अखेर १९६९ च्या फरिदाबाद-अधिवेशनांत, राजकीय ठरावावरील भाषणांत यशवंतरावांनी या प्रश्नाला तोंड फोडलं. या अधिवेशनांत आर्थिक कार्यक्रम, संघटनात्मक प्रश्न आणि राजकीय समस्या या तीन विषयांवर गटवार चर्चा करून, या चर्चेतून तयार होणारे निष्कर्ष, अधिवेशनासमोर मांडण्यासाठी तीन पॅनल्स तयार करण्यांत आलीं होतीं. राजकीय समस्येसंबंधी चर्चा करणा-या पॅनलचे चेअरमन यशवंतराव चव्हाण होते. आश्चर्य असं की, या तीन पॅनल्सपैकी फक्त यशवंतरावांनीच आपला अहवाल अधिवेशनासमोर सादर केला. आर्थिक प्रश्नाची चर्चा करणारं जें पॅनल होतं त्याचे चेअरमन मोरारजी देसाई हे होते. त्या पॅनलमधील सदस्यांनी चर्चेंच्या वेळीं, मोरारजींवरच कठोर टीका केली. परिणामीं त्या पॅनलचा अहवाल तयार होऊं शकला नाही आणि तिस-या पॅनलचं काय घडलं हें कधीच उजेडांत आलं नाही. अधिवेशनांत फक्त राजकीय परिस्थितीसंबंधीचा ठरावच संमत करण्यांत आला.
यशवंतरावांनी फरिदाबाद अधिवेशनांत या ठरावावर भाषण करतांना जें प्रदीर्घ भाष्य केलं त्यामध्ये देशांत त्या अगोदरच्या दोन-तीन वर्षांत घडलेल्या विविध घटनांचं सविस्तर विश्लेषण केलं. १९६७ च्या निवडणुका. १९६९ मधील मुदतपूर्व निवडणुका यांचा अन्वयार्थ त्यांनी सांगितला आणि मुदतपूर्व निवडणुकांचं पृथक्करण करतांना त्याच्या अनुषंगानं राष्ट्राच्या राजकीय विचारसरणींत वाढूं लागलेल्या नव्या प्रवाहांचाहि समाचार घेतला. त्या काळांत ध्रुवीकरणाची भाषा बोलली जात होती. आपण उजवा गट बनवण्याचा प्रयत्न करुं या, असं कोणी सांगत होतं, तर आपण जनसंघाला अधिक जवळचे आहोंत असं कुणी भासवत होते. डाव्या पक्षाशी सख्य साधण्याचा प्रयत्न करुं या, असा आग्रह धरणारेहि कांही होते. त्याच्याहि पुढे जाऊन काँग्रेसच्या विघटनेची भाकितं करणारे कांही होते. या भविष्यवादी लोकांचं म्हणणं होतं की, ७२ सालच्या निवडणुकींत केंद्रातहि काँग्रेस मताधिक्य गमावण्याची शक्यता असल्यानं आतापासूनच आपण संयुक्त सरकारचा विचार करायला प्रारंभ करायला हवा.
यशवंतरावांनी देशामधील हा राजकीय आराखडा अधिवेशनासमोर जसांच्या तसा उभा केला आणि प्रत्येक पक्षाच्या ध्येय-धोरणाचं सुस्पष्ट चित्र मांडून ध्रुवीकरणाची, संयुक्त आघाडीची ही बडबड अगदीच अवास्तव, असमंजसपणाची आहे, असं आपलं मत स्पष्टपणें सांगितलं.
फरिदाबाद काँग्रेस-अधिवेशनांत यशवंतरावांनी राजकीय परिस्थितीचं केलेलं विश्लेषण हें अभ्यासपूर्ण आणि नेमकं वर्मावर बोट ठेवणारं होतं. राजकीय परिस्थितीचं विवेचन केल्यानंतर त्या ठरवांत त्यांनी नमूद केलं होतं की, "आपण फुटीरपणाच्या राजकारणाचा विचार करतां कामा नये, निंदेच्या दृष्टीनंहि राजकारणाचा विचार करुं नये, वैयक्तिक टीका करुन शीलावर शितोडे उडवण्याचंहि धोरण ठेवूं नये. सुनिश्चित अभिवचनं देऊन त्यासाठी जनसेवेला जीवन वाहून घेण्याच्या राजकारणाच्याच दृष्टीनं विचार करण्याचा प्रयत्न आपण करुं या. आपण हे करूं, तर आपला देश व लोकशाही समाजवाद स्वत:चं संरक्षण स्वत:च करूं शकतील याविषयी मला मुळीच शंका नाही. "
या अधिवेशनांत काँग्रेस-अध्यक्ष निजलिंगप्पा यांनी आपल्या भाषणांत जे विचार व्यक्त केले त्यामुळे मात्र काँग्रेक्षमधील आघाडीच्या सर्वच नेत्याना कमालीचा धक्का बसला. काँग्रेसच्या मूलभूत ध्येय-धोरणाच्या विचारालाच त्यांनी सुरुंग लावला; आणि त्यामुळे काँग्रेस-पक्षातील ज्येष्ठ नेते, किंबहुना स्वत: काँग्रेस-अध्यक्ष हेच ध्येय-धोरणाबाबत घट्ट नाहीत, त्यांच्यांतच ठिसूळपणा आहे, अशी या पक्षाची प्रतिमा लोकांसमोर निर्माण झाली.
निजलिंगप्पा यांचा हा पवित्रा म्हणजे काँग्रेस-अंतर्गत दोन परस्पर-विरोधी विचारांचा, ध्येय-धोरणाचा आग्रह धरणारे गट अस्तित्वांत आहेत याचा पुरावाच होता. पक्षांतर्गत दोन विचारांचे लोक असले तरी, काँग्रेसमध्ये मात्र त्यांनी शक्यतों एकत्रित राहून. पक्षांत राहून कार्य करावं. अशी यशवंतरावांची भूमिका होती - तसा प्रयत्न होता.