इतिहासाचे एक पान. १७६

जनसामान्यांच्या हितासाठी यशवंतरावांनी १९५७ ते १९६०-६२ या काळांत जे निर्णय केले, जनतेचा सहकार मिळवला, प्रशासनाला गति दिली त्यामुळे महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शेती व शिक्षणविषयक आणि राजकीय चेहरा-मोहराहि पार बदलून गेला. देशांतलं स्थिर, पुरोगामी आणि सर्व बाबतींत जागरूक असं राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा त्यांतूनच भारतभर निर्माण झाली. आज-अखेर ती टिकून आहे याचं श्रेय यशवंतरावांच्या पक्क्या पायाभरणीला आणि पुरोगामी दृष्टीला आहे. एकदा पाया पक्का झाला म्हणजे इमारत वर चढत रहाते. दोनाचे तीन, चार, पांच, दहा आणि किती तरी मजले एकावर एक उभे राहूं शकतात. इमारत शोभिवंतहि दिसूं लागते. महाराष्ट्राच्या इमारतीचं असंच घडलं आहे. १९६२ मध्ये यशवंतराव दिल्लीला केंद्रस्थानीं गेल्यानंतर ही इमारत उंच करण्याची किमया घडत राहिली हें खरं, पण पायाभूत काम अगोदर पक्कं झालं असल्यामुळे मजले चढवण्याचं काम नंतरच्या काळांत सुलभ रीतीनं होऊं शकलं.

नवीन राज्याची स्थापना झाल्यानंतर, नवीन राजवट सुरू करण्यापूर्वी यशवंतरावांनी पहिली गोष्ट ही केली की, निरनिराळ्या सरकारी खात्यांची पुनर्रचना त्यांनी प्रथम घडवून आणली. नवीन बारा खातीं त्यांनी तयार केलीं होतींच; त्या बारा खात्यांकडे सोपवण्यांत आलेले गट अशा प्रकारे बनवण्यांत आले की, त्या त्या विवक्षित खात्याच्या प्रमुख कार्याच्या सर्व बाजूंचं संपूर्ण चित्र त्यावरून निर्देशित व्हावं. त्यामुळे एक प्रमुख फायदा असा झाला की, इतर खात्यांना कमींत कमी विचारणा करण्यांत येऊन निर्णय त्वरित घेतां येणं शक्य झालं.

सरकारी कचे-यांतून दिरंगाईचा जो रोग पसरलेला असतो याचं कारण एखाद्या विषयाचा निर्णय घेण्याच्या कामीं अनेक खात्यांचीं मतं मागवण्याचा गुंता झालेला असतो. मत समजल्याशिवाय निर्णय करतां येत नाही; प्रश्नाचा अभ्यास करून संबंधित अधिका-यानं आपलं मत द्यावं, अशी अपेक्षा असते; परंतु प्रत्येक खात्याच्या अधिका-याच्या कसोट्या वेगळ्या, हितसंबंध वेगळे, बुद्धीची व कामाची कुवत वेगळी. त्यामुळे महिन्यामागून महिने या सर्वांची एकत्रित गाठ मारण्यांत आणि निर्णय करून घेण्यांतच निघून जातात. प्रश्नाचा निर्णय झाला, तरी अंमलबजावणीच्या वेळींहि असाच गुंता शिल्लक होत रहातो. ग्रामीण जीवनांतून आलेल्या यशवंतरावांना हें सर्व परिचयाचं होतं. त्यामुळेच राज्याचं ध्येय साध्य करण्यांत कचे-यांतल्या दिरंगाईचा अडथळा दूर करण्याचं काम त्यांनी खात्यांची सुटसुटीत पुनर्रचना करून सर्वप्रथम केलं.

सर्व खात्यांचा लगाम मुख्य मंत्री या नात्यानं आपल्या हातांत राहील हें पहाणं त्यांना आवश्यकच होतं. कामाला गति देणं म्हणजे प्र-गति साध्य करणं नव्हे, हें यशवंतराव जाणून होते. प्रत्यक्ष प्रगतीची प्रचीति आणून द्यायची, तर सारथ्य करणाराला रथाच्या सर्व घोड्यांवर ताबा ठेवणारं सूत्र-लगाम स्वतःच्या हातीं धरावाच लागतो. एकामागोमाग एक निर्णय करून यशवंतरावांनी तेंच साध्य केलं.

नवा, अपेक्षित महाराष्ट्र निर्माण करायचा तर तत्कालीन पिढी आणि नंतर येणारी प्रत्येक पिढी यांच्यांत नवेपणाचं बीजारोपण केल्यानंच तें साध्य होणार होतं. नवी पिढी शिकून शहाणी व्हावी, आधुनिक ज्ञानविज्ञानाची महती या पिढीला उमगावी आणि त्यांतून उदयास येणा-या नव्या शक्तीचा उपयोग महाराष्ट्राच्या बांधणीसाठी व्हावा असं कांही प्रत्यक्षांत घडणं आवश्यकच होतं.