विदेश दर्शन - ५७

काल दुपारी इतर देशांतील काही अर्थमंत्र्यांना मी लंचसाठी बोलाविले होते. केनियाचा अर्थमंत्री अगत्याने आला होता. वैयक्तिक संबंधांना परराष्ट्रीय क्षेत्रात अतिशय महत्त्व आहे. परिषदेमध्ये ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्या अशा प्रसंगी सहज बोलून होतात.

आज संध्याकाळी आपले प्रेसवाले - येथील आणि दिल्लीहून मुद्दाम आलेले - यांना ब्रीफिंगसाठी बोलाविले होते. श्री. सरवर लतीफ आणि स्वामीनाथन् हे दोन तरुण अर्थतज्ज्ञ आहेत. प्रश्नोत्तरांत चलाखी होती. जे लिहावयाचे असेल ते लिहितात, पण बैठक तर खूपच रंगली.

आमचे तीन इकॉनॉमिस्ट येथे आमचेबरोबर आहेत. एकेका प्रश्नावर तिघांची तीन वेगवेगळी मते असतात. प्रामाणिक असतात पण वेगळी मते असतात हे खरे. त्यातून राजकीय व व्यावहारिक कसोटी लावून निर्णय घ्यावा लागतो.

आज संध्याकाळी परिषदेच्या चेअरमनचे रिसेप्शन होते. चेअरमन, या वर्षी श्री. चेंबर्स - त्रिनिदादचे अर्थमंत्री - हे आहेत.

गेले तीन-चार वर्षे या परिषदांत भेट होत असल्यामुळे चांगलाच परिचय झालेला आहे. त्यांना भेटावे म्हणून या रिसेप्शनला गेलो.

परंतु नंतर गेल्याचा पश्चात्ताप झाला. ३००० लोक आमंत्रित होते. भंडाराच म्हणाना! पिणे-खाणे याची रेलचेल होती. प्रत्येक आमंत्रितामागे १५ डॉलर्स म्हणजे जवळजवळ १०० रुपयांचे वर खर्च केला.
 
आम्ही तेथे जाऊन कसेतरी त्या हॉलमधून बाहेर पडलो. माणसाला माणूस खेटून होते. माझा दुखरा हात आणि काख यांना सांभाळून चालणेही मला मुष्कील झाले. परत येण्यासाठी बाहेर आलो आणि गाडी क्यूमधून यावयाला तब्बल एक तास लागला. पश्चात्ताप झाला म्हटले तो यामुळे. पुन्हा या रिसेप्शन्सना जावयाचे नाही असे ठरवून टाकले आहे.

उद्या आता मुख्य परिषद आणि भाषणांचे सत्र सुरू होईल.