साहेब या सभेत म्हणाले, ''मी देव यांचे नेतृत्व मानीत नाही. मी आजपासून त्यांचं नेतृत्व झुगारून लावीत आहे. यापाठीमागे माझे काही वैयक्तिक विचार आहेत. एकतर देव हे या वेळी काँग्रेसचे साधे सभासद नाहीत. काँग्रेस पक्षाच्या आमदारांचे राजीनाम मागण्याचा त्यांना तसा अधिकार पोहोचत नाही. प्रदेश काँग्रेसचा राजीनामा द्या, म्हणून आदेश नाही. ही वस्तुस्थिती असताना त्यांचं नेतृत्व कशासाठी स्वीकारायचं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. उपोषण, मोर्चे, हिंसाचार या मार्गांचा अवलंब करणे हे पक्षाच्या ध्येयधोरणात बसत नाही व तसा आदेशही नाही. देव यांच्या निर्णयामुळं राज्यात अस्थिरता निर्माण होत आहे. या अस्थिरतेचा फायदा विरोधी पक्षावाले उचलीत आहेत. आपण आपल्याच श्रेष्ठींच्या विरोधात काम करीत आहोत, असा याचा अर्थ निघतो. म्हणून मी म्हटले, की वगि कमिटीचे आदेश पाळेल. मी राजीनामा दिला नाही म्हणजे मी संयुक्त महाराष्ट्र या मागणीच्या विरोधात आहे असा अर्थ कुणी काढू नये. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे; पण तो तुटक-तुटक नको. सर्व मराठी बांधव एका छताखाली यावयास पाहिजे ही माझी भूमिका आहे. हे मिळविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहील. त्याकरिता हिंसेचा मार्ग मी पत्करणार नाही. श्रेष्ठींचं हृदयपरिवर्तन करूनच आपण आपल्याला पाहिजे तो महाराष्ट्र मिळवू शकतो. माझ्यावर असाही आरोप करण्यात येतो की, मला सत्तेची लालसा आहे. मला जर प्रदेश काँग्रेसनं राजीनामा मागितला तर तो मी तत्काळ द्यावयास तयार आहे. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात पक्षासाठी त्यागच करीत आलो आहे. यापुढेही करीत राहणार.... आज या सभेत जे मी बोलत आहे त्याची लेखी कल्पना हिरे आणि देव यांना दिली आहे. त्यांनी माझ्या या विचारांकडे कानाडोळा केला आणि दिल्लीला निघून गेले...''
याच सभेत साहेबांनी संयुक्त महाराष्ट्र व नेहरूजी यांच्यासंदर्भात आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं. त्याचं भांडवल स्वकीय व विरोधकांनी करून साहेबांना राजकीय जीवनातून उठविण्याचा आटापिटा केला. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादळ उठेल याची कल्पना साहेबांना होती. वक्तव्य करण्यापूर्वीच आपल्या भाषणात त्यांनी त्या वक्तव्याचं विश्लेषण केलं होतं.
साहेब संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, ''संयुक्त महाराष्ट्र की नेहरूजी ? असा पेच माझ्यापुढे आला तर मी नेहरूजींनाच कौल देईल. हे वक्तव्य मी विचारपूर्वक करत आहे. यातून अनेकजण वेगवेगळे अर्थ काढतील; पण या पाठीमागची माझी भावना काय आहे ती आपल्यासमोर मांडणं माझं कर्तव्य समजतो. यातून एक अर्थ असा लावला जाईल की, मी नेहरूजींना महाराष्ट्रापेक्षा मोठा समजतो. म्हणजेच मी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात आहे. या म्हणण्यामागचा माझा असा उद्देश आहे की, नेहरूजी हे भारताचे प्रतीक आहेत. महाराष्ट्र हा भारताचा एक भाग आहे. भारत राहिला तर महाराष्ट्र राहील. भारताचं अस्तित्व अमान्य केलं तर महाराष्ट्राला नाकारण्यासारखं होईल. महाराष्ट्र हा देश नाही तर भारत हा देश आहे. भारताच्या हितातच महाराष्ट्राचं हित सामावलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राबद्दल माझं मत यापूर्वीच मी व्यक्त केलं आहे. त्या वक्तव्याशी मी बांधलेला आहे. या महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या संदर्भात अनेक अंतर्गत प्रवाह कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी काहींच्या कार्याबद्दल मला शंका येते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आडून राज्यात अस्थिरता निर्माण करून वर्णवर्चस्वाचा हेतू साध्य करण्याच्या ध्येयानं ही मंडळी कार्यरत आहे. त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे असं मला वाटतं.''
फलटणच्या या सभेत साहेबांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमती दर्शवीत लक्ष्मणशास्त्री जोशी, बाळासाहेब देसाई आणि किसनवीर यांनी साहेबांची पाठराखण करीत देव यांच्यावर हल्ला चढविला.