कृष्णाकांठ११२(प्रकरण तिसरे निवड)

प्रकरण तिसरे

निवड

माझ्या वैचारिक प्रवासाचे सिंहावलोकन करीत असताना मी कालदृष्ट्या थोडा पुढे गेलो आहे. मी कायद्याच्या अभ्यासाचा विचार पक्का केला.

कायद्याच्या अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय करण्यापूर्वी त्याच्या आर्थिक बाजूची तयारी करणे आवश्यक होते. विट्याला आमची वडिलोपार्जित शेतजमीन होती. आम्हांला तिचे उत्पन्न फारसे येत नव्हते. माझ्या दोन्ही बंधूंनी सुचवले,
''तुझा दोन वर्षाचा खर्च निघेल, इतकी त्या शेतीची जरूर किंमत येईल. तेव्हा आपण ती जमीन विकून टाकू या.''

माझी तर मान्यता होतीच. आम्ही तिघेही विट्याला जाऊन जमिनीचे विक्रीखत करून आलो. माझ्या लॉ कॉलेजच्या दोन वर्षाच्या खर्चाची याप्रकारे तयारी झाली. परंतु हे शिक्षण कोठे घ्यावे? कोल्हापूरला, की  पुण्याला, असा माझ्यापुढे प्रश्न होता. कोल्हापूरला काढलेली चार वर्षे सुरेख गेली होती. कोल्हापूर शहर व कोल्हापूरची माणसे यांबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला होता. मी तशी काही खास मित्रमंडळी निर्माण केली नव्हती. पण कोल्हापूर शहराचे, शहर म्हणून, एक व्यक्तिमत्त्व आहे, की त्याने एकदा तुमच्यावर पकड घेतली, म्हणजे ती लवकर सुटत नाही. माझे तसेच काहीसे झाले होते. माझ्या मनामध्ये दुसरा विचार येत होता. आता चार वर्षांनंतर कोल्हापूर सोडून पुण्याला गेले पाहिजेल. नवे वातावरण आणि त्याचा अनुभव हाही महत्त्वाचा ठरेल.

पुणे हे एक ऐतिहासिक शहर आणि महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. अनेक राजकीय आणि सांस्कृतिक चळवळी या पुण्याहून सुरू होत असतात व तेथे या कायद्याच्या परीक्षेच्या निमित्ताने जर दोन वर्षे राहता आले, तर त्यामुळे माझा दृष्टिकोन अधिक व्यापक व्हायला मदत होईल.

शेवटी पुण्याला जाण्याचा मी निर्णय केला. परंतु हा निर्णय घ्यायला मदत झाली आत्माराम बापू पाटील यांची. या दरम्यान आत्माराम बापू पाटील यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. पुणे जिल्ह्यातील तळेगावचे श्री. पिंगळे या नावाचे देशभक्त ब्राह्मण घराणे आहे. त्यांची मुलगी शांताबाई आणि आत्माराम पाटील यांचा प्रेमविवाह ठरला. स्वाभाविकपणे त्याला दोन्ही बाजूंनी त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे जो विरोध व्हायचा, तो झाला. या प्रेमप्रकरणाची माहिती आत्माराम बापू मला सांगत होते.

मी म्हटले,

''तुमचा हा निर्णय असेल, तर लग्न करून टाका. परंतु त्या मुलीला विचार करावयास वेळ द्या. घाईघाईने निर्णय घेऊन नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा थोडा अवधी दिला, तर बरे होईल.''

तसा बराच अवधी होऊनही गेला होता. १९३७ साली आत्माराम बापू पाटलांच्या निवडणुकीनंतर हा विवाह सातारा येथे रजिस्टर पद्धतीने झाला. या विवाहाचे साक्षीदार म्हणून मी व डॉक्टर आठल्ये असे होतो. या लग्नानंतर आत्माराम पाटील यांनी पुण्यात बिऱ्हाड केले. पुण्याला कायद्याच्या अभ्यासासाठी मी येणार, असे कळताच त्यांनी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी राहावे, असा आग्रह केला. त्यांचे अगत्य पाहून मी तो स्वीकारला आणि जवळ जवळ एक वर्ष मी त्यांच्या कुटुंबात राहिलो. त्यातील काही दिवस आम्ही शुक्रवार पेठेतील एका चांगल्या घरात राहत होतो. राहण्याच्या मुदतीची अट मात्र सहा महिन्यांची होती. श्री. स. आ. जोगळेकर यांचे ते घर होते. त्यांच्या माडीवरचा एक मजला त्यांनी आम्हांला दिला होता.