महाराष्ट्राच्या प्रश्नावर श्रेष्ठींनी फेरविचार करावा या मताचे दोन्ही गट होते. राजीनामे देऊन श्रेष्ठींवर दबाव आणून हा प्रश्न आपण सोडवू या विचाराचा हिरेंचा गट होता तर राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाही अशा विचाराचा साहेबांचा गट होता. 'या कमिटीला असे वाटते की, काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तात्याग करून जनतेत काम करावं व ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे' असा एक ठराव हिरेंनी काँग्रेस समितीसमोर ठेवला. साहेब आणि त्यांच्या पाठीराख्यांना हा परिच्छेद मान्य नव्हता. त्यावर वामनराव यार्दी यांनी एक उपसूचना सुचविली. 'जरूर तर' अशी ही उपसूचना होती. उपसूचना मतास टाकली असता समान मते पडली. देवगिरीकरांनी अपलं अध्यक्षीय मत उपसूचनेच्या बाजूनं दिलं. उपसूचना मंजूर करण्यात आली. मूळ ठरावावरही मतदान झालं. पुन्हा समान मतं पडली. यावेळेस देवगिरीकरांनी मात्र ठरावाच्या बाजूनं आपलं अध्यक्षीय मत दिलं. ठराव पास झाला. सर्वसाधारण सभेत हा ठराव हिरेंनी जिंकला. साहेबांचा पराभव झाला. ठरावावर मतदान होण्यापूर्वी साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं.
म्हणाले, ''जे राजीनामा देणार नाहीत तेही तितकेच तळमळीचे व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत असं ठरावात नमूद करण्यात यावं. हे मान्य असेल तर ठराव एकमतानं मान्य करू. या राजीनाम्यानं आपला हेतू साध्य होणार नाही. उलट पक्ष कमजोर होईल व आपल्या फुटीचा विरोधक फायदा उठवतील. यापूर्वी आपण दोन वेळा राजीनामे दिले होते. त्याची दखलही श्रेष्ठींनी घेतली नाही. यातून काहींना सवंग प्रसिद्धी मिळेल एवढाच काय तो फायदा.''
हिरे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न साहेबांनी करून बघितला; पण साहेबांना न जुमानता हिरेंनी आपला हट्ट पूर्ण केला. १२६ काँग्रेस प्रतिनिधींच्या सभागृहात दहा मतांनी साहेबांच्या विचाराचा पराभव झाला. विजयीवीराच्या आविर्भावात हिरे, कुंटे आणि देवगिरीकर दिल्लीला पोहोचले. ढेबरभाईंना हिरेंनी राजीनाम्याचा मनोदय सांगितला. नेहरूजींनाही ही मंडळी भेटली. नेहरूजींनी हिरेंच्या खांद्यावर हात टाकला व त्यांना बाजूला घेऊन प्रेमानं 'असं काहीं करू नका' म्हणून समजावलं. हिरे हे नेहरूजींच्या कृतीनं हुरळून गेले व मुंबईला परतले. राजीनामा नाटकाच्या तिसर्या अंकावर पडदा पडला. आजपर्यंत साहेब महाराष्ट्राच्या आंदोलनात हिरेंचं नेतृत्व मानत होते. राजीनामाच्या या घटनेपासून साहेबांनी हिरेंना 'तुमचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत' अशी स्पष्ट कल्पना दिली. तिसर्या वेळीही राजीनामा देण्यासाठी आग्रही असलेले हिरे यांनी राजीनामा दिला नाही. त्यांच्या या उतावळ्या स्वभावामुळं साहेबांनी हिरेंचं नेतृत्व नाकारलं.
पं. पंत अमृतसर काँग्रेसच्या बैठकीपासून द्वैभाषिक राज्याच्या निर्मितीचे पुरस्कर्ते होते. त्यादृष्टीनं त्यांनी महाराष्ट्रीयन नेत्यांच्या मनाची चाचपणी करावयास सुरुवात केली होती. देव आणि हिरे यांनी प्रदेश काँग्रेसला अंधारात ठेवून दिल्लीत परस्पर विचारविनिमय सुरू केला होता. सर्वोदयवादी नेतेही पं. पंतांच्या गळाला लागले होते. या सर्व प्रकरणात सी. डी. देशमुख मात्र अनभिज्ञ होते. त्यांनी तिसर्यांदा आपला राजीनामा नेहरूजींकडे दिला. देशमुखांचा राजीनामा समितीच्या पथ्यावर पडला. त्यांनी राजीनाम्याचं भांडवल करून महराष्ट्रात श्रेष्ठींच्या विरोधात वातावरण कलुषित करण्यास सुरुवात केली.
टिळकांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर नेहरूजींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच दिवशी शनिवारवाड्यासमोर समितीनं आपली सभा ठेवून नेहरूजींच्या सभेला अपशकुन दाखविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला जनतेनं हाणून पाडलं. पुणेकरांनी लाखोंच्या उपस्थितीनं नेहरूजींचं स्वागत केलं. शनिवारवाड्यासमोरही सभेला जनसागर लोटला होता. दोन्ही सभेची तुलना करण्यात काही मंडळी गुंतली होती. नेहरूजी १ ऑगस्टला पुण्यातील सभेत महाराष्ट्राबद्दल काही मत व्यक्त करतील असा समज काही मंडळींचा होता; परंतु महाराष्ट्राबद्दल नेहरूजींनी या सभेत एक चकार शब्दही काढला नाही.