विदेश दर्शन - ६२

२९ रोम
१६ जानेवारी, १९७४

काल सकाळी रोम 'पहाण्यासाठी' बाहेर पडलो. विशेषत: जुने रोम - प्राचीन रोम.

काही जुने अवशेष पाहिले. इतिहासाची गतिमानता, झालेले बदल यांचा चित्रपटच पाहावयाला मिळतो. व्हॅटिकन अजून पहावयाचे आहे. मिकिलॉन्जेलोची मोजेसची प्रतिमा पाहिली. बराच वेळ, निरखून पहात बसून राहिलो. थोर कलाकृती पहाण्याचा निखालस आनंद म्हणतात तो अनुभवला. शहरातील प्रसिध्द चौक पाहिले. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही इतिहास आहे.

दुपारचे जेवण सौ. नलीनी पंत यांचे स्वीकारले होते. तासाभराचा प्रवास करून तेथे पोहोचलो. एका शांत अशा 'कौंटी हाऊस' मध्ये ते राहातात. गोल्फ टेनिस - रेसच्या घोडयांच्या ट्रेनिंगची मैदाने याच्या परिसरात हे घर आहे. त्या परिसरातच एका छोटेखानी रेस्टॉराँमध्ये लंच घेतले. मला एकंदरीत वातावरण आवडले. विश्रांतीसाठी अशा ठिकाणी येऊन राहिले पाहिजे.

श्री. प्रसाद, मनमोहन, जगन्नाथन्, ६ वाजता आले. कॉमनवेल्थ-मीटिंग-अजेंडा, चर्चा झाली. ड्राफ्ट्स सामान्यपणे कायम केले.

रात्री आमचे डिनर होते. इटालियन फॉरिन ट्रेड मिनिस्टर, युगोस्लाव्हियन फायनान्स मिनिस्टर, श्रीलंकाचे डॉ. परेरा वगैरे हजर होते.

१६ जानेवारी. आज मीटिंग्ज सुरू होत आहेत. G-24 : फार विशेष घडले नाही. एनर्जी प्रॉब्लेम आणि आमच्यावर झालेला परिणाम याचा मी उल्लेख केला मात्र - संबंध दिवस याच चर्चेत गेला. तेलउत्पादक (oil producing) देश आपला डिफेन्स देत होते. कॉमनवेल्थमध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एवढी तरी मान्यता दिली.
कालपासून C 20 सुरू झाली. प्रथम यू. एस्. ए. चे श्री. जॉर्ज शुल्ट्झ् बोलले. त्यानंतर मी तेलाच्या (oil) प्रश्नाबाबतची आमची भूमिका मांडली. तेल-उत्पादक देशांना कितपत आवडली कोण जाणे? परंतु इतरांनी इंटरेस्ट दाखविला. माझ्या मते आमचे स्टेटमेंट बॅलन्स्ड होते. It was based on the line so clearly stated by P. M. with economic committee before I left.

आज सबंध दिवसात श्री. बार्बर हजर नव्हते. यू. के. मध्ये अंतर्गत परिस्थिती फार अवघड झाली आहे. संप - संप - संप!

रात्रीच्या इटॅलियन मिनिस्टरच्या जेवणाच्या वेळी श्री. बार्बर हजर होते. मोठा आनंदी माणूस आहे. लंडनच्या बाहेर एखादा दिवस जरी येता आले तरी हल्ली जरा मोकळे वाटते असे म्हणाला. 'आफ्टर डिनर' चर्चेचा सूर मोठा निराशाजनक होता. शेवटची C 20 ची बैठक जूनच्या मध्यावर घ्यावी असे ठरले.

'मॉनेटरी सिस्टिम' आखीव, रेखीव पध्दतीने यातून निघेल असे वाटत नाही. काही मुद्यांवर कॉन्शस् तयार होईल कदाचित आणि त्या आधारावर outline in generalities तयार करून वार्षिक सभेपुढे सादर करावी - त्याच्यावर जे काही सोपस्कार करावयाचे ते जनरल बॉडीने करावे. त्याला काही वेळेचे बंधन नसावे. डेव्हलप्ड देशांची भूमिका अशी दिसली की, मॉनेटरी सिस्टिममध्ये महत्त्वाचे फरक करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. जसे जसे कठीण प्रश्न निर्माण होत आहेत तसे तसे ते सोडविले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक अशी 'फ्लेक्झिबल' भूमिका असावी.

Link-? फारसे निघेल असे वाटत नाही. जर्मनी, यू. एस्. ए. बिलकूल विरुध्द आहेत. आम्हाला प्रयत्न करीत राहिले पाहिजे.