कृष्णाकांठ१४६

दुस-या दिवशी तासगावच्या मोर्च्याच्या ज्या हकीकती आम्हांला किर्लोस्करवाडीला कळल्या, त्यांवरून तो मोर्चा फारच यशस्वी झाला, असे म्हटले पाहिजे. लोकांनी आपल्या प्रचंड शक्तीने तेथील महसूल अधिकारी श्री. निकम म्हणून होते, त्यांना नैतिक दृष्ट्या जिंकले. निकमांच्या डोक्यावर गांधी टोपी घालून मामलेदार कचेरीवर तिरंगी झेंडा फडकविला आणि गांधींच्या जयजयकाराच्या जल्लोशात हा मोर्चा परत फिरला.

माझ्या कल्पनेने तासगावचा हा मोर्चा चळवळीच्या यशाचे मोठे प्रतीक होते. त्याचं श्रेय तालुक्यातील कार्यकर्ते आणि पुढारी यांना आहे. या यशामुळे मोर्च्याची कल्पना सर्व जिल्ह्यामध्ये फैलावू लागली. माझ्या कल्पनेप्रमाणे, तासगावच्या या यशस्वी मोर्च्याने ब्रिटिश सत्तेचे सर्व प्रमुख अधिकारी फार अस्वस्थ झाले, हे त्यानंतर त्यांनी केलेल्या उपाययोजनेमुळे स्पष्ट झाले. कारण त्यानंतर इस्लामपूर आणि वडूज या दोन ठिकाणी जे मोर्चे झाले, त्या ठिकाणी पोलिसांकडून जो अत्याचार झाला, त्यावरून हे स्पष्ट होते, की ब्रिटिश सरकारने या मोर्च्याची एक प्रकारची हाय घेतली होती.

वडूजच्या मोर्च्याच्या आदल्या रात्री मी आणि गौरीहर सिंहासने आणि इतर सर्वजण जयरामस्वामींचे वडगाव येथे भेटलो. मोर्च्याच्या नेतृत्वाचा निर्णय आधीच झाला होता. श्री. परशुराम घार्गे हे त्या तालुक्यातील अतिशय माननीय असे पुढारी होते. त्यांनी ह्या मोर्च्याचे नेतृत्व करावे, असे ठरले होते.

काँग्रेसच्या तत्त्वाप्रमाणे आम्ही अत्यंत शांततेने मोर्चा काढणार आहोत, असा निरोप आधी श्री. बंडोपंत लोमटे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना पाठविला होता. वडगावच्या लोकांनी एक मिरवणूक  काढून श्री. परशुराम घार्गे व त्यांच्या साथीदारांना निरोप दिला. वडगावच्या निरोप-समारंभानंतर मी पुसेसावळीला श्री. अयाचितांकडे गेलो.

त्या वेळचा प्रवासही मी असाच एका मोटार-सायकलच्या पाठीमागे बसून केला होता. त्या वडूजच्या मोर्च्याचा इतिहास आता प्रसिद्ध झाला आहे. त्या ठिकाणी अमानुषपणे गोळीबार करून कित्येक माणसे ठार मारली. त्यांमध्ये परशुराम घार्गे आणि त्यांचे इतर साथीदार हे प्रमुख होते. परशुराम घार्गेंचे हौतात्म्य हा आमच्या १९४२ च्या चळवळीचा एक मानबिंदू होता. त्यांचे नाव अमर झाले.

इस्लामपूरच्या मोर्च्याबाबतही असाच प्रकार घडला. तासगावच्या मोर्च्याच्या आदल्या रात्री आम्ही किर्लोस्करवाडीमध्ये असताना सदाशिवराव पेंढारकरांचे एक मित्र श्री. पंड्या इंजीनियर हे आमच्यामध्ये येऊन बसत. ते मूळचे उत्तर प्रदेशातले, परंतु किर्लोस्करवाडीला एक तज्ज्ञ म्हणून नोकरीसाठी आले होते. हा शरीराने बलदंड, बुद्धिमान व देशभक्त असा तरुण होता.

दुस-या दिवशी तासगावच्या मोर्च्याची हकीकत ऐकून त्यांना एकदम अशी स्फूर्ती आली आणि त्यांनी जाहीर केले, की तासगावच्या मोर्च्यात जाऊ शकलो नाही, म्हणून आता इस्लामपूरच्या मोर्च्यात आपण सामील होणार. त्याप्रमाणे ते दोन-तीन दिवसांतच झालेल्या इस्लामपुरच्या मोर्च्यात सामील होण्यासाठी गेले आणि त्या मोर्च्यात जी दोन माणसे पोलिसांच्या गोळीबारात बळी पडली, त्यांत श्री. इंजीनियर पंड्या हे एक होते. मला ही गोष्ट वारंवार अस्वस्थ करते, ती ही, की त्यांनी मोर्च्यामध्ये जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा मी तेथे हजर होतो. त्यावेळी माझ्या मनात येऊन गेले, की त्यांना त्यापासून परावृत्त करावे. मी त्यांना तसे सुचविलेही, परंतु ते त्यांनी मानले नाही. ते म्हणाले,

''मला एकदा पाहायचे आहे तुमच्या महाराष्ट्रातील जनतेची चळवळ कशी असते, कशी चालते. तीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन अनुभव घेतल्याशिवाय ते समजणार नाही.''