ता. १४ रात्री (रोम)
दोन वाजता असीसीला पोहोचलो. दोन तासांचा प्रवास आहे. मोटारवाहतुक नव्हतीच. त्यामुळे प्रवास जलद झाला...एका सुरेख डोंगरखोऱ्यांतून प्रवास आहे. अधून मधून इतिहासकालीन, मध्ययुगीन, डोंगरमाथ्यावर वसलेली गडवजा गावे दिसतात. आपल्या गडापेक्षा फारच वेगळी. There are Roaman towns on hill tops. मजूबत व चढत्या क्रमाने बांधलेली डोंगरमाथ्यावरची ही घरे व सर्वांत शेवटी उंच ठिकाणी असलेली प्रासादतुल्य कोठी.
या निसर्गरम्य परिसरात ही गावे लक्ष वेधून घेतात. असीसी असेच एक मध्ययुगीन गाव आहे. सेंट फ्रॅन्सिसचे जन्मस्थळ आणि त्याच्यामुळे इतिहासप्रसिध्द बनलेले आहे. शेकडो वर्षांचा इतिहास आहे.
येथील 'टेंपल ऑफ मिनर्व्हा' हे ख्रिस्तपूर्वकालीन मंदिर आहे. त्याच्या अंतर्भागात आता चर्च आहे. पण हे सर्व विसंगत वाटते. या गावाच्या वर एका उंच ठिकाणी ज्या गुहेत सेंट फ्रॅन्सिस प्रार्थना करीत असत ती गुहा पाहिली.
येथील सर्व वातावरण पाहिले म्हणजे हे ख्रिस्ती संत आपल्या संत-ॠषी-सारखेच वाटतात. तशीच तपश्चर्या. सर्व परित्यागाचे व्रत. पक्षी-प्राण्यांवरील प्रेम. मानवतेची सेवा. हे सर्व ॠषीधर्म त्यांच्या जीवनात पहायला सापडतात. आणि मग तो ख्रिस्ती की हिंदू की आणखी कोणी याला तसे फारसे महत्त्व राहात नाही.
या संतांच्या स्मरणार्थ बांधलेले सर्व हे एक कलामंदिर झाले आहे. त्या काळच्या प्रख्यात चित्रकारांनी सेंट फ्रॅन्सिस्च्या जीवनावर काढलेली कलात्मक चित्रे शेकडो वर्षे झाली तरी त्या संतजीवनाची स्मृती देत आजही तेथे आहेत. हजारो प्रवासी ते येऊन पाहतात, आनंदी होतात. मी त्याचपैकी एक. मन विन्रम झाले. उभ्या उभ्या प्रार्थनेसाठी डोळे आपोआपच मिटले.
काल रात्री गडद धुक्यातून प्रवास करीत, वाट चुकत चुकत फ्लॉरेन्सला पोहोचलो. It was quite an adventure. रात्री हॉटेलमध्ये झोपलो.
आज सकाळी उठताच संक्रांतीची आठवण झाली. कशामुळे माहीत आहे? छोटी बॅग कशासाठी तरी उघडली तर समोर तिळगुळाचे पाकीट! आरामशीर माझे मलाच तिळगूळ दिले आणि मनामनाने तुलाही. श्री. शरद उपासनी थोडया वेळाने आल्यानंतर 'गोड बोला' च्या पुकाऱ्यात त्यांनाही दिले. तीळगूळ घ्या - गोड बोला.