काही साहित्यविचार -
मी साहित्यसमीक्षक नाही. एक रसिक मराठी भाषिक साहित्यप्रेमी आहे. आजच्या विद्वान अध्यक्ष ललित व समीक्षात्मक साहित्याच्या श्रेष्ठ अधिकारी आहेत. तेव्हा साहित्यविषयक प्रश्नांचा ऊहापोह त्या करतीलच. पण साहित्यप्रेमी हाही आजच्या लोकशाही युगात एक नम्र समीक्षक असतोच, आणि या दृष्टीने काही विषयांनामी स्पर्श करणार आहे. प्रथमतः सम समीक्षा करण्यासारखी आहे. ती म्हणजे वैचारिक प्रवर्तन व प्रबोधनाच्या दृष्टीने मराठी साहित्यात काय झाले. एका अर्थाने भारतीय प्रबोधनाची सुरुवात बंगालबरोबर महाराष्ट्रात झाली. काय घडले व काय घडावयास हवे हेही पाहणे संयुक्तिक ठरेल. न्या. रानडे यांनी मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन १८७८ मध्ये पुण्यास भरविले. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय प्रबोधनास मराठी साहित्यिकांनी व पत्रकारांनी हातभार लावला. १९४७ मध्ये भारतीय समाजाचे स्वातंत्र्यपर्व सुरू झाले. आता रचनापर्व सुरू झाले आहे. भारतीय समाजाच्या जागृतीचा नवा काळ आला आहे. जे हक्क राज्यघटनेने आपल्या समाजातील उपेक्षितांना दिले आहेत त्यांची जाण नव्या पिढीत आली आहे. तेव्हा ही स्वातंत्र्यजात नवी पिढी आता जुन्या समाजरचनेविरुद्ध बंड करून उठते आहे. एकेकाळच्या उपेक्षितांच्या अंतरंगात असलेले भावनांचे कढ साहित्यात दिसू लागले आहेत. साहित्य हे थर्मामीटरमधील पार्यासारखे संवेदनाशील असते. निदान असावे. समाजाच्या मानसामध्ये जे असते तेच साहित्यात अवतरते, मराठी साहित्याचा इतिहास हेच सांगतो. आधुनिक काळात जो राष्ट्रवाद आला, जी राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली, जे स्वातंत्र्याचे नवे विचार आले त्यांचे परिणाम साहित्यावर झाले. भारतीय समाजाच्या या रचनापर्वात नव्या विचारांची व सर्वांगीण ज्ञानाची बीजे टाकत राहणे हेही साहित्यिकाचे महत्त्वाचे कार्य आहे. कारण त्या विचारांनी प्रेरित झालेले व भारलेले राजकीय कार्यकर्ते समाजाला पुढे नेत असतात. यासाठी वैचारिक व चिंतनशील वाङ्मयाची महती नजरेआड करण्यासारखी नाही. मला वाटते ही सामाजिक जाणीव, आपल्या सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा असते. म्हणून आता नव्या सामाजिक प्रबोधनाचे चिंतन करणारे साहित्य हेच उद्याच्य मराठी साहित्याचे स्वरूप असणार अशी माझी धारणा आहे. गेल्या ५० वर्षांत भारतात जे व्यक्तिस्वातंत्र्यवादी, मार्क्सवादी व गांधीवादी विचार आले त्या सर्वांनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. निदान माझ्या पिढीपुरते मी हे निश्चित म्हणतो. साहित्य कोणत्याही रंगाचे असले तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यास करून, समाजात सर्व थरांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची जाणीव असणारे समाजचिंतन त्यात असले पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांनी एकदा म्हटले होते की, लोकशाही हे प्रज्ञेचे राज्य असते. ही प्रज्ञा समाजाभिमुख असली पाहिजे, तरच ती समाजाचे परिवर्तन घडवून आणील, त्याला मार्गदर्शन करीत राहील बुद्धीची कुवत वाढविणे, मने व्यापक करणे, जगातील नव्या प्रवाहांची समीक्षा करणे, स्वतःच्या संस्कृतीचा व परंपरेचा बुद्धिनिष्ठ अभ्यास करून नव्या परिस्थितीला सुसंगत अशा मूलभूत परिवर्तनासाठी जनमानसाला तयार करणे ही पुढच्या पिढीतील चिंतनशील साहित्याची उद्दिष्टे असू शकतात. गेल्या शतकात मार्क्सने इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी सांगून एक प्रचंड विचारप्रवाह सुरू केला. या शतकातील टॉयनबीसारख्या इतिहास-पंडिताने मानवी संस्कृतीचा अभ्यास करून सर्जनशील चिंतनाचा आणखी एक नमुना आपल्यापुढे ठेवला. आज समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेकविध ज्ञानशाखांचा उपयोग करून आपल्या इतिहासाचे, आपल्या समाजाचे पुनरध्ययन करणे शक्य आहे. मराठीमध्ये अशा अभ्यासाची गरज आहे.
दलित समाजातून आलेल्या नव्या मराठी साहित्यिकांनी जे साहित्य निर्माण केले आहे ती मराठीतील एक मोलाची भर आहे, असे मी मानतो. उच्चभ्रू साहित्याचे किंवा त्यांच्या संकल्पनांचे मानदंड लावून त्याला जोखणे चुकीचे आहे. उच्चभ्रू साहित्यात पाश्चात्त्य वळणाची अश्लीलता आपणाला चालते, दलित समाजातून येणार्या साहित्यिकाच्या भाषेस मात्र आपण नाके मुरडतो. हा नैतिक भेदभाव आहे, दुहेरी मानदंडाची भावना त्यामागे आहे, असे मला वाटते. म्हणून ज्या सामाजिक थरातून लेखक आलेला असेल त्याची भाषा त्याच्या साहित्यात आली तर ती स्वागतार्ह मानली पाहिजे. शेवटी भाषेचे माध्यम अभिव्यक्तीसाठी वापरावयाचे असेल तर तिचा सामाजिक अभिव्यक्ती हाही एक अविभाज्य भाग आहे. हजारो वर्षे दडपल्या गेलेल्या समाजाचा पहिला उद्गार हा रूढ कल्पनेप्रमाणे असावा असे मानणे चुकीचे आहे. तो 'उद्गार' निघाला हेच सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. तो असेल तसा आला पाहिजे. आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. मला वाटते आपले हजारो वर्षांचे संस्कार अशा अभिव्यक्तीतून बाहेर पडले तर ते सामाजिक दृष्ट्या आरोग्यदायक ठरेल. आदिवासी व उपेक्षित जाती यांची भाषा आता नव्या मराठी भाषेत येणार आहे. हे सामुदायिक चयन किंवा देवाणघेवाण भाषेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्याने मराठी भाषा समृद्ध होईल. म्हणून दलित साहित्याची भाषा कदाचित वेगळी वाटली तरी तिचा कस, तिच्यातील रग, जर नव्या मराठीत उतरली तर ती हवीच आहे. पण यासाठी जाणकारांनी व सामान्य वाचकांनी स्वागतशील वृत्ती ठेवली पाहिजे.
दुसरा एक मुद्दा दलित साहित्यासंबंधी सांगण्यासाखा आहे. ती एक उपेक्षित सामाजिक स्तरांच्या भावनांची जी कोंडी इतकी वर्षे झाली होती ती आज फुटली आहे. त्याचा सामाजिक सुधारणेसाठी व सामाजिक प्रक्रियेसाठी उपयोग होईल. जी समाजसंस्था जुनी झाल आहे तिच्याविषयी संबंधित सामाजिक गटांना काय वाटत होते, तिचा जाच त्या गटांना कसा होत होता, त्यांचा सामाजिक अनुभव काय होता, याचे जे दर्शन या साहित्यातून घडते ते सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. सामाजिक वास्तवता कितीही कठोर व कटू असली तरी ती समाजसुधारकाला पाहावी लागते. एखाद्याच्या रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टरला जशी माहिती हवी असते तसेच हे आहे. म्हणून हे साहित्य हा आरसा आहे. त्याचा सामाजिक उपयोग होण्यासारखा आहे. केवळ साहित्यबाह्य निकष लावून जरी या साहित्याचा विचार केला तरी ते मोलाचे आहे.
यशवंतराव चव्हाण
(कराड येथे १९७५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य-संमेलनाच्या स्वागताध्यक्षीय भाषणातून)