ही दोन्ही कामे अतिशय अवघड होती. मी प्रथम लाकूडवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या मागे लागलो. त्यात मला कोणत्या अडचणी आल्या, पोलिसी आणि कार्पोरेशनच्या भ्रष्टाचाराचे किती नमुने मी बघितले, वरून कळ फिरविल्याशिवाय काह काम कसे होत नाही याचा अनुभव मला कसा आला, वरची एक कळ फिरविण्यात मी कसा यशस्वी झालो याचे वर्णन मनोरंजक असले तरी प्रस्तुत नाही. पण अखेर आम्हास तीन दिवस पोलिस संरक्षण मिळाल आणि आम्हासच आपल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यास सांगण्यात आले. आम्ही तीन दिवसांत हे काम केले आणि कार्पोरेशनच्या माणसाकडून आणली हद्द आखून घेतली व काटेरी व तारेचे कुंपणही लावले. हे सर्व झाल्यानंतर अध्यक्ष या नात्याने घडलेली हकीगत श्री. यशवंतरावांना सांगण्यास गेलो. साहजिकच त्यांना खूप आनंद झाला.
काम करणार्या कार्यकर्त्यांवर विश्वास टाकण्याच्या यशवंतरावांच्या स्वभावाचे एक दोन नमुने आणखी लक्षात राहिले आहेत. अतिक्रमण हटविल्यानंतर शिक्षण संस्थेचा आर्थिक पाया मजबूत कसा होईल ही चिंता होती. या वेळी महामहोपाध्याय श्री. काणे यांचे चिरंजीव श्री. जी. पी. काणे मला एकदा म्हणाले, शिक्षण संस्थेचा संघटनात्मक पाया संकुचित आहे. तो थोडा व्यापक केल्याशिवाय इतरांचे साहाय्य तुम्हास मिळू शकणार नाही. ही वस्तुस्थिती होती. दिल्ली महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाने शिक्षण संस्थेची स्थापना केली. आताच्या परिस्थितीला अनुरूप असे स्वरूप तिला देणे आवश्यक होते. तिचा पाया व्यापक करणे आवश्यक होते. आम्ही सभासद संख्या वाढविली.
दुसरे उदाहरण कार्यकर्त्यांच्या मतावर विश्वास टाकण्याच्या श्री. यशवंतरावांच्या स्वभावावर आणखी अधिक प्रकाश टाकणारे आहे. शिक्षण संस्थेची कायमची आर्थिक तरतूद करण्याच्या दृष्टीने सहकार्यांच्या मदतीने काही पावले उचलावयास आम्ही सुरुवात केली होती. शाळेच्या आवारात एक अद्ययावत सभागृह उभारण्याची योजना होती. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून भरपूर मदत मिळण्याचे आश्वासन मिळाले होते. पण महाराष्ट्र सरकारकडून आमच्या सभागृहासाठी पाच लक्ष रुपये मिळण्याचे आश्वासन श्री. यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमाने मिळाल्यानंतरची घटना आहे.
महाराष्ट्रावर दुर्दैव ओढवले आणि कोयना परिसरात भूकंप झाला. अनेक कुटुंबे उदध्वस्त झाली. युद्धपातळीवर त्यांना मदत करण्यास महाराष्ट्र सरकार कटिबद्ध झाले. दिल्लीकर महाराष्ट्रीयांचीही एक सभा झाली. त्या सभेत यशवंतराव म्हणाले, ''दिल्लीकर महाराष्ट्रीयांनी निव्वळ सहानुभूती व्यक्त करून आपली जबाबदारी झटकून टाकू नये. पीडितांच्या मदतीसाठी जेवढी शक्य असेल तेवढी मदतही गोळा करून पाठविली पाहिजे.'' यानंतर ते म्हणाले, ''मदत गोळा करण्याचे काम श्री. रघुनाथराव खाडिलकर बघतील आणि त्यासाठी जरूर असलेल्या आपल्यापैकी लोकांची ते मदत घेतील.'' असे म्हणून यशवंतराव माझ्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसले. त्यांनी हळूच मला विचारले, ''काय ठीक झाले ?'' ''मी आणि श्री. रघुनाथराव खाडिलकर बाहेरून या कामासाठी सर्व प्रकारची मदत करू. पण प्रत्यक्ष हे काम श्री. अण्णासाहेब शिंदे यांचेवर सोपवावे असे मला वाटते.'' असे मी सांगितले. श्री. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाने आम्ही एक लाखाच्यावर निधी जमविला.
या संदर्भात शेवटची आठवण महाराष्ट रंगायन कसे उभारले गेले याची आहे. शिक्षण संस्थेचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी आम्ही शाळेच्या आमच्या संस्थेच्या वतीने चालणार्या नूतन मराठी शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी श्री. वसंतराव नाईकांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावले. श्री. यशवंतराव त्या दिवशी दिल्लीत असतील व कार्यक्रमास हजर राहतील हेही बघितले. महाराष्ट्र सरकारकडून एक लक्ष रुपये मिळाले. आम्ही यशवंतरावांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम करूनप्रत्यक्ष कामास सुरुवातही केली. अपेक्षा होती की दुसरा लक्ष लौकरच येईल. पण तो येण्याची काही चिन्हे दिसेनात.
आमच्या पुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. सांगाडा उभा झाला होता. आणखी पैसा आल्याशिवाय सभागृहाचे काम पुरे होणे शक्य नव्हते. काम अर्धवट टाकता येण्यासारखे नव्हते म्हणून आम्ही महाराष्ट्र बँकेकडून तीन लक्ष रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरविले. कर्ज मिळालेही. यथावकाश काम पुरे झाले. सभागृहाचे नाव महाराष्ट्र रंगायन ठेवण्याचे ठरविले. १४ जानेवारी १९७१ ही उद्धाटनाची तारीख ठरविली. मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईकांना उद्धाटनासाठी बोलावले. उद्धाटनाच्या वेळी रंगायन गच्च भरले होते. या वेळी यशवंतरावांनी म्हटल्यामुळे असो अगर श्री. नाईकांनाच तसे वाटल्यामुळे असो, त्यांनी आणखी दोन लक्ष रुपये देण्याचे जाहीर केले. एक लक्ष इमारतीसाठी व एक लक्ष रंगायन वातानुकूलित करण्यासाठी. हे दोन लक्षही लौकर आले. या रंगायनामुळे आमच्या संस्थेचा आर्थिक प्रश्नही सुटला. यशवंतरावांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीनेच हे शक्य झाले.