यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व- स्मृतिसंकलन-१

'छावा' आणि यशवंतरावजी यांचा काही तरी गूढ व मलाही न आकळणारा ॠणानुबंध असावा असं मला वेळोवेळी वाअत आलं आहे.  नुकत्याच झालेल्या एका स्कूटर अपघातानं मी १९७८ च्या अखेरीला जबरदस्त व्याधिग्रस्त होतो.  छाव्याचे शेवटचे प्रकरण बांधायचे होते.  पराकोटीच्या जिद्दीनं सौ. ला ते डिक्टेट करून, छाव्याचं हस्तलिखित पूर्ण करून मी जसलोक रुग्णालयात दाखल झालो.

१९७२ साली ही शंभूकथा मी लिहायला हाती घेतली.  तेव्हाच तिचं प्रकाशन यशवंतरावजींच्याच हस्ते करायचं मी मनोमन पक्कं ठरवलं होतं.  त्यावर आता १९७९ साल उजाडलं होतं.

'जसलोक' मधून मी एक साधं पोस्ट कार्ड दिल्लीला पाठवून साहित्यप्रेमी व बावन्नकशी मराठमोळं माणूसपण अंगी सहज वागविणार्‍या यशवंतरावजींनामी माझी तीव्र इच्छा कळविली.  ते पोस्टकार्ड त्यांच्याशी खूप बोलून गेलं.

ते दिल्लीहून पुण्याला आले.  त्यांनी पूजन व प्रकाशन संपन्न करून काँटिनेंटलच्या श्री. अनंतराव कुलकर्णी यांना माझ्या तब्येतीबद्दल विचारलं.  माझ्या कुटुंबियांची अत्यंत आस्थेनं व जिव्हाळ्यानं त्यांनी चौकशी केली.

थोड्याच दिवसांत 'छाव्याची' पहिल्या आवृत्तीतील पहिली प्रत सर्वप्रथम त्यांच्या हस्तेच प्रतापगडावरील तुळजाभवानीच्या चरणी वाहण्याची माझी इच्छा मी त्यांना कळविली.  महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असतानाची एक योग्य तारीख त्यांनी लागलीच पत्राने कळविली.  ती उन्हाळ्यातील तारीख होती.  ते कर्‍हाडहून प्रतापगडावर परस्पर आले.  मी व काँटिनेंटलच्या वतीने अनिरुद्ध कुलकर्णी पुण्याहून गेलो.

यशवंतरावजी देवदर्शन आटोपून प्रतापगडावरील भवानी मंदिरातून बाहेर येत असताना आम्ही पोचलो !  ते हाती छाव्याची प्रत घेऊन पुन्हा परतले.  ती भवनीच्या चरणी ठेवून त्यांनी डोळे मिटून हात जोडले.  

त्यांच्या मनी तेव्हा नेमके काय विचार आले असतील हे सांगता येणं खरोखरच अवघड आहे.

ते श्रद्धेनं व अकृत्रिम नेकीनं मानत असलेल्या शिवप्रभूंचं व भवानीमातेचं त्यांनी नक्कीच स्मरण केलं असावं.

'छावा' ची एक प्रत त्यांच्या हाती देऊन मी त्यांना मंदिरातच नमस्कार केला.  त्यांच्या छायी असलेल्या सूक्ष्म व अत्यंत तरल साहित्यिक जाणिवेचा आशयघन प्रत्ययच मला पुढच्या भेटीत त्यांनी दिला - 'शंभूजन्माच्या वेळी चिंताग्रस्त जडावल्या फेर्‍या पुरंदरच्या बाळंतिणीच्या दालनासमोर घेणार्‍या जिजाऊंच्या नजरेला म्हणून 'चंद्रावळी शांत नजर' असं एक विशेषण मी वापरलं आहे.  त्यावर नेमकं लक्ष वेधवून ते त्या भेटीत म्हणाले, ''चंद्रावळी नजर'' ही तुमची कल्पनाच त्या नजरेला शोभणारी आहे. (मला वाटतं हे वाचताना व आता बोलातानाही त्यांना मातुश्री विठाईंची तीव्र आठवण झाली असावी.)

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एक 'बलवंत' 'यश' अंतर्धान पावलं आहे, याच शीर्षकाचा एक लेख दै. लोकसत्ताकडे पाठविला आहे.  तो लिहिताना व आजही 'छाव्याच्या' संदर्भात ही एवढीशी आठवण लिहिताना मन व डोळे दाटून आले आहेत.  यशवंतरावजींसारख्या अंबाभक्ताला सद्‍गतीशिवाय काय मिळणार !  त्यांच्या, महाराष्ट्राला सदैव प्रेरक ठरणार्‍या निकोप स्मृतीला नम्र-नम्र अभिवादन !

शिवाजी सावंत