प्रत्येकजण आपला आनंद दुस-याला देत होता आणि दुस-याचा घेत होता. हें सर्व सुरू असतांनाच या आनंदांत आणखी भर घालणारी एक घोषणा मुख्य मंत्र्यांनी केली. म. गांधींच्या वधानंतर महाराष्ट्रांतल्या कांही गावांतून मोठी जाळपोळ झाली होती आणि त्यांत कांही ब्राह्मणांचीं घरं, दुकानं, कारखाने जाळण्यांत आलीं होतीं. पुनर्वसनासाठी या जळित-पीडितांना सरकारनं कर्जरूपानं मदत केली होती; परंतु पुढे जळित-पीडितांकडून कर्जवसुली सुरू झाल्यानं या वर्गाची मोठीच कुचंबणा झाली. वर्षानुवर्षं उभे केलेले संसार बेचिराख झाल्यानंतर त्या राखेंतून ते आता नुकते उभे राहूं लागले होते. त्यामुळे कर्ज परत करणं त्यांच्या शक्तीबाहेरचं झालं होतं. त्यांचा विचार करावा लागणारच होता. महाराष्ट्र राज्य-निर्मितीची आनंदाची संधि साधून यशवंतरावांनी त्या दिवशींच जळित-पीडितांचीं कर्ज माफ करण्यांत आलीं आहेत अशी घोषणा केली आणि जळित-पीडितांचा दुवा मिळवला.
यशवंतरावांच्या या निर्णयाबद्दल पुढे जळित-पीडितांतर्फे सांगलीमध्ये त्यांचा सत्कार करण्यांत आला. या सरकारच्या वेळीं यशवंतरावांनी या निर्णयामागच्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या अशा, “कुणावर उपकार करावेत या भावनेनं जळित-पीडितांचीं कर्जं माफ करण्यात आलेंली नाहीत, तर समाजांतल्या एका वैचारिक घटकाच्या मनांतली जखम भरून काढण्यास व महाराष्ट्रीय समाजाला आगेकूच करण्यास द्रुतगति प्राप्त होईल या दृष्टीनंच कर्जमाफीचा निर्णय केला गेला आहे.”
यशवंतरावांकडून ही घोषणा करून घेण्याची संधीहि जयंतराव टिळक यांनीच त्या दिवशीं साधली. महाराष्ट्र राज्य-निर्मितीसंबंधीचा लोकसभेचा निर्णय सभागृहाला सांगण्यासाठी यशवंतराव सभागृहांत उभे राहून बोलूं लागले त्याच वेळीं, या आनंदाच्या प्रसंगीं जळित-कर्जमाफीची घोषणा करण्याविषयी निरोप लिहून जयंतरावांनी त्यांच्यापर्यंत पोंचवला; आणि क्षणाचाहि विलंब न लावतां यशवंतरावांकडून ती घोषणा झाली. आनंद-निर्मितीची त्या दिवशीं जणू चढाओढच सुरू झाली होती! जळित-पीडितांपैकी ज्यांची कर्जफेडीचे हप्ते देण्याबद्दल कुचंबणा झाली होती आणि सरकारी तगाद्याला तोंड देणं अशक्य ठरलं होतं अशा कांही पीडितांनी, संपादक आणि आमदार या नात्यानं टिळक यांच्याकडे गा-हाणीं केलेलीं होतीं. संधि साधून त्या दिवशींच त्याचा कायमचा निर्णय करण्याचं त्यांनी ठरवलं आणि यशवंतरावांनीहि त्याचा आदर केला.
जळित-कर्जं माफ करतांना कुणी तरी देणारा राजा आहे व घेणारी कुणी तरी प्रजा आहे अशी भावना न ठेवतां, एक आवश्यक नैसर्गिक पाऊल म्हणून यशवंतरावांनी हा निर्णय केला. यशवंतरावांना कांहीजण पत्रं लिहीत असत आणि “तुम्ही छत्रपतींप्रमाणे गो-ब्राह्मणप्रतिपालक होऊं इच्छितां-ब्राह्मणांचं प्रतिपालन केलं असतां गायीला विसरूं नका” असं या पत्रांतून कांहीजण लिहीत असत. ब्राह्मणांचीं कर्जं माफ केलीं, इतरांचं काय, असा सवालच यांतून ध्यानित करण्याचा या पत्रकर्त्यांचा प्रयत्न होता; परंतु नवं राज्य हें गो-ब्राह्मणप्रतिपालक नसून ते सर्वप्रतिपालक आहे, असंच यशवंतरावांचं त्याला उत्तर होतं.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतील जी नवी पिढी पुढे येऊं लागली होती तिच्याजवळ ध्येयवाद होता. रांगड्या शब्दांत ही मंडळी आपला ध्येयवाद बोलून दाखवत असत. पण शहरांतल्या उच्चभ्रू समाजाच्या दृष्टीनं त्यांचे ते रांगडे शब्द म्हणजे टिंगलीचा विषय होत असे. या रांगड्या शब्दांत बोलणा-या ध्येयवादी पिढीला, ब्राह्मण-समाजानं सुधारून घेतलं पाहिजे, हा यशवंतरावांचा आग्रह होता.
१९४८ सालीं ज्या ब्राह्मणांचीं घरंदारं जळालीं, त्यांना कर्जमाफी केल्यानंतर कर्जमाफीच्या अनेक मागण्या यशवंतरावांकडे येऊं लागल्या. त्यांचं कर्ज माफ केलं, आमचंहि करा, अशी ही मागणी होती; परंतु मुख्य मंत्र्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचं धोरण जाहीर करून नव्हे. निवळ आर्थिक मदत करण्याचा हेतूहि त्यामागे नव्हता. प्रसंगोपात्त यशवंतरावांनी ही आपली भूमिका स्पष्ट शब्दांत जनतेला सांगितलीहि!