थोरले साहेब - १०७

मुंबईच्या प्रश्नावर देव, गाडगीळ आणि मोरारजी या त्रिकुटानं एकत्र बसून मार्ग काढावा असं पंतांनी सुचविल्याप्रमाणे गाडगिळांना डावलून देव कामाला लागले.  मोरारजी आणि देव यांची चर्चा मुंबईत २८ डिसेंबरला झाली.  दोन-तीन बैठकांनंतर मोरारजींनी द्वैभाषिकांच्या पर्यायास मान्यता दिली.  त्यात ५ वर्षांनंतर विभक्त होण्याच्या अटीस मान्यता दिली नाही.  द्वैभाषिक राज्य मोरारजी मान्य करीत असतील तर या द्वैभाषिकाचं मुख्यमंत्रीपद मोरारजींकडे ठेवण्याचं या चर्चेत देवांनी मोरारजीस आमिष दाखविलं होतं.  मुख्यमंत्रीपदाचा आडाखा मनात ठेवून मोरारजींनी द्वैभाषिक राज्यास मान्यता दिली.  बंगलोरहून दिल्लीला परत जाताना नेहरूंनी २९ डिसेंबरला दोन तास मुंबईत थांबून जी चर्चा केली त्या चर्चेतील सुगावां मोरारजींना लागला असावा.  यासंदर्भात देवांनी हिरेंच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक घेतली.  या बैठकीला डॉ. नरवणे, घारपुरे, देवगिरीकर, कुंटे, रामराव देखमुख, रा. कृ. पाटील व खुद्द साहेब हजर होते.  देवांनी आपली योजना सर्वांसमोर मांडली.  देवांच्या या योजनेबद्दल कुणीही राजी नव्हतं.  गुजरात काँग्रेसमध्येही वेगळी अवस्था नव्हती.

संयुक्त महाराष्ट्र परिषदेलाही फुटीची लागण झाली.  प्रजासमाजवादी आणि कम्युनिस्टांनी अलग-अलग चुली मांडल्या.  एस. एम. जोशी यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक तत्पर बोलवावी असा तगादा देवगिरीकर यांच्यामागे लावला.  मुंबई अशांततेच्या ज्वालामुखीवर उभी होती.  जनतेच्या रोशाचा उद्रेक केव्हा होईल याचा नेम नव्हता.  देवगिरीकरांना बैठक बोलावण्यास वेळच मिळाला नाही.  जानेवारी महिना मुंबईच्या जीवनात काळ म्हणून ठरला.  अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख अडचणीत सापडले.  हिरेंच्या उतावळ्या स्वभावामुळं दिल्लीत महाराष्ट्राचं हसं होऊ लागलं.  मुंबईचं स्वतंत्र राज्य असावं की केंद्रशासित याबद्दलचा निर्णय होत नव्हता.  हिरेंनी दिल्लीत चिंतामण देशमुखांची भेट घेतली.  या भेटीत मुंबई हे स्वतंत्र राज्य करावं याबद्दल शब्द देऊन आले.  चिंतामणराव देशमुखांनी ७ जानेवारीला पं. पंत यांची भेट घेतली.  महाराष्ट्रातील हिरे यांची मुंबईबद्दलची भावना त्यांच्या कानावर घातली.  पंतांचा यावर विश्वास बसेना.  चिंतामण देशमुख सांगताहेत त्याअर्थी हिरेंचा निर्णय सत्य असावा.  तरीही पंतांनी चिंतामण देशमुखांना महाराष्ट्रातील प्रतिनिधीचं मत वेगळं आहे याची कल्पना दिली.  हिरे हे देवगिरीकरांसोबत जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा देशमुखांना भेटले.  मुंबईबद्दल मी असं म्हटलोच नाही, असं म्हणाले.  

देशमुख चिडले व म्हणाले, ''मला तुम्ही तोंडघशी पाडता आहात.''

मुंबई केंद्र सरकार ताब्यात घेणार याची पुसटशी कल्पना विरोधी पक्षांना आली होती.  त्याविरोधात जनआंदोलन उभं करण्याच्या कामात ते गुंतले होते.  इकडे प्रदेश काँग्रेसनं १५ जानेवारीला एक बैठक बोलावली.  हिरे या बैठकीला हजर होते; पण त्यांनी भाषण केलं नाही.  या सभेत बर्‍याच वक्तयांनी गाडगिळांकडे राजीनाम्याची मागणी केली.  मोरारजी या घटनेकडे बारीक लक्ष ठेवून होते.  कायदा आणि सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवला.  नेहरूजींनी मुंबईबद्दलची अधिकृत घोषणा आकाशवाणीवरून १६ जानेवारीला केली.  त्याअगोदर काही तास मोरारजींनी धरपकड सुरू केली.  घोषणा झाली त्या वेळी ४३५ लोकांना प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक केली.  १२ नेत्यांना ते झोपेत असतानाच अटक करून त्यांची रवानगी नाशिकच्या तुरुंगात केली.