विदेश दर्शन - ५५

२४ नैरोबी

२१ सप्टेंबर, १९७३

आज येथील वेळेप्रमाणे १॥ वाजता (भारतीय वेळ ४ वाजता) पोहोचलो. विमानाचा प्रवास सव्वापाच तासांचा परंतु अतिशय सुखकर झाला. येथे दुपारी चांगलेच गरम भासले. अगदी दिल्लीसारखे. परंतु संध्याकाळ बरीच थंड आहे. संध्याकाळी ५ चे सुमारास पावसाचा थोडा शिडकावाही झाला.

दुपारी येथे पोहोचताच मी अगदी थकून गेलो होतो. त्यामुळे झक्क झोपून गेलो. नंतर श्री. शरद उपासनींनी माझ्या जखमांवर पावडर* मारण्याचे काम अगदी जिव्हाळयाने केले. नंतर शहरामध्ये भटकण्यास गेलो.

साडेसहा लाख वस्तीचे हे शहर आहे. आधुनिक शहर परंतु स्वच्छ आहे. केनियाची ही राजधानी असल्यामुळे सर्व प्रमुख सरकारी कचेऱ्या आहेत. काही नवीन आहेत.

केनिया सेंटर, जेथे आय्. एम्. एफ्. आणि 'वर्ल्ड बँकेची' बैठक होणार आहे ती इमारत बाहेरून पाहिली. गोल आकाराची, उंचच उंच अशी इमारत आहे. आफ्रिकेचे प्रतीक म्हणून इमारतीचा रंग गडद काळा ठेवला आहे.
----------------------------------------------------------------------------
* अंगावर 'नागिण' झाल्याने जखमा होत्या. – संदर्भ
----------------------------------------------------------------------------
बाजारपेठांतून मोटारीने १५-२० मिनिटांतच चक्कर मारून झाली. नंतर सहल म्हणून शहराबाहेर गेलो. श्री. एम्. जी. कौल दारेसलामहून येथे पोहोचले होते. तेही आमच्याबरोबर होते. कॉफीची शेती उत्तम वाटली. बाकीची शेती निष्काळजीपणाने केली जाते असे वाटले. जमीन उत्तम दिसली. पाऊसही ३०-४० इंच पडत असावा. परत येताना येथील हायकमिशनर श्री. नायर यांच्या सरकारी निवासस्थानी चहासाठी थांबलो. उत्तम घर आणि भोवतालची मोकळी जागा - आकर्षक आसमंत.

आज थोडीशी कणकण असल्यासारखे वाटत आहे. संध्याकाळी जेवण न घेण्याचे ठरविले आहे. एकेक दिवस मोजून काढावा लागणार आहे. जखमा भरून येत नाहीत, याची चिंता वाटते.* दिल्लीहून निघताना मला यापूर्वी इतके कधीच अवघड वाटले नव्हते. घरी असलो म्हणजे मी तुझ्यावर इतका अवलंबून असतो की, त्याची कल्पना बाहेर आल्याशिवाय येणार नाही. तूही मनाने हळवी होतीस. त्याची वारंवार आठवण येते.

उद्यापासून कार्यक्रम सुरू होत आहेत. त्यांत मन रमले तर प्रकृती अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष होईल अशी आशा आहे. तुमच्या सर्वाच्या सद्भावनेने माझी प्रकृती उत्तम राहील असा विश्वास आहे. येथे सर्व आपले अधिकारी उत्तम असून ते माझी खूपच काळजी घेत आहेत. माझी काळजी करू नकोस. आपल्या प्रकृतीची काळजी कर.
------------------------------------------------------------------------------------------
* छातीवर व पाठीवर 'नागिण' चे फोड झालेल्या अवस्थेतच यशवंतरावांना या महत्त्वाच्या दौऱ्याची जोखीम पत्करावी लागली होती. – संदर्भ
-----------------------------------------------------------------------------------------------