निलजिंगप्पा यांना पाठिंबा देणारा समविचारांचा एक गट काँग्रेसमध्ये त्यावेळीं अस्तित्वांत होता. यशवंतरावांचा या विचारसरणीला विरोध होता. देशाच्या जीवनांत परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी इतिहासानं काँग्रेस-पक्षाकडे सोपवली असून तें परिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस-पक्ष हें प्रमुख साधन आहे, असा यशवंतरावांचा दावा होता. या पक्षाचं धोरण कांहीसं डाव्या विचारसरणीकडे झुकणारं असावं आणि भावी काळांतहि तें तसं राहिलं पाहिजे; किंबहुना पुरोगामी राष्ट्रीय पक्षानं प्राप्त परिस्थितींत या धोरणाचा अवलंब करणं अपरिहार्य आहे, असं त्यांचं मत होतं. या संदर्भात निजलिंगप्पा यांनी अधिवेशनांत व्यक्त केलेली विचारसरणी त्यांना मान्य करणं शक्यच नव्हतं.
धोरणात्मकदृष्टया त्यांचं असं मत असलं तरीहि काँग्रेस-पक्षांतील सर्वांनी एकत्र राहून एकदिलानं देशाचं काम केल्यास पक्षामधअये दुफळी निर्माण होण्याचं टळेल, अशी त्यांची भावना होती. काँग्रेस-पक्षांत नजीकच्या काळांत दुफळी निर्माण होणार आहे याची कल्पनाहि त्यांना नव्हती. पंतप्रधान इंदिरा गांधींचंहि तेंच निदान होतं. स्वत: इंदिरा गांधी यांनीच निजलिंगप्पा यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाचीं सूत्रं सोपवली होतीं आणि निजलिंगप्पा यांच्या पाठिराख्यांना काँग्रेस-कार्यकारिणींतही समाविष्ट करून घेतलं होतं. इंदिरा गांधी या स्वत:हि बारा वर्षांहून अधिक काळ, कार्यकारिणीच्या सदस्या होत्या आणि त्यांना निजलिंगप्पा यांची विचारसरणी माहिती होती; परंतु फरिदाबादच्या अधिवेशनामध्ये इतक्या टोकाला जाऊन पक्षाच्या ध्येय-धोरणासंबंधांत, निजलिंगप्पा वक्त्व्य करणार आहेत याच तर्कहि त्या करूं शकल्या नव्हत्या. निजलिंगप्पा यांना पाठिंबा देण्यांत इंदिरा गांधी यांचा हेतु काँग्रेसमधील विविध विचारसरणीच्या नेत्यांना शक्य तर एकत्रित राखावं हाच होता. असं करणं आवश्यक आहे असं यशवंतरावांचहि मत होतं. त्यांचं म्हणणं पक्षाच्या ध्येयाच्या संदर्भांत मतभेद असणं ही एक बाजू झाली; परंतु काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या, निरनिराळ्या राज्यांतील मान्य नेत्यांचा पाठिंबा, पक्षाचा कार्यक्रम आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकच ठरतो. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या मार्गाबद्दल फार तर मतभेद असूं शकतो. परंतु मूळ भूमिकेला सर्वांचा पाठिंबा असावाच लागतो. पक्षामध्ये परस्पर-विरोधी भूमिका स्वीकारणारे कांहीजण होते. परंतु ते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत अशा दृष्टीनं यशवंतराव या गटांकडे पहात नव्हते.
पक्षांत जे दोन गट निर्माण झालेले होते त्यांतील एक गट काँग्रेसला उजव्या विचारसरणीकडे खेचण्याचा प्रयत्न करत होता आणि दुस-या गटाचा प्रयत्न काँग्रेसला डाव्या विचारसरणीला बांधण्याचा होता. यशवंतरावांचे या दोन्ही गटांशी चांगले संबंध होते आणि त्यामुळे या दोघांनाहि एकत्र करण्यासाठी ते पराकाष्ठेचा प्रयत्न करत होते. काँग्रेसच्या ध्येयाबद्दल यशवंतरावांचं मन स्वच्छ होतं. पक्षानं ज्या नव्या पुरोगामी धोरणाचा स्वीकार केलेला होता त्याकडे संशयानं पहाणारा एक गट होता. पुरोगामी धोरण मान्य असूनहि, त्याच्या अंमलबजावणीसाठी 'आस्ते कदम' वाटचाल करावी असं या गटाचं मत होतं. यशवंतरावांना ही 'आस्ते कदम' वाटचाल मंजूर नव्हती.
या दोन्ही गटांत मध्यस्थी करून त्यांना सांधण्याचा आणि काँग्रेस अभंग राखण्याचा प्रयत्न काळांत यशवंतरावांनी अहमहमिकेनं केला. या दोन्ही गटांशी त्यासाठी त्यांना सख्य ठेवून काम करावं लागलं. फरिदाबाद, बंगलोर इथल्या अधिवेशांत आणि नंतर १९६९ च्या आँगस्टमध्ये जो एकत्रीकरणाचा ठराव चर्चेंसाठी आणला गेला त्या वेळींहि यशवंतरावांनी केलेली धांवपळ ही काँग्रेसमधील एकोपा टिकवण्यासाठीच होती. काँग्रेसच्या कांही नेत्यांनी, पंतप्रधानांची पक्षांतून हकालपट्टी करण्याचा घाट घातला. त्या वेळीं यशवंतराव आणि त्यांच्यासारख्या समान विचाराच्या नेत्यांनी ही कृति रोखण्याचा जो प्रयत्न केला, त्यामागे काँग्रेस-पक्षाला दुफळीपासून वांचवणं हाच हेतु होता. या नेत्यांचं आवाहन, निजलिंगप्पा-गटाच्या नेत्यांनी मानलं असतं, तर कदाचित् काँग्रेस दुभंगलीहि नसती.