या मंडळामध्ये तज्ज्ञ व विद्वान् मंडळींचा समावेश करण्यांत आला होता. या मंडळींनी आपल्या कार्याची लांबी, रुंदी, उंची, खोली वाढावी म्हणून योग्य ते प्रयत्न करून अधिक व्यापक, अधिक सर्वंकष कार्य केलं तर शासनाला तें हवं होतं. देशांतले लेखक, विचारवंत, कलावंत, शास्त्रज्ञ, संशोधक यांच्या प्रयत्नानं निर्माण होणारं जें विचारधन तेंच खरं म्हणजे समाजाचं फार मोठं धन आहे, अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे, असा यशवंतरावांचा दावा होता. समाज जिवंत रहातो, तो त्याच्याजवळ असणा-या भौतिक सामर्थ्यानं नाही, तर त्याच्याजवळ असणा-या सांस्कृतिक मूल्यांवर आणि विचारधनावर ! समाज आणि देश यामुळेच जिवंत राहिलेले आहेत, वाढलेले आहेत असाच इतिहासाचा दाखला आहे. भारताची परंपरा अनेक पंडितांची, विचारवंतांची आणि विद्वानांची अशीच आहे. देशांत व्यास वाल्मीकींपासून तों रवींद्रनाथ टागोर यांच्यापर्यंत आणि महाराष्ट्रांत ज्ञानेश्वरांपासून तों आजच्या विद्वानांपर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. थोर विद्वान्, पंडित, त्यागी संत, पराक्रमी पुरुष अशी ही लांबच लांब परंपरा आहे. देशाची तीच खरी प्रेरणा आहे. ही परंपरा पुढे चालवायची, जतन कारायची, तर तें काम करत असतांना त्याकरिता लागणारं साहित्य पुरवणं, साधनसामग्री पुरवणं हें शासनाचं काम आहे आणि त्यासाठी साहित्य आणि संस्कृति मंडळाचा जन्म आहे, असा यशवंतरावांचा याबाबतचा विशाल दृष्टिकोन होता.
मराठी भाषा ही राज्यभाषा करण्याचं तत्त्व राज्य सरकारनं स्वीकारलं आणि त्याबरोबर कांही जबाबदा-याहि निर्माण झाल्या. मराठी भाषेवर अशी जबाबदारी आता आली होती की, तिनं लोकशाहीचा कारभार केला पाहिजे. लोकांचं जीवन संपन्न करील, समृदध करील ही जबाबदारी तर होतीच, शिवाय भौतिक अर्थानं जें जें शास्त्र उंचावलेलं आहे, त्या त्या शास्त्रांतलं ज्ञान, मराठी भाषेंत पकडून आणण्याचं कामहि करावं लागणार होतं. तेव्हा ज्ञानरूपी सरोवराचे पाट लोकांच्या जीवनापर्यंत पोंचवण्याचं काम या मंडळाच्या मदतीनं व्हावं अशी यशवंतरावांची अपेक्षा होती.
विदर्भांतले सुप्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांची आणि यशवंतरावांची एके ठिकाणीं विविध विषयांवर चर्चा झाली होती. या चर्चेच्या ओघांत इतिहासाच्या कांही साधनांकडे माडखोलकर यांनी त्यांचं लक्ष वेधलं होतं. विदर्भ आणि मराठवाडा ही जर आदिभूमि मानायची झाली तर, आणि त्याचा तुटलेला दुवा जोडायचा असेल तर, मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या खेड्यापाड्यांतून जीं अनेक साधनं पडलेलीं आहेत त्यांचं संशोधन करण्यांत आलं पाहिजे अशी मनीषा माडखोलकर यांनी व्यक्त केली होती. इतिहासाच्या पुनरुज्जीवनासाठी ठिकठिकाणीं जी अनेक साधनं पडलेलीं आहेत त्यांचं संशोधन करण्याचं काम मंडळाच्या रुपानं उभ्या राहिलेल्या संस्थेनं, महाराष्ट्रांत ज्या निरनिराळ्या संस्था आहेत त्यांच्याकडून करून घ्यावं, त्यांना कार्यक्षम, क्रियाशील बनवून त्यांच्या विचारांचा, त्यांच्या शक्तीचा, साधनांचा उपयोग करून घेतला जावा, अशी यशवंतरावांची याबाबतची सूचना होती. मंडळामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वा. वि. मिराशी हे विद्वान् असल्यानं त्यांनी याबाबत एक योजना तयार करावी, अशी अपेक्षाहि त्यांनी व्यक्त केली.
इतिहासाचं संशोधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं याच्याहि यशवंतरावांच्या कल्पना स्पष्ट आढळतात. इतिहासाच्या संशोधनामध्ये भूतकाळाचं उत्खनन करून माहिती जमा करणं याचा तर समावेश असतोच; शिवाय वर्तमानकाळाकडे लक्ष द्यावं आणि तसं करतांना भविष्यकाळाकडे नजर ठेवून महाराष्ट्राला मदत करावी, अशी त्यांची कल्पना होती. साहित्य संस्कृति मंडळ असं या मंडळाचं नांव होतं. यांतल्या ‘साहित्य’ या शब्दाची व्याख्या यशवंतरावांना अभिप्रेत होती ती अशी : ललित शब्द म्हणजेच केवळ साहित्य नव्हे. ललित साहित्य याचा अर्थ सामान्य जनतेचं हित करणारं साहित्य होय.