यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३२

विभाग ५. - कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास - शेवटची भेट  (मो. ग. तपस्वी)

कै. यशवंतराव चव्हाण दिल्लीत आले, तेव्हापासून त्यांचा आणि माझा नकळत एक तार जुळल्यासारखा सुसंवाद निर्माण झाला.  आता यशवंतराव इहलोकीचे कार्य आटोपून कायमचे निघून गेले आहेत.  त्यांची पहिली भेट झाली २४ नोव्हेंबर १९६२ रोजी.  तेव्हा मी आकाशवाणीवरून मराठीतील बातम्या देत होतो.  त्यांची शेवटची भेट झाली ती नवी दिल्लीतील आयुर्विज्ञान संस्थेत शनिवार २४ नोव्हेंबर १९८४ रोजी संध्याकाळी ५ वाजता.  तेव्हा त्यांचा अखेरचा प्रवास सुरू होऊ पाहात होता.  दोन्ही प्रसंगी आमचे थोडेसे बोलणे झाले होते.  पहिल्या भेटीत अनोळखीपणाचा किंचित संकोच होता.  शेटच्या भेटीत २२ वर्षांत सतत वाढत गेलेला स्नेह दाटून आला होता.  पहिल्या भेटीत ते म्हणाले होते, '' वा, वा, तुमचे नाव मी नेहमी ऐकलेले होतेच, आता परिचय झालाय, भेटत चला.  तुम्ही मराठी माणसे दिल्लीत महाराष्ट्र राखून आहात.  आता मीही दिल्लीत आलो आहे.  तुमचं हक्काचं आणखी एक घर दिल्लीत वाढलंय असं समजा.''  शेवटच्या भेटीत माझा हात आपल्या दोन्ही हातांत घेऊन आपल्या क्षीण झालेल्या आवाजात म्हणाले होते, ''किर्लोस्करच्या दिवाळी अंकातील तुम्ही घेतलेली माझी मुलाखत फारच सुरेख झाली आहे !''  आणि दुसर्‍याच दिवशी यशवंतरावांचे निधन झाले.

या २२ वर्षांत माझ्या अनेक सुखदुःखांच्या प्रसंगी यशवंतराव जातीने हजर राहिलेले मला आठवतात.  त्यांच्याही अनेक सुखदुःखाच्या वेळी मीही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी जिवाभावाच्या चार गोष्टी केल्या आहेत.  तो सारा पट, ते सारे प्रसंग बावीसपट वेगाने डोळ्यांपुढून झरझरझर सरकत आहेत.  या काळात पत्रकार या नात्याने, व्यक्ती या नात्याने, माणूस म्हणून, त्यांच्यातील बारकावे टिपण्याची संधी मला मिळालेली आहे.  त्यांच्यावर टीका करण्याचे प्रसंग अनेक आले आहेत.  त्यांच्या अनेक गाजलेल्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत.  'यशवंतराव : एक मांडलिक' हा पुण्याच्या 'माणूस' च्या एका विशेष अंकातील माझा लेख त्या वेळी बराच खळबळकारक ठरला होता.  यशवंतरावांनीही अर्थातच तो वाचला होता.  त्यानंतर भेट झाल्यावर आता ते काय म्हणतील याची, नाही म्हटले तरी, थोडी धाकधूक मनात असतानाच मी त्यांना भेटलो.  काय म्हणावे या माणसाने ?  म्हणाले होते, 'माझ्याबद्दलच्या तुमच्या अपेक्षा स्पष्टपणे मांडल्याबद्दल आभार.'  माझ्या मनातील सर्व धाकधूक त्यांनी घालवली होती.  पण त्याचबरोबर माझी टीका ही त्यांच्यावरील मराठी माणसाच्या प्रेमातूनच आकारली असून त्या प्रेमातून उत्पन्न होणार्‍या अपेक्षांना आपण कदाचित पुरे पडत नाही एवढेच त्यांनी त्यांच्या शैलीत प्रकट केले होते.

वर 'किर्लोस्कर' च्या दिवाळी-अंकासाठी घेतलेल्या मुलाखतीचा उल्लेख आला आहे.  ती मुलाखत ठरवायला गेलो आणि काँग्रेसला आता १०० वर्षे होत आली असल्यामुळे 'काँग्रेस संस्कृती' हा विषय असून हे प्रश्न तयार आहेत, असे मी त्यांना सांगितले.  यशवंतराव म्हणाले, ''तपस्वी, हा अंक प्रसिद्ध होईल तेव्हा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागलेले असणार आहेत.  अशा काळात तुम्ही परखड प्रश्न विचारणार.  मला त्यांची उत्तरे तितक्याच परखडपणे देता येणार नाहीत.  मला खोटे बोलता येणार नाही, खरे सांगताना पंचाईत होईल.''

''यशवंतराव, प्रश्न विचारणे माझे कामच आहे.  पण त्यांना उत्तरे कशी द्यायची ते तर तुमच्या हातात राहणार आहे ना ?  शिवाय, तुम्हाला माहीत आहे की तुमचा कोणताही शब्द मी कधीही फिरवलेला नाही की आताही तो तसा फिरवणार नाही.  तुमची प्रतिष्ठा मलाही प्यारी आहे, आणि माझी प्रतिष्ठा तुम्हीही जाणताच.''  ''ठीक आहे, शुक्रवारी सकाळी नवाला भेटू, देतो मुलाखत.''  बुधवारी मला एकाएकी सडकून ताप भरला.  तो गुरुवारी रात्री उतरला.  यशवंतरावांना वेळ आणि शब्द पाळण्याचे भान फार असे.  म्हणून तशाही परिस्थितीत मी शुक्रवारी सकाळी पावणेनवालाच त्यांच्या बंगल्यावर पोचलो.  यशवंतराव माझी वाट पाहात बसले होते.  म्हणाले, ''लवकर आलाहात, तर लवकर संपवून टाकू या.''  आणि ही मुलाखत फारच सुरेख झाली आहे असे मला आवर्जून सांगण्याचे भानही त्यांनी जवळजवळ मरणासन्न अवस्थेतही राखले होते.

हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावून आला तेव्हाचे यशवंतराव, पं. नेहरूंचे निधन झाले तेव्हाचे यशवंतराव, लालबहादुर शास्त्री यांच्या बरोबर संरक्षणमंत्री या नात्याने १९६५ चे पाकिस्तानशी झालेले युद्ध जिंकून ताश्कंद-वाटाघाटीसाठी गेलेले यशवंतराव, शास्त्रींचे पार्थिव शरीर ताश्कंदहून घेऊन आलेले यशवंतराव अशी त्यांची मजल-दर मजल तेजावळतच गेलेली नाना रूपे मी जवळून न्याहाळलेली आहेत.  त्या वेळेपासूनच उद्याचा पंतप्रधान असे एक मोठे वलय त्यांच्या भोवती निर्माण झाल्याचेही मी आणि येथील अनेक पत्रकारांनी पाहिलेले आहे.  त्यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले आणि सरदार पटेलांच्या जागी विराजमान झाले, तेव्हा सर्वांनाच आता ते क्रमांक २ वर पोहोचले असून योग्य वेळी क्रमांक १ वर पोहोचणे हा आता फक्त काळाचाच प्रश्न उरला आहे असे वाटले होते.  ते गृहमंत्री असताना पंजाबात फत्तेसिंगांनी आमरण उपोषण आरंभिले होते.  शीख बांधवांनी आंदोलन उभे केले होते.  त्यांना पंजाबी सुबा हवा होता.  मुख्यमंत्री घाबरले होते.  त्यांना बाहेर तोंड काढणे अवघड झाले होते.  ते यशवंतरावांचा सल्ला घ्यायला आले, तेव्हा मी योगायोगाने त्यांच्याशी बोलत बसलो होतो.  मी एक पत्रकार असूनही यशवंतरावांनी मला तेथेच बसू दिले हा त्यांचा माझ्यावरील विश्वास.  तो मी शेवटपर्यंत राखला.  बातमीचा भाग सोडून एक हृद्य प्रसंग सांगतो.  यशवंतरावांनी त्या मुख्यमंत्र्याचे सर्व म्हणणे ऐकून घेतले.  नंतर ते त्याला म्हणाले, ''मित्रा, लोकांपासून पळू नकोस.  जे लोक आज तुला खेटरांच्या माळा घालू पाहात आहेत, तेच तुला उद्या फुलांचे हार घालायला येतील हे लक्षात ठेवून वाग.''  मुंबईतील संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी काळ्या घोड्यावर अशाच बेफाम जमावाला याच भावनेने यशवंतराव एकेकाळी सामोरे गेले होते.  दिल्लीतील पोलिसांचे आंदोलन त्यांच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन आले असता सल्लागारांचा सल्ला अव्हेरून गृहमंत्री यशवंतराव त्यांना आपल्या बंगल्याबाहेरील फाटकाशी सामोरे गेले होते.  पंजाबी मित्राला ते अनुभवाचे बोलत सांगत होते.  यशवंतरावांपेक्षाही अंगापिंडाने धिप्पाड असलेल्या त्या पंजाबी माणसाने यशवंतरावांना अगदी पायाला हात लावून नमस्कार केला हे मी पाहिले.  धैर्याचा हिमालय लोकांशी समरस झालेलया त्या लोकसह्याद्रीच्या पायाशी वाकला होता.