माझं राजकीय जीवन जनतेपुढं खुलं आहे. माझं कार्य जर जनतेला पसंत नसेल तर ते मला घरी बसवतील; पण विरोधकांना तो अधिकार नाही... शेवटी आपल्याला एकात्म महाराष्ट्र हवा असेल तर महाराष्ट्राबाहेरील आपल्या पक्षातील लोकांचं मतपरिवर्तन आपल्याला करावं लागेल. त्यांच्या मतपरिवर्तनावर मुंबईचं भवितव्य अवलंबून आहे. संयुक्त महाराष्ट्र भारतीय नकाशात चार ठिकाणी विखुरला होता. नागपूर हिंदी भाषिक राज्यात, मराठवाडा हैदराबाद संस्थानात अडकला होता. मुंबईवरील गुजरात आपला हक्क सोडायला तयार नाही. शेवटी महाराष्ट्र शिल्लक राहतो तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या रूपानं. आम्हाला संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश मिळवायचा आहे. आपल्या सनदशीर मार्गानं संयुक्त महाराष्ट्र मिळवायचा आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, अशी विनंती मी तुम्हास करीत आहे. माझी चिंता तुम्ही करू नका. माझी वाली नियती आहे. तिच्यावर माझा विश्वास आहे. 'कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही' ही आपल्या पूर्वजांची म्हण आपल्याला ठावूक आहे. तशातला प्रकार माझ्यात आणि विरोधकांत आहे. मुंबईचा माझा हट्ट मी सोडणार नाही. नेहरूजींकडून तो मी मिळविणारच. सामान्य जनता आता कुठे डोळे उघडून भवितव्याकडे पाहत आहे तोच त्यांना रस्त्यावर उतरविण्याची भाषा बोलली जात आहे. तुम्हाला फसविण्याचा डाव या मंडळीनं टाकला आहे. त्यात तुम्ही अडकू नये म्हणून तुम्हाला सावध करायला मी आलो आहे.''
साहेबांचं म्हणणं पटतंय. धोका पत्करून साहेब जनतेच्या मनातील किल्मिष, जळमटं काढून टाकण्याचाप्रयत्न करीत आहेत. देव आणि हिरे यांच्याबद्दलच्या विश्वासार्हतेला उतरती कळा लागली होती. ते दिल्लीत एक बोलत व महाराष्ट्रात आले की वेगळेच बोलत. साहेबांच्या स्पष्ट भूमिकेमुळं साहेबांचं नेतृत्व तळागाळापर्यंत रुजू लागलं. साहेबांची वेगळीच प्रतिमा निर्माण होऊ लागली. देव आणि हिरे हे साहेबांना टाळू लागले. साहेबांच्या हे लक्षात आल्यानंतर हिरेंना प्रेमानं याची जाणीव साहेबांनी करून दिली.
दरम्यान, मोरारजींनी २७ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत असेंब्लीत राज्य पुनर्रचना समितीच्या अहवालावर चर्चा घडवून आणली. त्रिराज्य योजनाचा ठराव मतास टाकला. काँग्रेसच्या सदस्यांनी विरोधात मतदान करायचं नाही असा पक्षाचा आदेश होता. पी. के. सावंत आणि कोकणातल्या प्रतिनिधींनी मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करावी अशी उपसूचना मांडण्याचा प्रयत्न केला. मोरारजींनी पी. के. सावंत यांची उपसूचना फेटाळून लावली. ठराव बहुमतानं पास झाला. उपसूचना मांडणार्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चा सुरू झाली. या कार्यवाहीमुळं पक्ष कमकुवत होईल अशी भूमिका साहेब आणि हिरेंनी घेतली. साहेब आणि हिरेंनी मध्यस्थी करून शिस्तभंगाची कार्यवाही टाळली.
अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन मुंबईला घ्यायचं घाटत होतं. नेहरूजींकडे महाराष्ट्राची मागणी तत्त्वतः मान्य करण्याचं साकडं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं घातलं. ती मागणी मान्य करून या अधिवेशनात जाहीर करावी असा आग्रह धरल. २ जून १९५६ ला मुंबईत अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या ठिकाणी वातावरणात तणाव जाणवत होता. संयुक्त महाराष्ट्र समितीनं आक्रमकपणे अधिवेशनाच्या ठिकाणी घोषणांनी वातावरण दणाणून सोडलं. नेहरूजींसाठी हे सर्व नवीनच होतं. नेहरूजी जेथे जातील तेथे त्यांचं स्वागत उत्साहवर्धक व्हायचं. प्रथमच निषेधाच्या घोषणांनी त्यांचं स्वागत होऊ लागलं. चौपाटीवरील भाषणाच्या वेळेस या घोषणांची प्रखरता जास्तच वाढली होती. अधिवेशनस्थळापासून ते राजभवनाच्या रस्त्यावर हजारो मुंबईकरांनी काळे झेंडे दाखवून नेहरूंच्या विरोधी घोषणा दिल्या. 'मराठी भाषिक प्रदेशासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' अशा घोषणांनी संपूर्ण मुंबई दुमदुमली.