आत्माराम बापूंचे आणि आमचे मतभेद जाहीर झाल्यापासून कार्यकर्ते मोठ्या अडचणीत सापडल्यासारखे झाले होते, त्या सर्व मंडळींना एकत्रित करून पुन्हा संघटनेला काही स्वरूप आणले पाहिजे, हा विचार माझ्या मनात होता. सर्व कार्यकर्ते जसे त्यांचे मित्र होते, तसे माझेही मित्र होते. त्यामध्ये वैयक्तिक मैत्रीचा काही भाग होता, ही गोष्ट जरी खरी असली, तरी राजकीय पक्ष आणि त्यासंबंधीचे विचार हेच आम्हांला एकत्र ठेवणा-या गोष्टी होत्या. विचारांचे अनुबंध मोकळे झाले, म्हणजे मैत्री ही, नाही म्हटले, तरी पोकळ ठरू लागते. तेव्हा याच वेळी जाऊन, या सर्व मित्रांशी बोलून त्यांना सावरले पाहिजे. कारण त्यांना सावरायचे, म्हणजे मला स्वत:ला सावरण्यासारखे होते.
मी जिल्ह्यातील जवळ जवळ प्रत्येक तालुक्यातील आमचे म्हणून जे कार्यकर्ते होते, त्यांना भेटलो. सर्वांची काँग्रेसनिष्ठा ही प्रमुख भावना होती. त्यामुळे आत्माराम बापूंनी काँग्रेस सोडून रॉयसाहेबांबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल एक प्रकारचे असमाधान आणि आश्चर्य वाटत होते. मी त्यांना सर्व परिस्थितीचे विवरण केले.
''मला रॉय यांच्या बुद्धिमत्तेचे व समाजवादी विचारांचे आकर्षण होते; तरी माझे पाय मी जमिनीवर ठेवून होतो, त्यामुळे वाहत गेलो नाही.'' असे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी सांगितले.
युद्धाचे पुढे काय होणार, अशा तऱ्हेचे प्रश्न लोक विचारीत, मी त्यांना सांगत असे,
''हे जागतिक युद्ध आहे व ते काही एकदम सर्वत्र गतीने चालते, असे नाही. युद्धाच्या डावांनी सबंध युरोप जाळ्यात सापडला आहे. आपापली तयारी करण्यात ते देश गुंतले आहेत. तेव्हा त्या युद्धाचे काय होईल, त्याचा विचार करण्यापेक्षा युद्ध वाढले, तर आपल्या देशाचे काय होईल, याचा विचार झाला पाहिजे. आणि जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येईल, त्यावेळी ती कृती करण्यासाठी आपण मनाने तयारीत असले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व तऱ्हेने संघटितही असले पाहिजे, याची जरुरी आहे.''
लोकांना हे सगळे समजत होते, कळत होते आणि काँग्रेस राज्य मंत्रिमंडळांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे हळूहळू यातून काही तरी कार्यक्रम निघणार आहे, अशी त्यांची भावना होती.
मला आठवते, या काळात मी वाळवे तालुक्यातील आमचे दुसरे आमदार श्री. चंद्रोजी पाटील ऊर्फ कारभारी यांना भेटलो. ते स्वत: युद्धाच्या बाबतीत सुभाषचंद्र बोसांच्या भूमिकेशी एकमत होते. त्यांचा माझा चांगला स्नेह होता. आणि त्यामुळे एकमेकांशी राजकारणावर फार मनमोकळेपणाने चर्चा करू शकत होतो. माझ्यापुढे आता कसलेच वैचारिक संदेह राहिले नसल्यामुळे मी त्यांना निश्चितपणाने सांगत होतो, की काँग्रेसला निश्चित कार्यक्रम घ्यावा लागेल. परंतु तोपर्यंत आपल्यामध्ये अंतर्गत मतभेद होऊ देता कामा नयेत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच वेळी मी त्यांना हेही सुचविले, की आपण नवे कार्यकर्ते मिळविले पाहिजेत. कॉलेजमध्ये जाणा-या नवीन तरुण मंडळींशी संपर्क साधला पाहिजे. त्यांना ही गोष्ट मान्य होती. आणि त्यांना सांगितले, की आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करावयाचे असले, तर मी तुम्हांला होतकरू मंडळींची माहिती करून द्यायला तयार आहे. कारण, नाही म्हटले; तरी आत्माराम बापूंच्या बरोबर जी थोडी-फार मंडळी काँग्रेस सोडून गेली होती, तेथे त्यांच्या जागी नव्या, जाणत्या, तरुण कार्यकर्त्यांची आम्हांला आवश्यकता होती. गेली होती ती मंडळी संख्येने किंवा गुणांनी जास्त होती, अशी परिस्थिती नव्हती. पण फूट पडली आहे आणि आमची आघाडी काहीशी कमजोर झाली आहे, अशी भावना जिल्ह्यात निर्माण झाली होती. त्यामुळे नवे कार्यकर्ते मिळविले पाहिजेत, अशी माझ्या मनाची धारणा होती.