यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३२-१

पण असे एकामागून एक दिग्विजय करीत निघालेल्या यशवंतरावांची गेल्या दशकातील वाटचाल मात्र चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली.  गृहमंत्रिपदावरून त्यांची उचलबांगडली झाली त्यापूर्वीचा प्रसंग.  यशवंतरावांचया बंगल्याच्या मागच्या हिरवळीवर आम्ही दोघेच फेर्‍या घालीत बोलत होतो.  जास्त बोलणे अर्थातच माझे होते.  मी काहीसा वैतागलो होतो, थोडासा संतापलोही होतो.  माझा प्रश्न होता, ''यशवंतराव मला सांगा, उद्या तुम्हाला अगदी कुटुंब कल्याण खात्याचा मंत्री केले तरी तुम्ही त्याला होच म्हणावे एवढी लाचारी तुम्ही का दाखवायला निघाला आहात ?  तुम्हाला काय साधा खासदार राहताच येणार नाही ?  सातार्‍याच्या लोकांनी तुम्हाला काय मंत्रिपदावर राहण्यासाठीच निवडून दिले आहे ?  आणि असा एकामागून एक अवमान सोसत लाचार होऊन राहण्यापेक्षा तुम्ही राजीनामा देऊन आपल्या गावी जाऊन वकिली नाहीतर मास्तरकी सुरू केलीत तर काय बिघडणार आहे ?''

यशवंतरावांनी माझा खांदा थोपटला आणि त्यावर हात टाकून फिरत असतानाच म्हणाले, ''पण मला गृहमंत्रीच राहू द्या, नाहीतर हा घ्या माझा राजीनामा, असे मी म्हटले, तर पदासाठी, विशिष्ट हुद्दयासाठीच मी इंदिराबाईंबरोबर आलो, असा प्रचार सर्व सरकारी माध्यमे माझ्याविरुद्ध करतील, त्याचे काय ?''

'' यशवंतराव, माफ करा, पण कोणतेही पद मिळाल तरी चालेल पण मला मंत्रिमंडळात राहू द्या असे म्हणण्याइतके यशवंतराव लाचार झालेले आहेत असे मराठी मनाला वाटेल त्याचे काय, हा खरा प्रश्न आहे.''

''तुमच्यासारखेच कळकळीने अनेकांनी मला लिहिलेले आहे.''  एवढेच यशवंतरावांनी त्या वेळी म्हटले.  सगळे संभाषण देण्याचे हे स्थळ नव्हे. पण त्यानंतर झाले ते मात्र हेच की तेव्हापासून यशवंतरावांचे पुढचे सारे दान दिल्लीच्या राजकीय सारीपटावर उलटेच पडत गेले.  बाजू त्यांच्यावर उलटतच गेली.  १९६९ साली त्यांच्या हातून घडलेली एकच चूक त्यांना पुढील काळात सतत चुकीच्याच मार्गाने या चक्रव्यूहात जास्तच खोल खोल बुडवीत गेली.  १९६९ मध्ये काँग्रेसच फुटली नाही, तर सारे राजकारणच कुशीमुशीसह बदलून गेले.  राजकारणाचा पिंड बदलला, त्याचा धर्म बदलला, त्याची प्रकृती बदलली, त्याची प्रवृत्तीही बदलून गेली.  त्याबरोबर यशवंतरावांना बदलता आले नाही.  बदलता येणे शक्यही नव्हते.  गेल्या दशकात म्हणूनच यशवंतरावांचा राजकारणात विलक्षण कोंडमाराच होत गेला.

सत्तेच्या राजकारणात यशवंतरावांचे नाव बिनीवर पोचले असतानाच त्यांना तेथून खाली खेचण्याचे डावपेच दिल्लीत सुरू झाले.  इंदिराबाईंसारख्या जबरदस्त आणि एकदम तडकतोड निर्णय घेण्यात पारंगत असलेल्या नेतृत्वापुढे, सर्वांना घेऊन चालण्याचे, दूरगामी आणि पक्षनिरपेक्ष राष्ट्रकारण करण्याचे बाळकडू प्यालेले यशवंतरावांचे नेतृत्व थिटे पडू लागले.  राजकारण हे अखेर सत्तेसाठीच असते असे नेहमीच ठासून सांगत आलेले यशवंतराव दिल्लीत तशी संधी आली असताना त्याच सत्तेच्या राजकारणाचे सर्वांत मोठे बळी ठरले.  मग आज त्यांचे गोडवे गाणारे लोक, ते मधल्या काळात जेव्हा इंदिराबाईंबरोबर नव्हते तेव्हा त्यांना नाही नाही त्या शिव्यांची लाखोली वाहण्याची अहमहमिका लावताना दिसू लागले.  त्यांना कलंक म्हटले गेले.  आणि आज ?  कुठे आहेत ती माणसं ?  आज इंदिराबाई नाहीत.  प्रचंड मनस्ताप सोसून, कोंडमारा सहन करून पुन्हा 'स्वगृही' यायला निघालेल्या यशवंतरावांना महिनोगणती दादाबाहेरच्या उंबरठ्यावरच तिष्ठत ठेवणारे ते नेतृत्व संपले.  नवे नेतृत्व पुन्हा यशवंतरावांची कदर करू लागले होते.  पण तरीही इंदिराबाईंबद्दल नेहमीच कमालीचा आदरच व्यक्त करणारे यशवंतरावही आता आपल्यात नाहीत.  पण स्पष्ट आहे ती एक गोष्ट, की एकदा तत्कालीन सिंडिकेटच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंदिराजींच्या मनातून यशवंतराव जे उतरले होते ते पुन्हा काही पहिल्यासारखे इभ्रतीने त्यांच्या मनात पुन्हा स्थानापन्न झाले नाहीत.  आणीबाणीसारख्या अतिशय अवघडलेल्या काळातही यशवंतरावांनी इंदिराजींचीच साथ धरली, तरीही तो विश्वास काही पुन्हा आला नाही.  दिल्लीतील अत्युच्च सत्तावर्तुळात यशवंतरावांबद्दल दुस्वास, दुरावा, अविश्वास कायमच राहिला.  मग यशवंतराव पुन्हा काँग्रेस फुटली तेव्हा इंदिराजींविरुद्ध गेले, निवडूनही आले, तरीही 'बंदू से गई वह हौद से वापस नहीं आई.'

सत्तेच्या राजकारणाचा पिंड बदलून गेला.  यशवंतराव आपल्या जुन्या संस्कारांनी जुन्या निष्ठांची शस्त्रे घेऊन तगून राहण्याचा प्रयत्‍न करताना जिकिरीला आले.  टेकीला आले. परत इंकांत दाखल झाले.  पण पुन्हा ती रया आली नाही.  तशातच वेणूताई गेल्या.  पुत्रासारखा वाढवलेला पुतण्या डॉ. विक्रमही गेला.  यशवंतराव पार खचले.  बदललेल्या राजकारणाच्या दमछाकीच्या लढाईत यशवंतराव केविलवाणे झाले.  यशवंतरावांचा दिल्लीतील हा असा उदयास्त आता राष्ट्राच्या मर्मबंधातील गाथा बनून गेला आहे.  मला वाटते राष्ट्राच्या मर्मबंधातील एक अतिशय आर्त नेता म्हणून यशवंतरावांची आठवण दिल्लीतील राजकारणाचा निःपक्ष इतिहास लिहिला जाईल तेव प्रकर्षाने लिहिला जाईल.  किंबहुना ती आता आली अमरगाथा झालेली आहे.  कर्तव्यकठोर असतानाही कनवाळू, राजकारणात रमत असतानाही कमालीचा रसिक, कार्यक्रमाधिष्ठित राजकारणावर प्राणाहून जास्त प्रेम करणारा नेता, अतिशय सद्विवेकी आणि सदाचारी मित्र, राजकारणाहूनही आपल्या शब्दपालनाचे मर्म पाळणारा नेता, लोकसंग्रही आणि सतत इतरांचे कल्याणच चिंतिणारे मन असलेला माणूस असे नाना पैलू घेऊन यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व फुलले होते.  अशा जीवनाची दिल्लीच्या राजकारणात अखेरीस शोकांतिका झाली असेल तर ती संपूर्ण राजकारणाचीच शोकांतिका आहे, हे यशवंतरावांच्या निधनामुळे गोळा झालेली आंसव संपल्यानंतर स्वच्छ झालेल्या प्रत्येक राष्ट्रहितैषी दृष्टीला नक्की जाणवेल.