इतिहासाचे एक पान. १९०

सांस्कृतिक आणि करमणुकाच्या क्षेत्रांतले निर्णयहि त्यांनी अशाच स्वरूपाचे केले. नाट्यकलेला उत्तेजन देण्यासाठी याआगोदर कांही खर्चाची योजना सरकारनं केलेलीच होती. नंतर १९५९-६० सालासाठी म्हणून ८४ हजारांची आणखी योजना तयार करण्यांत आली. नाट्यकलेला प्रोत्साहन देणं हा या योजनेचा हेतु ठरला. त्यानुसार मराठी व गुजराती या भाषांतल्या सर्वोत्कृष्ट नाटकांकरिता शिक्षण-संस्थांच्या पातळीवर नाट्यमहोत्सव संघटित करून नाट्यकलेचीं शिबिरं चालू करावींत असं ठरवण्यांत आलं. मुंबईत संस्कृत नाट्यमहोत्सव संघटित करण्याचा एक नवा पायंडा पाडण्याची योजनाहि यांत अंतर्भूत करण्यांत आली. नंतरच्या काळांत महाराष्ट्राच्या नाट्यसृष्टींत अमाप पीक उगवलं, पण हें पीक वाढण्याकरिता जमिनीची मशागत यशवंतरावांनी आपल्या हातानं केलेली आहे हें नाट्यरसिक जाणून आहेत.

करमणूक करांत सूट मिळण्याच्या बाबातींत सरकारनं एक नवी पद्धत या काळांत लागू केली. १९५७ च्या एप्रिलपासून ही नवी पद्धत लागू झाली. करमणूक-कराची सूट देण्यासाठी चित्रपटांची निवड प्रत्येक तिमाहींत करण्यासाठी या पद्धतींत कांही अटी ठरवण्यांत आल्या. पूर्वी सूट देण्याविषयी निर्मात्याकडून अर्ज आल्यानंतर त्याला सूट द्यायची की नाही तें ‘अॅडहॉक’ तत्त्वावर ठरवण्यांत येत असे. तांत्रिकदृष्ट्या पुरेसे उच्च दर्जाचे चित्रपट निघावेत आणि निर्मात्यांना अशा प्रकारचे अधिकाधिक चांगले चित्रपट काढण्यास उत्तेजन मिळावं हा यांतला हेतु होता. तथापि या सवलतींचा फायदा घेईपर्य़ंत बराच कालावधि जात असे व मूळ हेतु सफल होत नसे. नवी पद्धत जी आमलांत आणली गेली त्यामध्ये पूर्वीची कार्यपद्धत दुरुस्त करण्यांत आली. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट तयार करण्याच्या दृष्टीनं तें लाभदायक ठरलं. वेळेची बचत झाली आणि चित्रपटसृष्टींत नव्या चित्रपटांच्या योजना भराभर आकारास येऊं लागल्या. चित्रपट हें लोकांचं दैनंदिन करमणुकीचं साधन असल्यामुळे सरकारनं केलेला निर्णय हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणें अशा प्रकारे लोकांच्या जीवनाला स्पर्शून जाणारा असाच होता.

साहित्याच्या क्षेत्रांतहि प्रादेशिक भाषांतून लिहिलेल्या उत्कृष्ट पुस्तकांना बक्षिसं देऊन लेखकांना वाड्मय-निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य सरकारनं एका निर्णयाद्वारे या काळांत केलं. विद्वान्, संशोधक, लेखक, कालावंत, दिग्दर्शक, संगीतकार, उत्कृष्ट नाटकं व ग्रंथ यांचा बक्षिसं देण्याच्या यादींत प्रथमच समावेश करण्यांत आला.

कलावंतांना आर्थिक साहाय्य सरकारतर्फे देण्याची प्रथा यशवंतरावांनीच महाराष्ट्रांत सुरु केली. नाट्यक्षेत्रांतील सम्राट व कलावंत नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व हे वृद्ध, अपंग झाले होते. ज्या कलावंतानं, मराठी नाट्यरसिकांना वर्षानुवर्षं डोलवलं तो महान् कालावंत अंथरुणांत विपन्नावस्थेंत खिळून पडला असतांना सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी ही गोष्ट यशवंतरावांच्या नजरेस आणली. कलावंत या नात्यानं बालगंधर्व हे यशवंतरावांचं दैवतच होतं. बालगंधर्वांचीं नाटकं पाहण्यासाठी, काराडहून ते कोल्हापूरला मित्रांसमवेत लहानपणीं, अनेकदा गेलेले असून महाराष्ट्राच्या या थोर कलावंताबद्दल त्यांना कमालीचा आदर होता. पु. ल. देशपांडे यांनी बालगंधर्वांची हालाखी नजरेला आणतांच यशवंतरावांनी तातडीनं त्या संबंधांत निर्णय केला आणि मासिक ३०० रुपये मानधन बालगंधर्वांना सुरू करून दिलं.

बालगंधर्व, अखेरच्या दिवसांत पुणें शहरांत बेशुद्धावस्थेंत खिळून पडले होते. अंथरुणांत सतत राहिल्यानं आणि हालचाल बंद असल्यानं त्यांच्या अंगास जखमा होऊं लागल्या. औषधोपचार सुरू होते; परंतु उपयोग होत नव्हता. परदेशांतून एक विशिष्ट प्रकारचं औषध उपलब्ध होऊ शकलं तर त्याची आवश्यकता होती. तज्ञ डॉक्टरांचं हें मत यशवंतरावांपर्यंत पोंचवलं गेलं. त्या वेळीं ते दिल्लींत होते. त्यांनी आवश्यक तें औषध उपलब्ध करून देण्यीची तयारीहि दर्शवली, परंतु तें औषध इथे पोंचावं आणि बालगंधर्वांना आराम पडावा असा जणू योगच नव्हता !