घालण्यासारखे कार्य करतील, अशी मला कल्पना आली नव्हती. ते व त्यांचे वडील हे तत्त्वत: राष्ट्रभक्त आणि खादीधारी होते. माझा उगीचच चुकीचा समज होता, की ते हिंदुसभावादी आहेत. त्यांची माझी भेट झाल्यानंतर माझा तो समज चुकीचा आहे, हे माझ्या लक्षात आले. वैद्य म्हणून ते नामांकित असल्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांचा अशा भूमिगत चळवळीशी संबंध असेल, अशी शंकासुद्धा येईल, ही परिस्थिती नव्हती. त्यामुळे भूमिगत चळवळीचे पहिल्या काही महिन्यांचे उघड उघड कार्य करण्याची त्यांनी जबाबदारी घेतली. ते अतिशय निधड्या छातीचे, परिश्रमाला नित्य तयार असलेले, प्रामाणिक, तळमळीचे कार्यकर्ते होते, असा त्यानंतरचा त्यांचा मला अनुभव आला. आमच्या कृष्णेच्या आषाढ-श्रावणातला महापूर ऐल-पैल पोहून जाणा-या कित्येक मंडळींपैकी ते एक होते. तेव्हा त्यांच्या धैर्याबद्दल वेगळे काही सांगितले पाहिजे, असे नाही. ते आमच्या कराड गटातील एक प्रमुख कार्यकर्ते झाले आणि पुढे प्रति-सरकारच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.

श्री. सदाशिव पेंढारकर हे असेच महत्त्वाचे सहकारी आम्हांला मिळाले. श्री. सदाशिव पेंढारकर हे पदवीधर होते. कराडच्या एका सुखवस्तू घराण्यात सुखात वाढलेला मोठा मुलगा, असा त्यांचा लौकिक होता. त्यांचे कॉलेज-शिक्षण पुण्याला झाले होते. ते पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. उत्तम क्रिकेटियर म्हणून त्यांचा लौकिक होता. किंबहुना एस्. पी. महाविद्यालयाच्या क्रिकेटच्या टीमचे ते कॅप्टन होते. त्यांनी अत्यंत विचारपूर्वक या चळवळीत भाग घ्यावयाचे ठरविले आणि तसे त्यांनी मला येऊन सांगितले. त्यांना असे वाटत होते, की ही शेवटची लढाई आहे, त्यात आपण भाग घेतला नाही, तर आपला जन्म व्यर्थ आहे. या तीव्र जाणिवेने त्यांनी काम करायचे ठरविले होते. ते त्या वेळी किर्लोस्करवाडीच्या कारखान्यामध्ये एक अधिकारी म्हणून काम करीत होते. भूमिगत चळवळीमध्ये एक अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची माझी जी ठिकाणे होती, त्यांमध्ये किर्लोस्करवाडीमध्ये त्यांचे घर हाही एक माझा महत्त्वाचा अड्डा होता.

रेठ-याच्या बैठकीनंतर सामान्यत: एका ठिकाणी दोन दिवसांपेक्षा जास्त राहावयाचे नाही, असा नियम मी पाळू लागलो. कराडमध्ये असलो, तर एका घरी एका दिवसापेक्षा जास्त राहावयाचे नाही, असाही निर्णय मी घेतला होता. आणि असे राहण्यासाठी कराडमध्ये दहा-पाच घरे मी मुक्रर केली होती, त्या सर्व ठिकाणी माझे आनंदाने स्वागत होत असे. या तऱ्हेची संघटना बांधावयास पुष्कळ परिश्रम करावे लागतात. तरी साध्या निरोपाने ही कामे आम्हांला करता येत होती. हा आमचा अनुभव आहे. इतकी त्यासंबंधी लोकांची आपुलकी होती. मला आठवते, की एकदा कराड शहरात राहणे निव्वळ अशक्य झाले, तेव्हा मला कुठे तरी बाहेरगावी जाणे आवश्यक होते. म्हणून मी आमच्या पार्लेकर श्री. यशवंतराव पाटील यांच्याकडे एक-दोन दिवस राहिलो होतो. पण त्यांचा माझा स्नेह इतका प्रसिद्ध होता, की त्यांच्याकडे राहणे हे फार धोक्याचे होते, असे त्यांना आणि मलाही वाटत होते. म्हणून मी मसूर-खराडे गावाच्या हद्दीत जाऊन राहिलो. तेथे माझी राहण्याची व्यवस्था करावयाचे काम मसूरचे १९३० सालापासूनचे स्वातंत्र्य-सैनिक असलेले काटकर दांपत्य यांनी आपल्या अंगावर घेतले होते. श्री. दत्तोबा काटकर व त्यांची पत्नी पार्वतीबाई या दोघांनी १९३० सालच्या चळवळीत जेल भोगलेले होते, आणि त्यांचा अतिशय दाट स्नेह होता. त्यामुळे घरगुती जिव्हाळाही होता. दत्तोबांची थोडी-फार शेती होती. मसूर रेल्वे लाईनच्या पश्चिम पिकात एक छोटीशी झोपडी बांधून त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे त्या भागातील कार्यकर्त्यांशी माझी चर्चा होत असे. अशा चळवळीमध्ये कार्यकर्त्यांना वारंवार भेटत राहणे आणि त्यांचा उत्साह कायम राखणे हे अतिशय गरजेचे असते. पोलिसांचा ससेमिरा आहे, म्हणून लोकांशी आणि कार्यकर्त्यांची गाठभेट बंद झाली, तर चळवळ बंद झाली, असा लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता असते. दत्तोबांच्या शेतातील त्या झोपडीत मी निदान दहा गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांना त्या दोन-तीन दिवसांच्या मुक्कामात भेटलो असेन. आमचे चरेगावचे श्री. व्यंकटराव माने त्यांपैकी एक होते. अत्यंत धाडसी आणि देशभक्तीने प्रेरित झालेला हा कार्यकर्ता होता. मी तर त्यांचे भूमिगत नाव 'वाघ' असे ठेवले होते. तसे माझे राहण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आमच्या कराड शहराच्या शेजारी दोन मैलांवरचे गाव कार्वे हे होते. तेथे उसाची शेती होती. उसाच्या शेतीसाठी आज ते संपन्न असे प्रसिद्ध गाव आहे. राष्ट्रीय वृत्तीची परंपरा त्या गावाला आहे. त्या गावचे प्रमुख कार्यकर्ते आणि माझे मित्र श्री. संभाजीराव थोरात यांनी चळवळीच्या सुरुवातीलाच जेलमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली.