मुंबईबाबतचा निर्णय नेहरूजींनी जाहीर करताच मुंबईतील जनता रस्त्यावर उतरली. कुणी नेता नाही, कुणाचा आदेश नाही. मुंबईच्या प्रेमापोटी आपल्या सर्वस्वाची आहुती देण्याचा निर्णय घेऊन मुंबईतील जनता पेटून उठली. मुंबईत दंगल उसळली. लोकांनी कायदा हातात घेतला. गिरगाव, ठाकूरद्वार भागात जनतेच्या रागात ट्रॅम, बसगाड्या भस्मसात झाल्या. जनतेच्या या रागाला आवर घालण्यासाठी पोलिसांना पहिला गोळीबार या भागात करावा लागला. जमावावर हकनाक लाठीहल्ला, गोळीबार करून जनतेच्या भावना चिथविल्या. आठ दिवस दंगल सुरूच होती. मुंबई धुमसत होती. धरपकड, गोळीबार, लाठीहल्ले यांचा धुमाकूळ शहरभर पोलिस घालीत होते. पोलिसांनी शहरात दहशत निर्माण केली. हे आंदोलन शहरापुरतं मर्यादित न राहता त्याचे पडसाद पुणे, कोल्हापूरपर्यंत पोहोचले. दंगलीचे पडसाद मुंबईच्या गल्लीबोळात उमटताना दिसत होते. १७ जानेवारीला हरताळ पुकारला. या दिवशी मुंबईला युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. लोक पोलिसांच्या अंगावर ऍसिडबल्ब फेकत होते. पोलिसांचा गोळीबार सुरूच होता. काही भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. मोरारजींनी मुंबईच्या परिस्थितीची कल्पना नेहरूजींना दिली. नेहरूजींनी असामाजिक उपद्रवी लोकांच्या तावडीतून मुंबई वाचविण्यासाठी सैन्याची मदत घेण्याचे आदेश दिले. मोरारजींनी सैन्याचा वापर केला नाही. या धगधगत्या मुंबईत कुणीही पुढारी जनतेसोबत नव्हता. लोक पोलिसांच्या गोळ्या छातीवर झेतील होते. 'संयुक्त महाराष्ट्र' म्हणत दम तोडीत होते. बळींची संख्या वाढू नये म्हणून एस. एम. जोशी जनतेत घुसले. जनतेला शांत राहण्याची विनवणी करू लागले. चवताळलेल्या जनतेनं एका पोलिस अधिकार्याला घेरलं. कदाचित जोशींनी त्या अधिकार्यांची जनतेच्या तावडीतून सुटका केली नसती तर जनतेनं त्या अधिकार्याचा जीवन घेतला असता. त्याचे प्राण वाचविले. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेला वार्यावर सोडून दिलं होतं. त्यांनी फक्त गुंडगिरीचा निषेध म्हणून एक पत्रक काढलं होतं.
कांगावेखोर मोरारजींनी या दंगलीचा संबंध स्त्रियांच्या अब्रूशी जोडला. गुजराती स्त्रियांवर गुंडांनी अत्याचार केले, गुजराती स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली, असे त्यांच्यासारख्या नेत्याला न शोभणारे आरोप त्यांनी केले. हे सर्व आरोप खोटे होते. कारण कुठल्याच पोलिस स्टेशनला तशी तक्रार नोंदवलेली आढळली नाही. कुणी तक्रार करायला पुढे आले नाही. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली कपोलकल्पित घटना सांगितली. तीन महिलांना गुंडांनी विवस्त्र करून रस्त्यावर फरफटत ओढून नेलं. ही घटना मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. यात सत्यता किती आणि असत्यता किती हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या महिलांनी संपूर्ण भागात फिरून गुजराती महिलांच्या भेटी घेतल्या. त्यांना एकाही महिलेनं अशी घटना घडल्यांच सांगितलं नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री ही दोन्ही पदे उपभोगणार्या मोरारजींना या अन्याचा छडा का लावता आला नाही ? म्हणजेच त्यांच्या म्हणण्यात सत्यता नव्हती. स्त्रियांच्या अब्रूला चव्हाट्यावर मांडून त्याआड लपण्याचा केविलवाणा प्रयत्न मोरारजी देसाईंनी केला. संयुक्त महाराष्ट्र समितीचं म्हणणं पोलिसांनी १०५ लोक ठार मारले. लालजी पेंडसे यांनी नावानिशी वर्तमानपत्रात यादी प्रसिद्ध केली. शासनातर्फे आकड्यांचा घोळ चालूच होता. कधी ६७ तर कधी ७५ लोक ठार झाले असं शासन सांगत होते. आकड्याचा घोळ काही जरी असला तरी शासनाने मराठी जनतेचे बळी घेतले होते हे सत्य आहे.
मोरारजींवर असेंब्लीत प्रतिनिधींनी आरोप केला की, तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता गोळीबाराचा आदेश कसा दिला ?
त्यावर मोरारजींनी उत्तर दिलं, ''हा माझा आदेश नव्हता. तो पोलिस कमिशनरचा आदेश होता.''
स्वतःच्या जबाबदारीवर पोलिस कमिशनर असा आदेश देऊ शकतो हे न समजण्याएवढी मराठी जनता दुधखुळी नव्हती. या सर्व घटनांची जाहीर चौकशी व्हावी, अशी मागणी केशवराव जेधे व काकासाहेब गाडगिळांनी केली. रावसाहेब पटवर्धनांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला तर देवगिरीकरांनी चौकशीला विरोध केला. देवांनी नेहरूजींकडे नाराजी व्यक्त केली व आत्मशुद्धीसाठी ११ दिवसांचे उपोषण आरंभिले या उपोषणाबद्दल कुणालाच आस्था उरली नव्हती.