कृष्णाकांठ११३

अभ्यासास उत्तम वातावरण होते. पुण्याला मी तसा नवा नव्हतो. पण पुण्याचे लॉ कॉलेज मात्र मी पहिल्या प्रथम पाहिले, तेव्हा नुकतीच लॉ कॉलेजची इमारत झाली होती. त्यामुळे मी पहिल्या दिवशी कॉलेजला हजर राहिलो, तेव्हा इमारत पाहताच मन प्रसन्न झाले. हनुमान टेकडीच्या उतरणीवर जवळ जवळ अर्धे पुणे दृष्टिक्षेपात येईल, अशा ठिकाणी ती इमारत बांधली होती. मी इमारत पाहात पाहात कॉलेजच्या लायब्ररीत जेव्हा गेलो, तेव्हा तर मी काहीसा चकितच झालो. इतकी चांगली लायब्ररी, वाचनाची केलेली व्यवस्थित सोय आणि इतके उत्तम वातावरण मी इतरत्र क्वचितच पाहिले असेल. आता त्या लायब्ररीचे वातावरण कसे आहे, हे मला माहीत नाही, पण मी पाहिले, त्या वेळची परिस्थिती ही अशी होती.

मी नित्यनियमाने कॉलेजला जाऊ लागलो. सायकलवरून शुक्रवार पेठेतून कॉलेज-टेकडीला जायला अर्धा एक तास लागायचा. मी हा प्रवास सायकलवरून करीत असे, त्यामुळे माझा मी मालक होतो. कायद्याचे शिक्षण घेत असताना शिक्षक मंडळी ब-यापैकी होती. त्यांमध्ये लक्षात राहतील, असे एक प्राध्यापक म्हणजे पुण्याचे प्रसिद्ध वकील श्री. ल. ब. भोपटकर हे होते. ते आम्हांला टॉर्ट (Tort) हा विषय शिकवीत असत. अनुभवी वकील, विषयावर व भाषेवर प्रभुत्व असले, म्हणजे उत्तम शिक्षक होऊ शकतो, याचे हे उदाहरण होते. दिवसातून दोन तास कॉलेजमध्ये राहावे लागत असे आणि इतर सर्व वेळ माझ्यासाठी मोकळा होता. मी सकाळी कॉलेजचे दोन तास करण्याकरता जात असे आणि नंतर तेथल्या लायब्ररीत बसून तेथेच वाचन करीत असे. प्रथमतः कायद्याची पुस्तके, नियतकालिके वगैरे पाहात असे. नंतर त्या लायब्ररीत असलेली दुस-या इतर विषयांची पुस्तके मी पाहू लागलो. वाचनासाठी आणि ज्ञानार्जनासाठी तेथे मोठे विशाल क्षेत्र होते.

हळूहळू पुण्यातल्या इतर काही व्यक्तींच्या ओळखी होऊ लागल्या. तेथे चाललेली वाङ्मयीन आणि राजकीय अभ्यास मंडळे, सभा, संमेलने यांस मी हजर राहू लागलो. पुण्याचे कम्युनिस्ट नेते श्री. विष्णुपंत चितळे हे आमच्या कराडमध्ये पुष्कळ वर्षे राहिले होते. त्यांची-माझी विशेष मैत्री होती, असे मी म्हणणार नाही; परंतु सुरेख स्नेह होता. कारण कराडमध्ये असताना मी त्यांच्याकडे जाऊन मार्क्सवाद समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असे. त्या वेळी त्यांनी सुचविलेली काही पुस्तके मी पुण्यामध्ये मिळविली आणि त्या विषयाचे अध्ययन सुरु केले. पुण्यात बरीच अभ्यास मंडळे सुरू असत. निदान त्या काळात तरी ही अभ्यास मंडळांची पुण्यामध्ये एक फॅशनच होती असे म्हटले, तरी चालेल. यांतल्या काही मंडळांमध्ये अधूनमधून मी जात असे. अर्थात ही अभ्यास मंडळे बहुधा राजकीय विचारांची असत. वेगवेगळ्या राजकीय तत्त्वज्ञानांचा तौलनिक विचार या अभ्यास मंडळांतून ऐकायला मिळे. त्यामुळे मन पुष्कळ प्रबुद्ध झाले.

अशा तऱ्हेने पुण्यात माझा काळ चालला होता आणि पुण्यामध्ये माझे मनही रमले होते. पूर्वी कोल्हापूरहून सातारा जिल्ह्यात मी वारंवार जात होतो, तसे आता जाता येणे अवघड होते. तरी पण महिना, दोन महिन्यांतून जाऊन मी माझ्या कार्यकर्त्या मित्रांशी माझा संबंध ठेवला होता.

१९३८ साल हे कसे गेले, ते कळलेच नाही. पण नंतर माझ्या लक्षात आले, की या साली कायद्याच्या अभ्यासापेक्षा मी इतर गोष्टींचाच अभ्यास जास्त करीत होतो. याचा परिणाम असा झाला, की १९३९ सालच्या माझ्या पहिल्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही.

निकालानंतर ही गोष्ट माझ्या मनाला लागून गेली. या प्रकारचा हा माझा पहिलाच अनुभव होता. कायद्याचा अभ्यास हा सर्वसामान्य वाचन करण्याकरता अभ्यास नसतो. त्याच्यामध्ये नेमकेपणा असावा लागतो आणि त्यासाठी बरेच पाठांतर करावे लागते. या पाठांतराची मला गोडी नव्हती. त्यामुळे एका विषयात मला मार्क कमी पडले होते. मी विचार केला, की चला, पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू. माझ्या पास-नापास होण्याचा माझ्या घरावर काही परिणाम झाला नव्हता, कारण मी त्यांना खरे ते सगळे सांगितले होते. हे सबंध वर्ष मी आत्माराम पाटील यांच्या घरी काढले. त्यांतील सहा महिने शुक्रवार पेठेत आणि पुढचे सहा महिने टिळक रोडवरील 'ऍक्सिडेंट' नावाच्या बंगल्यात आम्ही राहत होतो. मी माझी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही, याचे आत्मारामबापूंना आश्चर्य वाटले. त्यांना मी सांगितले, की मी स्वतंत्रपणे राहूनच माझा अभ्यास केला पाहिजे. नाही तर माझे दिवस फुकट जातील. हे एका अर्थाने बरोबर होते. कुठल्या तरी एखाद्या कुटुंबात राहून असा अभ्यास करणे हे अवघड आहे आणि त्याप्रमाणे मी माझ्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली. आणि पुढच्या सहा महिन्यानंतर मी ही परीक्षा उत्तीर्ण झालो.