कृष्णाकांठ११७

याच माझ्या भेटीत मी चंद्रोजी पाटील यांच्या सांगण्यावरून कोल्हापूरला गेलो आणि तेथे कॉलेजमध्ये शिकणा-या जिल्ह्यातील काही तरुणांना भेटून त्यांच्या ओळखीपाळखी करून घेतल्या. या नव्या ओळखींमध्ये झालेली एक ओळख अतिशय महत्त्वाची अशी मला वाटली. ती म्हणजे चंद्रोजी पाटील यांच्याच गावचे, कामेरीचे, श्री. के. डी. उर्फ केशवराव पाटील यांची ओळख ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती.

पुढे जवळ जवळ सात-आठ वर्षे त्यांचा माझा अतिशय गाढ स्नेह होता आणि राजकारणात त्यांनी माझ्याशी खूप सहकार्य केले.

केशवराव माझ्यासारखे लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते. एका मध्यम स्थितीतील शेतक-याचे एकुलते एक चिरंजीव होते. वर्णाने किंचित सावळे, पण नीटनेटका चेहरा, उत्तम बांधीव शरीर, कुरळ्या केसांचा पाडलेला सुरेखसा भांग, उत्तम कपडे वापरण्याचा शौक यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे परिणामकारक होते. त्यांची माझी ओळख नुसती ओळख न राहता तिचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यांच्या आग्रहावरून मी चार दिवस कोल्हापूरला राहिलो. त्यांनाही राजकारणात रस होता. चंद्रोजी पाटलांची आणि माझी मैत्री आहे, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली होती. तासन् तास आम्ही राजकारणासंबंधाने बोलत राहिलो. माझी त्यावेळची विचारसरणी काय आहे, त्याची त्यांना ओळख करून दिली आणि आपण नवी शक्ती मिळविली, या भावनेने मी पुण्याला परतलो.

पण यापूर्वी दुस-या एका महत्त्वाच्या चर्चेचा मला येथे उल्लेख करायला पाहिजे. या काळात आमच्या जिल्ह्यात एक विद्वान, तरुण वकील, तासगावचे श्री. विठ्ठलराव पागे यांच्याशी या काळात माझे झालेले बोलणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विठ्ठलराव पागे यांचा आणि आमचा जवळजवळ सर्व जन्माचा सहकार्याचा योग आहे. आजही त्यांची माझी मैत्री आहेच, पण त्या वेळी त्यांच्या-माझ्यांत झालेल्या चर्चेचा मला फार उपयोग झाला, म्हणून त्याची मी नोंद करत आहे.

श्री. पागे हे पहिल्यापासून स्वातंत्र्य-सैनिक होते. ते अतिशय व्यासंगी होते. त्यांचे वक्तृत्त्व पहिल्या प्रतीचे असल्यामुळे मी त्यांना काहीसा दुरूनच पाहत होतो. त्यांच्या-माझ्यामध्ये तो वेळपर्यंत फारशी जवळीक नव्हती. पण युद्धाच्या परिस्थितीतून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीसंबंधाने मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी जे विश्लेषण केले, ते मूलत: माझ्या विचाराशी जुळणारे होते. ते प्रथमपासून एक निष्ठावान गांधीवादी होते. समाजवादाचा तात्त्विक विचार पुढे त्यांनी स्वीकारला, पण तो पुस्तकी पद्धतीने नव्हे.

गरिबांना रोजगार देण्याच्या बाबतीत त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात फार मोठे कार्य केले आहे. त्या काळात विठ्ठलरावांना माझ्यासारखे वैचारिक त्रिकोण-चौकोन असल्या उद्योगातून जावे न लागल्यामुळे त्यांचे मन साफ होते. त्यांनी त्या वेळी मला एक अचूक अंदाज सांगितला. त्यांनी सांगितले, ''महात्मा गांधी हे अतिशय हुशार सेनापती आहेत. ते काळ आणि साधने यांची योग्य वेळी निवड करतील आणि आपल्या पाठीमागे यायचा आदेश देतील. तोपर्यंत धीर न सोडता विश्वासाने वागले पाहिजे.''

श्री. पागे यांचे हे शब्द मला त्या वेळी अर्थपूर्ण वाटले, त्यामुळे लक्षात राहिले. आणि आजही ते इतिहासाने खरे ठरविले आहेत.

मी या सर्व प्रवासाचा आणि चर्चेचा उल्लेख अशासाठी केला, की माझ्या आयुष्यातला हा एक मोठा संक्रमण-काळ होता. कारण काही तरी घडावे, अशी मनाची तीव्रतम अपेक्षा आणि प्रत्यक्षात काही घडत नाही, अशी वस्तुस्थिती, या अडचणीत मी सापडलो होतो. त्यामुळे, नाही म्हटले, तरी मनाची कुचंबणा होत होती. ही कुचंबणा नाहीशी व्हायला या चर्चेने मदत केली.