विदेश दर्शन - ६२

युरोपमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराचे ऐतिहासिक कार्य यांनी केले. रोमन लोकांनी यांचा अतोनात छळ केला. पुढे येथे एक छोटे चर्च बांधले व ते पुन्ह: पुन्हा बांधत बांधत आले. आजचे चर्च ३००-४०० वर्षांपूर्वी बांधले गेले. मॅन्किलाँजेलने याची व त्या चर्चसमोर असलेल्या विशाल चौकाची आखणी आणि बांधणी केली. आत रॅफेल, तो स्वत: आणि बर्निनी यांच्या कलाकृतींनी सौंदर्याचा बहर आणला आहे.

ख्रिस्ताला सुळावरून उतरवून त्याचा मृतदेह मांडीवर घेऊन त्याची माता मेरी बसली आहे, ही मूर्ती जागातील एक अत्यंत सर्वश्रेष्ठ कलावस्तू मानली जाते. कितीतरी वेळ मी ती पहातच राहिलो. मनांचे व डोळयांचे तरीही समाधान अपुरेच राहिले.

नंतर चॅपेल - १६ पाहिले. मिकिलाँजेलोची चित्रकला येथे पूर्ण बहरली आहे. नंतर रोमचे बाहेर फार जुने सेंट सेबॅस्टर चर्च पाहण्यासाठी गेलो. या चर्चखाली मैलोगणती भुयारे आहेत.

रोमन सत्तेच्या काळात ख्रिस्ती लोक आणि धर्मप्रसारक छळाच्या भीतीमुळे येथे राहात. ही भुयारे म्हणजे त्यांची स्मशानभूमी व राहण्याची वसाहत - दोन्हीही होती. याचे कारण काय असावे अशी जेव्हा मी विचारणा केली तेव्हा जे कारण सांगितले गेले ते मोठे मजेदार आहे.

रोमन साम्राज्याचा एक कायदा असा होता की, शत्रू किंवा मित्र इतर कोणीही असो, त्याच्यावर स्मशानभूमीत हल्ला करावयाचा नाही किंवा त्याचा छळ करावयाचा नाही. हा कायदा रोमन सत्ताधारी फार काटेकोर पध्दतीने पाळीत. म्हणून ख्रिस्ती लोकांनी स्मशानभूमीतच तळ ठोकला. ही भुयारे पहात असताना त्या काळात त्याच्या भिंतीवर एका ठिकाणी 'स्वस्तिक' चितारलेले आढळले. संशोधकांना एक नवीन पुरावा हाती आला असला पाहिजे.
घाई-घाईने परत हॉटेलात आलो आणि कसेबसे काही खाऊन घेतले. आता २॥ वाजता विमानतळाकडे निघावयाचे आहे. जाण्यापूर्वी हे सर्व लिहून घेतले.

आठ दिवस भर्रदिशी निघून गेले. हा प्राचीन देश, त्याची सौंदर्यस्थळे आणि त्यांच्या संस्कृतीचे पुरावे पहावयाला मिळाले. याचा आनंद मनात साठवून आता परतीच्या रस्त्यावर - दिल्ली, मुंबईची - वर्तमानपत्रे आज पाहिली.

महाराष्ट्रात सर्व पोटनिवडणुकीत झालेले पराभव धक्का देणारे वाटले. कठीण प्रश्न - न सुटलेले गुंतागुंतीचे प्रश्न - व रागावलेले लोक यांच्याकडे परत येतो आहे. पण ते घरचे प्रश्न आणि घरचे लोक आहेत. त्यांच्यातच राहावयाचे आहे आणि त्यांच्यासाठीच मरावयाचे आहे. घरी परतण्यास मन अत्यंत उत्सुक आहे.