कृष्णाकांठ१४४

कामाची आखणी कशी करावयाची, याची बोलणी झाली आणि मी त्यांना सांगितले, की पहिले काम मी हे ठरविले आहे, की जितक्या ठिकाणी जाता येईल, तितक्या ठिकाणी जाऊन तेथील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना भेटता येईल, तेवढ्या कार्यकर्त्यांना भेटावयाचा मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे. मग प्रवास कसे करावयाचे, याचे सगळे बारकावे ठरले आणि दुस-या दिवशी पहाटेस मी कराडमधून बाहेर पडलो. किंचितसा अंधार, किंचितसा प्रकाश अशा वेळी कृष्णेच्या संगमावर आलो, तेव्हा माझ्यासाठी तेथे नाव उभी होती, असे दिसले. नावेत बसून मी संगमावरून गोट्याला गेलो. हे एक छोटेसे गाव आहे. हे सातारा रोडला जवळ पडते. गोट्याहून मी पिकापिकांतून सातारा रस्त्याच्या जवळ आलो. तेव्हा थोड्या अंतरावर श्री. शंकरराव बेलापुरे म्हणून माझे स्नेही होते, ते उत्तम मोटार-सायकल चालवीत असत, ते माझी तेथे वाटच पाहात होते. मी आल्याची खूण करताच ते मोटार-सायकल घेऊन माझ्या जवळ आले. त्यांनी मला सांगितले,

''बसा पाठीमागे. निघू या आपण.''

आमच्या भूमिगत आयुष्यातील भटकंतीची ही अशी सुरुवात झाली.

कराडला पोहोचल्यापासून पहिल्या आठ दिवसांत मी कवठे, तांबवे, येळगाव अशा अनेक ठिकाणी जाऊन आलो. कवठ्याची भेट मला आठवते आहे. मी आधी श्री. किसन वीरांना निरोप पाठविला होता, की मी येतो आहे. त्याप्रमाणे ते माझी वाट पाहत होते. आम्ही चळवळीच्या पहिल्या दीड दोन महिन्यांत जे भूमिगत जीवन जगत होतो, ते त्या वेळच्या परिभाषेत ठीक आहे, परंतु खरे म्हणजे आम्ही फार मोकळेपणाने हिंडत फिरत होतो. लोकांची मने भारावलेली होती त्यामुळे भूमिगत राहणे म्हणजे लपून छपून राहणे असे त्याला स्वरूप तेव्हा नव्हते.

पुढे पुढे ऑक्टोबरच्या सुमारास पोलिसांचे अत्याचार आणि छळ वाढल्यानंतर मात्र त्याला ख-याखु-या अर्थाने भूमिगत जीवनाचे साहसी स्वरूप आले. या पहिल्या काही आठवड्यांत आम्ही भूमिगत होतो, याचा अर्थ, एवढाच होता, की पोलिसांच्या समोर उभे राहून 'मी यशवतं चव्हाण' किंवा आणखी कोणी, असे सांगून पकडण्याचे निमंत्रण आम्ही त्यांना देत नव्हतो. कारण छोटे छोटे पोलीस कॉन्स्टेबल जे आम्हांला ओळखत होते, त्यांनी आम्हांला किती तरी वेळा, हिंडता फिरताना पाहिले होते. जे मिळेल, ते वाहन-त्याने प्रवास करावयाचा, असा आमचा परिपाठ होता. कधी बैलगाडी, कधी सायकल, तर कधी मोटार-सायकल, तर कधी रेल्वे, तर कधी पायीसुद्धा असा आमचा प्रवास चालत असे. कवठ्याला मी असाच सायकलवरून जाऊन पोहोचलो होतो. सातारा शहराची हद्द ओलांडेपर्यंत एका मित्राच्या मोटारीतून गेलो आणि तेथून पुढचा प्रवास मी सायकलवरून केला. कवठ्याला पोहोचल्यानंतर मी पाहतो, तर आबांनी जाहीर सभाच बोलावून ठेवली होती. माझ्या आठवणीप्रमाणे कवठे गावातील ती माझी पहिलीच जाहीर सभा होती. पूर्वी मी कवठ्याला येऊन गेलो असेन, चर्चेत भागही घेतला असेन, पण माझी जाहीर सभा ही अशी ती पहिलीच होती. भूमिगत यशवंतराव आले आहेत, अशी गावामध्ये हाळी दिली होती आणि कवठे आणि त्याच्या आसपासच्या गावांतील मंडळी त्या सभेला जमली होती. मी निवांत पाऊण तास त्या सभेत बोललो आणि ती सभा संपविली. मग मात्र आबा म्हणू लागले,
''आपण आता गावात थांबावयाचे नाही. मी बाहेर तुमची व्यवस्था केली आहे.''

त्यांना शंका होती, की जाहीर सभेची बातमी कळताच कदाचित तालुक्याचे ठाणेदार आपला फौजफाटा घेऊन तेथे येतील. ते त्या रात्री आले नाहीत, पण दुस-या दिवशी सकाळी आलेच. पण ती रात्र त्यांनी आम्हांला सवड दिली, ही गोष्ट खरी आहे. त्या रात्री किसन वीरांशी माझी जी जी बोलणी झाली, त्यांमध्ये आम्हां सर्वांच्या पुढे महत्त्वाचा विषय होता, तो हा, की या चळवळीला निश्चित रूप काय द्यावयाचे? सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्यापासून परावृत्त करण्याचे काम पुष्कळ यशस्वी झाले होते आणि त्यामुळे हळूहळू भूमिगत कार्यकर्त्यांचा एक फौजफाटाच तयार झाला होता, असे म्हटले, तरी चालेल. तालुक्या-तालुक्यांतून, गावा-गावांतून स्वत:ला भूमिगत समजणारे अनेक कार्यकर्ते उभे राहिले होते. पण या कार्यकर्त्यांच्या शक्तीवर कसा उठाव करावयाचा, हा आमचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न होता. आबांची आणि माझी याच प्रश्नावर त्या रात्री चर्चा झाली. मला त्या वेळी चार-सहा महत्त्वाचे कार्यक्रम डोळ्यांपुढे दिसत होते. चळवळीच्या पाठीमागे जोपर्यंत जनतेचा स्वयंस्फूर्तीने उघड-उघड पाठिंबा उभा आहे, तोपर्यंत ब्रिटिश सत्तेची प्रतीकात्मक अशी जी सत्तास्थाने असतील, त्यांच्याविरुद्ध काही तरी उठाव केले पाहिजेत, असे मला वाटत होते आणि म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांसमोर मोर्च्याची कल्पना मांडत होतो. माझी मोर्च्याची कल्पना अशी होती, की निवडक, सर्व नव्हेत, जे कार्यकर्ते विशेषत: वेळ पडली, तर जेलमध्ये गेले, तरी चालतील, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जनतेचा मेळावा घेऊन त्यांनी ब्रिटिश सत्तेचे जे तालुक्याचे केंद्र आहे, त्या केंद्रापुढे जाऊन निदर्शन करावे आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व करणा-या कार्यकर्त्याने तालुक्याच्या मामलेदार कचेरीवर झेंडा लावायचा प्रयत्न करावा. ब्रिटिश सत्तेचा पाडाव झाला, अशी भावना लोकांत निर्माण करणे आणि त्यांच्यांत आत्मविश्वास वाढविणे याची गरज होती, म्हणून या कार्यक्रमाचा मला मोह होता. आबांना मी ही कल्पना सांगितली आणि त्यांना ती फक्त पहिले पाऊल म्हणून मान्य झाली. त्यांनी मला सांगितले, की एक-दोन तालुक्यांत प्रत्यक्ष करून दाखवा, म्हणजे इतरत्र फैलाव होईल. आमच्यापुढे दुसरे कार्य जे होते, ते पुढे हळूहळू क्रियाशील होऊ लागले; पण त्यातील मोर्च्याची जी चळवळ होती, ती ह्या भूमिगत चळवळीचे पहिले पाऊल होते.