३० रोम
१९ जानेवारी, १९७४.
काल दुपारी C 20 ची बैठक फारच रंगली. Communique वर चर्चा सुरू झाली आणि सारे वातावरण रंगून गेले.
तेल-उत्पादक (oil producing) देशांचे प्रतिनिधी अगदी लढाऊ पवित्र्यात आले. त्यांचे म्हणणे तेल किंमती, बाजारभावाचे चढउतार आर्थिक नियमानुसार होतात, तशा वाढलेल्या आहेत. अविकसित देशांवर त्या किंमतीमुळे काहीशी आपत्ती आली हे खरे. परंतु आमच्या शक्तिनुसार आम्ही बाजारभावाने या देशांना कर्जे वगैरे देऊ. एकूण सर्व दांभिकपणा होता.
अर्थात् आमच्या दृष्टीने तेलवाले देश आणि प्रगत धनी देश हे दोघेही सारखेच आहेत. आज यांनी तेलाची किंमत वाढ करून अरिष्ट निर्माण केले आहे तर दुसरे नेहमीच आवश्यक त्या वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवून गबर होत आले आहेत.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा यांनी गेली दोन वर्षे गव्हाच्या किंमती अशाच बेफाट वाढवून आमच्या देशाची दुर्दशा केली हे आम्ही कसे विसरावे?
परंतु आज तेलाच्या प्रश्नामुळे या विषयाची चर्चा C 20 मध्ये झाली. तेली देशांबद्दल आम्हाला स्पष्ट बोलणे भाग होते. तेही तोलून बोललो. त्यांच्या वस्तूंच्या किंमती ठरविण्याचा त्यांचा अधिकार मान्य. त्यांना कोणी धाकदपटशा करू नये हेही मान्य. परंतु आमच्यावर अरिष्ट आले आहे हे स्पष्ट केले. त्यामुळे तूर्त अमेरिका आणि कं. आमच्या (म्हणजे नॉन ऑईल प्रोडयुसिंग डेव्हलपिंग नेशन्स) प्रश्नांची तरफदारी करीत आहेत.
श्री. शुल्ट्झ् व तेली देश यांच्यात खूपच चकमक झाली. काही देवाण-घेवाण झाली व कसे बसे कम्युनिक तयार झाले. आठवणीत राहण्यासारखा प्रसंग होता.
Words for which they fought were not important by themselves. They were symbols of the attitudes they represented.
आज सकाळी उठून थोडे फार-शॉपिंग केले. नंतर व्हॅटिकन पहावयाला गेलो. गेली वर्षानुवर्षे ज्याच्याबद्दल ऐकले, वाचले ते आज थोडेफार पाहिले.
व्हॅटिकन ही पोपची राजधानी. याला स्वतंत्र देशाचे स्थान आहे. रोम शहरातील एका विस्तीर्ण भागात सलग असे हे छोटेसे शहरच आहे.
प्रथम सेंट पीटर्स चर्च पाहिले. मला वाटते जगात इतके महत्त्वपूर्ण, सुंदर व विशाल चर्च दुसरे नसावे. सेंट पीटर आणि सेंट पॉल हे ख्रिस्ताचे दोन शिष्य इस्त्राएलमधून ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी रोममध्ये आले व तेथेच हुतात्मा झाले.