राज्य पुनर्रचना प्रश्नामुळं वातावरणात गंभीरता अधिक भासली. मुंबईतील दंगलीमुळे कडक टीका करणारे अधिक भेटतात. आमच्या प्रांतासंबंधीचे हे गैरसमज सर्व देशात फार खोलवर रुजले. ते दूर करण्याचे प्रयत्न करणे फार अगत्याचे व महत्त्वाचे आहेत. चहाच्या वेळी नेहरूजींची भेट घेतली. दहा-पंधरा मिनिटे मला बाजूला घेऊन ते माझ्याशी आत्मीयतेने बोलले. माझ्या राजीनाम्यामुळे त्यांचा गैरसमज झाला नाही, असं वाटलं. उलट ते म्हणाले, 'तुमची मनःस्थिती आणि अडचण मी समजू शकतो.' मुंबईबद्दल कष्टी होऊन बोलले. मुंबई शहर राज्य का म्हणून नाकारलं हे त्यांच्या बुद्धीला अजूनही पटत नाही, असेही ते म्हणाले. वादग्रस्त प्रश्न थोड्या सावकाशीने सोडावे लागतील. या पद्धतीने मुंबईचा प्रश्न सुटेल, असे ते म्हणाले. मुंबई महाराष्ट्रात जाऊ नये अशी माझी भावना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या त्यांच्या बोलण्यावरून वर्ष-दोन वर्षांत योग्य वातावरण आणि संधी पाहून ते मुंबईचा निर्णय महाराष्ट्राच्या बाजूनं देतील, असा मी अंदाज काढला आहे. द्वैभाषिक राज्ये व्हावीत ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.
मी त्यांना सर्व पुढारी आणि पक्ष वगळून प्रत्यक्ष महाराष्ट्रीय जनतेला आवाहन करायची विनंती केली तेव्हा ते गहिवरून म्हणाले. ''हां, जरूर मी तसे करीन. दंगे गुंड करतात. सर्व जनतेला कोण दोष देईल ? महाराष्ट्रीय जनता शूर आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे.''
साहेबांचं पत्र वाचून माझ्या मनाचं समाधान झालं. साहेब आणि नेहरूजींची भेट होऊन साहेबांनी आपलं मन त्यांच्याकडं मोकळं केलं तेही बरं झालं. विरोधक साहेबांविषयी नेहरूजींचं मन कलुषित करण्याच्या प्रयत्नात असणारच. अमृतसरच्या अधिवेशनावर राज्य पुनर्रचना योजनेची छाया सर्वत्र पसरली होती. शिखांचा लाखोंचा मोर्चा पंजाबी सुभ्यासाठी येऊन धडकला होता. साहेब आणि गाडगीळ यांनी महाराष्ट्राची बाजू प्रभावीपणे श्रेष्ठींसमोर मांडली. या सर्व वातावरणात नेहरूजींचं भाषण हृदयस्पर्शी व भावनात्मक झालं. देशाविषयीची तळमळ तंच्या वक्तव्यातून जाणवत होती. निराशेचा कुठलाही सूर त्यांच्या भाषणात आढळला नाही; परंतु देशाविषयीची चिंता मात्र जाणवली.
अमृतसरच्या अधिवेशनातून विचाराची ऊर्जा घेऊन प्रांतीय नेतेमंडळी परतली. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या संदर्भात नेहरूजींनी काढलेल्या उद्गाराचा अर्थ साहेबांनी सकारात्मक काढला. आज ना उद्या नेहरूजी महाराष्ट्राला न्याय येणार याची खात्री साहेबांना पटली. समितीची चळवळ महाराष्ट्रभर सुरूच होती. जनता काँग्रेसच्या पुढार्यांवर रोष व्यक्त करू लागली. त्यातही साहेब हे त्यांचं प्रमुख लक्ष्य होतं. हारतुर्यांनी साहेबांचं होणारं स्वागत आता शाप, शिव्या, गद्दार म्हणून होऊ लागलं. फुलांऐवजी दगडधोंड्यांचा वर्षाव होऊ लागला. या सर्व प्रसंगाला तोंड देण्याचं साहेबांनी ठरवलं. 'लोकप्रतिनिधीवर रागावण्याचा अधिकार जनतेला लोकशाहीमध्ये असतोच' हे तत्त्व मान्य करून साहेब काँग्रेसच्या विचाराची शिदोरी सोबत घेऊन मुंबईबाहेर पडले.
प. महाराष्ट्रात सांगलीच्या पंचक्रोशीत विरोधक आपला प्रभाव पाडू शकले नव्हते. वसंतदादांनी सांगलीला साहेबांची सभा आयोजित केली. साहेबांनी त्या सभेला 'अमृतसर काँग्रेसचा संदेश' असं नाव दिलं. विरोधक सांगलीत काही गडबड करू शकत नव्हते. वसंतदादांच्या कार्यकर्त्यांची फौज कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यास सज्ज होती.