कृष्णाकांठ११८

काँग्रेसच्या कार्यक्रमाची वाट पाहत असे बरेच दिवस गेले. पुढे मार्च १९४० मध्ये रामगडमध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन झाले. या काँग्रेसमधून काही निघेल, अशी अपेक्षा होती. ती खरी ठरली नाही. जरूर पडली, तर प्रत्यक्ष आंदोलन सुरू करण्याचा विचार या काँग्रेसने बोलून दाखविला. परंतु निश्चित कार्यक्रमाची रूपरेखा मात्र दिली नाही.

फॉरवर्ड ब्लॉकने या संधीचा फायदा घेऊन एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रीय सप्ताहात आपल्या कार्यकर्त्यांना युद्धविरोधी कार्यक्रम दिला. आमच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते अस्वस्थ तर झालेच होते, कारण अशा परिस्थितीत कार्यक्रम नसला, तर कार्यकर्त्यांची मोठी अडचण होते. इतर पक्ष-विशेषत: कम्युनिस्ट आणि फॉरवर्ड ब्लॉक यांनी कार्यक्रम दिल्यानंतर अत्यंत क्रियाशील असलेले असे जे कार्यकर्ते होते, त्यांना मोठे गोंधळल्यासारखे झाले.

अशा परिस्थितीमध्ये आमच्या तालुक्यामध्ये, विशेषत: काले आणि इंदोली या भागांतल्या कार्यकर्त्यांमध्ये ब्रिटिश सरकारविरोधी काहीतरी कृती करण्याची घाई झाली होती. काले येथे हळू हळू कम्युनिस्ट गट तयार होत होता. मला त्याची काही फारशी चिंता वाटली नाही. परंतु आम्हां काँग्रेस कार्यकर्त्यांचे केन्द्र असलेल्या इंदोली येथेही कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली काही करण्याचा प्रयत्न सुरू झाला, तेव्हा स्वाभाविकच आम्ही काळजी करू लागलो.

इंदोलीचे आमचे प्रमुख कार्यकर्ते मित्र श्री. दिनकरराव निकम यांना भेटण्यासाठी मी मुद्दाम त्यांच्या गावी गेलो आणि बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. एक रात्र तेथे राहिलो. श्री. निकमांचे मी पूर्ण समाधान करू शकलो नाही, पण तातडीने त्यांनी काही न करण्याचे कबूल केले. काँग्रेस पक्षामध्ये अशा तऱ्हेने फुटीरता आली, म्हणजे ऐन मोक्याच्या वेळी जेव्हा काही महत्त्वाची कृती करावी लागणार आहे, त्यावेळी आपण शक्तिहीन असू, याच एका मुद्दयावर मी विशेष जोर देत होतो.

दिनकरराव निकम यांना हा मुद्दा पटत होता. पण कार्यकर्ते निश्चित बसू देत नव्हते. ही त्यांची अडचण होती. आम्ही काही तडजोड काढली आणि त्यांच्या एक-दोन कार्यकर्त्यांनी जेलमध्ये जावे आणि आपली क्रियाशीलता जागी ठेवावी, असे ठरले. कार्यकर्त्यांमध्येही किती अस्वस्थता होती, याचे नमुना म्हणून मी हे उदाहरण सांगितले आहे.

या पद्धतीने १९४० सालचे पहिले चार महिने गेले असतील, नसतील, तोच महायुद्धाला युरोपात विलक्षण गती आली. ही पोकळ लढाई आहे, असे म्हणणा-या लोकांना धक्का बसावा, अशी या लढाईत जर्मनीच्या बाजूने प्रगती सुरू झाली. मी या दिवसांत सुट्टीच्या निमित्ताने कराडला गेलो होतो.

जर्मनीने शेवटी जेव्हा फ्रान्सवर अतिक्रमण केले, तेव्हा लोक डोळ्यात तेल घालून लढाईची प्रगती पाहत होते. विशेषत:, ज्यांनी फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा इतिहास वाचून फ्रान्सबद्दल आणि पॅरिसबद्दल काही ध्येयवादी जिव्हाळा बाळगला होता, त्या मंडळींना आता फ्रान्सचे काय होणार, अशी चिंता वाटू लागली.

मला हे कबूल केले पाहिजे, की फ्रान्सवर जेव्हा जर्मनीचे अतिक्रमण सुरू झाले, तेव्हा आपल्याच देशाच्या सरहद्दीवर जर्मन घुसले आहेत, अशा तऱ्हेच्या चिंतेचा मला स्पर्श होऊन गेला. इतिहासाच्या वाचनाने निर्माण झालेले जिव्हाळ्याचे संबंध किती मनस्वी असतात, याचा मला अनुभव आला. पूर्वेकडे फ्रान्सने अजिंक्य अशी 'मॅझिनो लाईन' नावाची संरक्षणाची भिंत उभी केली होती, असे वृत्तपत्रांत आणि पुस्तकांत आम्ही वाचत होतो. ती भिंत अभेद्य आहे, अशा तऱ्हेची रसभरित वर्णने आम्ही वाचली होती. त्यामुळे काही आश्वासन वाटत होते.