इतिहासाचे एक पान. १९४

परंतु या सर्वांपेक्षा, पददलितांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेले निर्णय हे अजोड ठरले. नवीन महाराष्ट्र चांगल्या कर्तृत्ववान् हातानं घडवायचा तर इथे सामाजिक समता निर्माण करण्याचा कसोशीचा प्रयत्न आवश्यक होता. महाराष्ट्र हा जास्तींत जास्त खेड्यांत रहातो. अनेक पददलित खेड्यांतच राहिलेले असतात. बौद्ध धर्माचा अंगीकार केलेल्या नव – बौद्धांची आता त्यांत भर पडलेली आहे. राज्याच्या जीवनांत या सर्व पददलितांना हक्काचं स्थान प्राप्त करून देऊन त्यांच्याबद्दल मनांत असलेले जुने राग, लोभ, दोष, स्वार्थ दूर करण्याची आणि आतापावेतों उपेक्षित असलेल्या या समाजांतले लोक आणि सवर्ण हिंदु यांच्यात भागीदारी व समरसता निर्माण करून देण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं, राज्यस्थापनेच्या वेळींच यशवंतरावांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर मूलग्राही सामाजिक समस्येकडे त्यांनी तातडीनं लक्ष दिलं. पददलित म्हटल्या जाणा-या सर्वच ‘हरिजनांना’ राज्यानं सर्व त-हेनं मदत देणं ही एक आवश्यक बाब तर होतीच; परंतु त्यांतहि नवबौद्धांचा एक नवा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनांत त्या वेळी निर्माण झालेला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ नोव्हेंबर १९५६ ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या वेळेपासून महाराष्ट्राच्या शहरांतून आणि खेड्यांमधून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची प्रचंड लाट निर्माण झाली. अस्पृश्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करतांच, ‘अस्पृश्य’ म्हणून त्यांना मिळणा-या सवलती सरकारनं बंद केल्या होत्या. हें घडतांच बौद्धांनी सभा, परिषदा भरवून, ठराव करून, शिष्टमंडळं नेऊन सवलती चालू ठेवाव्यात या मागणीसाठी चळवळ आरंभली.

यशवंतरावांपर्यंत हीं शिष्टमंडळं पोंचलीं. त्यांचं म्हणणं असं होतं की, मूळचे जे अस्पृश्यवर्गीय आहेत, त्यांनी केवळ बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानं त्यांचा सामाजिक, आर्थिंक आणि शैक्षणिक मागासलेपणा नष्ट होऊं शकत नाही. सवलती मागण्यामागील त्यांची मूलभूत भूमिका ही वास्तव अशीच होती. ग्रामीण भागांतून मुंबईत पोंचलेल्या या मुख्य मंत्र्यांना वेगळ्या शब्दानं किंवा कृतीनं, मागण्यामागील ही भूमिका समजून देण्याची आवश्यकताहि नव्हती. शिष्टमंडळाच्या मागण्या यशवंतरावांनी ऐकल्या आणि ‘सवलती’ देण्याचं धोरण त्यांनी लगेच जाहीर करून तसे हुकूमहि संबंधित खात्यांना दिले.

नवबौद्धांना सवलती देण्यांत, त्यांना इतर समाजाच्या बरोबरीला आणणं हाच हेतु होता. त्यांच्या या जाणीवपूर्व धोरणामुळे बौद्धांच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीचा मार्ग खुला झाला आणि त्याबद्दल रिपब्लिकन पक्षानं यशवंतरावांना धन्यवाद दिले. सभा-सभांतून कृतज्ञता मग व्यक्त होऊं लागली.

नागपूर इथे ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तिला बौद्धधर्मीय लोक पवित्र दीक्षाभूमि असं संबोधूं लागले आणि या भूमीवर डॉ. आंबेडकर यांचं, साजेसं स्मारक उभारण्याचा निर्धारहि त्यांनी व्यक्त केला. या स्मारकासाठी दीक्षाभूमि आम्हांला द्यावी अशी बौद्धजनांची मागणी होती. भारतीय बौद्धांच्या भावनेचा तो प्रश्न होता. डॉ. आंबेडकर यांचा थोरपणा यशवंतराव जाणून होते. त्यांच्याबद्द्ल त्यांच्या मनांत आदर असल्यानं डॉ. आंबेडकर जयंति-दिनाची सुट्टी (१४ एप्रिल) देण्याची प्रथा, यशवंतरावांनीच महाराष्ट्रांत सुरू करून डॉ. आंबेडकरांच्या कोट्यवधि अनुयायांच्या भावनेचा आदर केलाच होता.