गिरी हे स्वत:हि भूतानच्या दौ-यावर जाणार होते. तो दौरा त्यांनी रद्द केला आणि ते दिल्लीलाच राहिले. दरम्यान राष्ट्रपतिपदासाठी, एखाद्या ज्येष्ठ काँग्रेसनेत्याची निवड करण्यासाठी म्हणून पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या. १९७२ च्या सार्वत्रिक निवडणुका नजीक आलेल्या होत्या आणि मागचा अनुभव लक्षांत घेऊन काँग्रेसला हुकमी बहुमत मिळण्याबद्दल कांहींना संशयानं घेरलं होतं. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा असलेल्या कार्यक्षम नेत्याची, राष्ट्रपतिपदासाठी निवड करणं युक्त ठरेल असा या एकूण चर्चेचा सूर होता.
यशवंतरावांनी या प्रश्नाचा गंभीर विचार केला नव्हता; कारण तशी कांही तातडी निर्माण झालेली नव्हती. दरम्यान डॉ. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर एक आठवड्यानं पंतप्रधान इंदिरा गांधी आणि यशवंतराव यांच्या भेटीमध्ये हा विषय चर्चेत निघाला तेव्हा इंदिरा गांधींनी यशवंतरावांचं मत विचारलं. यशवंतरावांनी याविषयी निश्चित स्वरुपाचा विचार केलेला नव्हता. तेंच त्यांनी इंदिराजींना सांगितलं; परंतु या प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष मात्र द्यायला पाहिजे असं आपलं मत व्यक्त केलं. तथापि राष्ट्रपतींच्या पश्चात्, उपराष्ट्रपतीना तें पद बहाल करण्याच्या प्रथेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मात्र त्यांना वाटत असावं. इंदिरा गांधी यांनी या चर्चेच्या वेळीं आपलं मत व्यक्त केलं नव्हतं किंवा आपला त्याबाबतचा दृष्टिकोनहि स्पष्ट केला नव्हता; परंतु गिरी यांनाच उमेदवारी देण्याबाबत इंदिराजी उत्सुक नाहीत असी या चर्चेनंतर यशवंतरावांची स्वाभाविक समजूत झाली. राष्ट्रपतिपदासाठी कोण उमेदवार असावा याबाबत या दोघांनीहि आपलं मत या वेळेपर्यंत निश्चित बनवलेलं नव्हतं.
दरम्यान मध्य-प्रदेशचे शेठ गोविंददास यांनी बाबू जगजीवनराम यांच्या नांवाची राष्ट्रपतिपदासाठी सूचना केली. बाबूजी हे त्या वेळीं अन्नधान्यखात्याचे मंत्री होते. जगजीवनराम हे हरिजन-नेते, यापेक्षाहि ते राष्ट्रीय स्तरावरील मान्य नेते या दृष्टीनं, शेठ गोविंददास यांची सूचना यशवंतरावांनी वाजवी मानली. के. के. शहा आदि त्यांच्या मित्रांशी चर्चा करतांनाहि त्यांनी आपल्या या मताचा उल्लेख केला आणि त्या दृष्टीनं वातावरण निर्माण केलं, तर बाबूजींबद्दलची सूचना मूळ धरूं शकेल असं मत व्यक्त केलं.
कामराज आणि पंतप्रधान यांनी १७ मे रोजीं या प्रश्नावर चर्चा केली. कामराज यांनी या वेळीं संजीव रेड्डी यांचं नांव उच्चारुनच आपली निवड सांगितली. त्याच दिवशी संजीव रेड्डी यांनीहि पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांना आता यशवंतरावांचा पाठिंबा मिळवायचा होता. त्याच दिवशींच्या संध्याकाळीं, त्यांनी यशवंतरावांना फोन करुन आपण भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं. भेटीच्या उद्देशाची कांही कल्पना नसल्यामुळे व स्पीकरचा दर्जा ध्यानांत घेऊन, "तुम्ही कशाला येतां, वेळ सांगा, मीच येतो" असं यशवंतरावांनी त्यांना सुचवलं. परतु मला स्वत:संबंधी कांही चर्चा करायची असल्यानं मीच येईन, असं रेड्डी यांनी सांगितलं आणि दुस-या दिवशी सकाळींच त्या दोघांची चर्चा झाली.
" राष्ट्रपतिपदासाठी मी उत्सुक आहे काय, हें पंतप्रधानांना जाणून घ्यायचं होतं. आणि आमच्या चर्चेंमध्ये मी निवडणूक लढवावी असं त्यांनी सूचित केलं आहे. " असं रेड्डी यांनी यशवंतरावांना सांगितलं.
यापुढचा चर्चेचा टप्पा आणखी महत्त्वाचा ठरला. इंदिरा गांधी या ५ जूनला अफगाणिस्तानच्या पाच दिवसांच्या दौ-यावर जाणार होत्या. दौ-यावर रवान होण्यापूर्वी त्यांनी उपपंतप्रधान मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, यशवंतराव, कामराज, जगजीवनराम, स्वर्णसिंग, अन्य काँग्रेस-नेते आणि कांही राज्यांचे मुख्यमंत्री यांच्याशीं राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसंबंधी अलग अलग चर्चा केली. या चर्चेंत निश्चित निर्णय कांही झाला नाही, परंतु जूनच्या मध्यापर्यंत याचा निर्णय एवढंच करावा ठरलं. त्या जूनमध्ये काँग्रेसचे नेते आणि मंत्री हे परदेशच्या दौ-यावर जाणार होते. निजलिंगप्पा यांनी युरोपच्या दौ-याचं प्रस्थान ठेवलं होतं.