२३. दिल्लीतील महाराष्ट्र आणि यशवंतराव (भा. कृ. केळकर)
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने १९५४-६० या सहा वर्षात दिल्लीत महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या किती पोरका आहे याचा अनुभव आला. महाराष्ट्राची मागणी किती प्रबळ आहे, दिल्ली दरवाजा ठोठावल्याखेरीज, दिल्लीच्या वेशीवर मराठी डफ आणि तुणतुणे वाजवल्याखेरीज दिल्लीश्वरांना समजणार नाही हे स्पष्ट कळले होते. १९५४ मध्ये दिल्लीत आल्यावर मला महाराष्ट्राचे हे राजकीय पोरकेपण उत्कटतेने समजले आणि असे असूनही केंद्रीय सरकारी नोकरीत राहून मला काही करणे शक्य नव्हते. पण अप्रकटपणे काहीतरी करावे व प्रकटपणे सांस्कृतिक क्षेत्र संघटित करावे असे मी ठरविले. यासाठीही राजकीय संरक्षण कवच आवश्यक होते. या काळात श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी ते दिले. काकासाहेबांचे ३१ फेरोझशहा रोड हेच त्या वेळी महाराष्ट्र केंद्र होते. सगळी खलबते तिथे चालत. सर्वश्री भाऊसाहेब हिरे, शंकरराव देव, एस. एम. जोशी, धनंजयराव गाडगीळ यांच्या भेटी तेथेच होत. त्या वेळी दिल्लीत असलेले माझे पत्रकार मित्र 'हिंदुस्थान समाचारचे' श्री. वसंत देशपांडे व केसरीचे श्री. द्वा.भ. कर्णिक यांना काकांचे घर हेच वार्ताकेंद्र, संपर्ककेंद्र म्हणून उपयुक्त असे. या सहा वर्षांत संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची व्याप्ती, प्रखरता आणि राजकीय अपरिहार्यता वाढत गेली. दिल्ली हे बॅरोमीटर (तापमापक) असल्यामुळे त्याच्यावर नजर ठेवणे आवश्यक होते. महाराष्ट्रातील हवामान दिल्लीश्वरांना कळण्याची अत्यंत गरज होती. खरे म्हणजे त्या वेळी डॉ. केसकर हे माहिती व नभोवाणी मंत्री व पु. म. लाड, त्यांचे स्वीय सचिव महाराष्ट्रीयच होते. पण राजकारणात त्यांचाही उपयोग नव्हता. वृत्तपत्रावर दडपण आणणे किंवा त्यांना महाराष्ट्राच्या मागणीचे महत्त्व व अर्थ उघडपणे समजावून सांगणे त्यांना आवश्यक होते. पु. म. लाड यांची तडफड मी पाहिली आहे. म्हणून वृत्तपत्रांना खरी माहिती पुरविण्याचे काम वैयक्तिक पातळीवरच करावे लागले. राजकीय हवामान महाराष्ट्रात जसजसे तापत होते, तसतसी महाराष्ट्राविषयीची गैरसमज पसरविण्याची मोहीम जास्त जोरदार होत होती. जेव्हा महाराष्ट्रीय लोक बायकांवर अत्याचार करीत आहेत अशा बातम्या इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागल्या तेव्हा द्वा. भ. कर्णिकांमार्फत संसदभवनातच शंकरराव देवांची वार्ताहार परिषद योजावी लागली. एकदा महाराष्ट्रीयांसाठी एस. एम. जोशी यांचे व्याख्यान ठेवले. पुढे महाराष्ट्रातून मोर्चा आला. त्या दिवशीच चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आचार्य अत्र्यांचे भाषण ऐकले तेव्हा मोकळे वाटले. सत्याग्रहींना उघड उघड मदत करणे हे सरकारी नोकरांना शक्य नव्हते. पण काकासाहेब गाडगीळ हे दिल्लीतील-महाराष्ट्रीयांचे आधारवड होते. त्यामुळे या सर्व प्रसंगांत त्यांचा आधार असे. या सर्व घटना इतक्या वेगाने घडत होत्या. त्याच काळात दिल्लीत महाराष्ट्राचे माहिती व संपर्क केंद्र असणे आवश्यक आहे हा विचार सुचला व एखादा ट्रस्ट करून हे काम सुरू करावे असे ठरवले. एवढ्यात महाराष्ट्र राज्य स्थापन होणार हे दिसू लागले. तेव्हा मी यशवंतराव चव्हाणांना दिल्लीत 'महाराष्ट्र इन्फर्मेशन सर्व्हिस' सुरू करणे आवश्यक आहे व नव्या महाराष्ट्र शासनाने ही कल्पना स्वीकारावी अशी सुचना करणारे पत्र १० ऑक्टोबर १९५९ रोजी लिहिले. त्याचे उत्तर आले नि ३ डिसेंबर १९५९ त्यांना समक्ष भेटून सर्व कल्पना सांगितली. त्या भेटीतच असे केंद्र दिल्लीत काढायचे आणि ते काम मीच करावे अशी इच्छा यशवंतरावांनी व्यक्त केली. एक वर्षभर मी अनधिकृतरीतीने सर्व कामे करीत होतो. यशवंतरावांनी मुख्य सचीव श्री. नारायणराव मोने व प्रसिद्धिसंचालक श्री. विनोद राव यांना या कामात मला पूर्ण स्वातंत्र्य देण्यास सांगितले व मला म्हणाले, ''तुमची ही कल्पना मी ऐकली तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो.'' यशवंतराव मुख्यमंत्री असताना सहा महिनेच प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली पण या केंद्रास सांस्कृतिक संपर्काचे व आदानप्रदानचे माध्यम समजावे नी राज्यकर्त्या पक्षाच्या लॉबीचे माध्यम बनवू नये किंबहुना हे केंद्र सर्व महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र व्हावे ही कल्पना यशवंतरावांच्या राजकीय समंजसपणामुळे व उदारतेमुळेच सरकारीरित्या मान्य झाली व पुढचे काम सुकर झाले. यशवंतराव पुढे एकदा जुन्या आठवणी निघाल्यावर मला एकदा म्हणाले, ''जाणूनबुजून एक प्रकारची अलिप्तता मी केंद्राबाबत प्रारंभापासून ठेवली होती. आंतरभारतीच्या धर्तीवर तुम्ही केंद्राचे काम चालविले होते. तसेच ते मला चालावयास हवे होते. ते सरकारी केंद्र होऊ नये अशीच माझी इच्छा होती. म्हणूनच तुम्ही नेहरूंना या केंद्राची मुख्य कल्पना (१ मे १९६३ रोजी) सांगितली होती, तीच मी त्यांना आधीच स्पष्ट करून सांगितली होती.'' मी त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांनाही केंद्राच्या कामाची कल्पना दिली. त्यांनाही ती आवडली. शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यावर मी त्यांना भेटलो तेव्हा महाराष्ट्र परिचय केंद्रासारखे प्रत्येक राज्याचे केंद्र असलेले भारतभवन दिल्लीत बांधावे असे मी त्यांना सुचविले. दोनतीन दिवसांनी शास्त्रीजींनी बिहारच्या माहिती केंद्राचे उद्धाटन केले. त्या वेळी भारतभवनाच्या कल्पनेचा जाहीरपणे पुरस्कार केला. तेव्हा यशवंतरावांना आनंद झाला. दिल्लीतील माहितीकेंद्राची स्थापना महाराष्ट्राने केली तेव्हा ती संकुचित प्रांतीयवादाचे उपज केंद्र ठरेल अशी भीती सरकारी व बाहेरच्या वर्तुळात होती. पण ती नाहीशी होऊन पुढे माहितीमंत्री श्री. गोपाळ रेड्डी यांनी ह. ना. आपटे शताब्दी समारंभात जाहीरपणे भारतभवनाची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्री. केळकरांना महाराष्ट्र शासनाने मुक्त करावे असे सांगितले. न्या. छगला त्या समारंभाचे अध्यक्ष होते. हे सर्व करताना यशवंतरावांचे साहाय्य व उत्तेजन मला १९६७ मध्ये मी परिचय केंद्राचे काम सोडेपर्यंत मिळत होते.