यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २६-१

म्हणून, यशवंतराव आत्मचरित्राचा पहिला खंड म्हणून 'कृष्णाकाठ' प्रसिद्ध झाला आहे असे कळल्यावर मनाची उत्कंठा चांगलीच वाढली.  नंतर पुस्तक हातात आले.  पहिल्यावर साक्ष पटली की 'प्रिंटेक्स्ट' व 'प्रेस्टीज पब्लिकेशन्स'चे सर्जेराव घोरपडे व त्यांचे सहकारी यांनी पुस्तक भारदस्त व सुबक करण्यासाठी आपले प्रयत्‍न वेचले आहेत.  सहासष्ट रुपये किंमतीचे, डेमी ३२० पृष्ठांचे हे पुस्तक चांगले छापले व बांधले आहे.  पुस्तकाचे मुखपृष्ठ व मांडणी अभिजात व निर्णयसागरच्या जुन्या पुस्तकांची आठवण करून देणारी आहे.  पुस्तक 'आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी सौ. वेणूताई हिच्या स्मृतीस' अर्पण केले आहे.  पुस्तकाचे सर्वाधिकार 'सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट'ला दिले आहेत.  ही दोन्ही संस्मरणे हृद्य आहेत.  या आत्मचरित्राला पुरस्कार किंवा प्रस्तावना नाही.  यशवंतरावांच्या वृत्तिविशेषावर या छोट्या तपशिलानेही चांगला प्रकाश पडतो.  

'कृष्णाकाठ' मध्ये १९४६ पर्यंतचे चरित्रकथन आलेले आहे.  त्यामुळे नंतरच्या काळाबाबतची कुतूहले या प्रथम खंडाने प्रत्यक्ष पुरी होत नाहीत.  पण नंतरचे निर्णय कसे झाले असावेत याचा काही अंदाज या खंडात हाताशी येऊ शकतो.

या खंडात साधारण समसमान अशी तीन प्रकरणे आहेत.  'जडणघडण' (१९१३-३०), 'वैचारिक आंदोलन' (१९३०-३७) आणि 'निवड' (१९३७-४६) ही नावे त्या त्या कालखंडातील प्रसंगक्रमाला अन्वर्थक आहेतच.  शिवाय, लेखकाची वृत्ती प्रकट करणारी आहेत.

या सार्‍या कथनात यशवंतरावांची वृत्ती भावनात्मकतेपेक्षा वैचारिक आहे, उत्कटतेपेक्षा अलिप्‍ततेची आहे, आणि, गुंतलेपणापेक्षा तटस्थतेची आहे.  आणि हे या आत्मचरित्राचे सामर्थ्य आहे.  यात उत्कटतेचे, गहिवरून येण्याचे, प्रसंग नाहीत असे नाही.  १९४६ साली, पहिली उल्हासित निवडणूक जिंकल्यावर सौ. वेणूताईंनी यशवंतरावांना ओवाळले.  तेव्हा ते लिहितात -

''तेव्हा माझे डोळे पाणावले.  मी तिला ऐकू जाईल, असे सांगितले,
'वेणूबाई, या यशात तुझाही वाटा आहे.'
''ती किंचितशी हसली आणि म्हणाली,
'अशी वाटणी करावयाची नसते.' ''

या एका प्रसंगात यशवंतराव या लेखकाची लेखनामागील वृत्ती प्रकट होते.  त्यांचे डोळे पाणावतात.  तथापि, त्यांची लेखणी पाणावत नाही,  तीमुळे पुस्तकाची पाने पाणावत नाहीत.  कारण या आत्मचरित्रात महत्त्व 'चरित्रा'ला आहे, 'आत्म'ला नाही.  यशवंतरावांची ही 'आत्म' विलोपी वृत्ती जशी आयुष्यात तशी या आत्मचरित्रातही उतरली आहे, हे 'कृष्णाकाठ' चे मोठे यश आहे.

१९४६ च्या निवडणुकीतील हा वैयक्तिक अनुभव देण्याइतकेच त्या निवडणुकीचे वैयक्तिक व सामाजिक विश्लेषण करणे त्यांना महत्त्वाचे वाटते.  ते लिहितात ''गेल्या चाळीस वर्षांत दहा निवडणुका मी लढविल्या.  प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोट्या वेगळ्या, त्या वेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या.  परंतु इतकी सरळ, बिनखर्चाची, तत्त्वनिष्ठ व जनतेच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्यावर आधारलेली अशी कोणती निवडणूक असेल, तर ती १९४६ ची निवडणूक होय, हे मला कबूल केले पाहिजे.''  गेल्या चाळीस वर्षांत राजकारण कोणत्या दिशेने पालटले आहे यासंबंधीचे यशवंतरावांचे हे भाष्य जितके सौम्य तितकेच विदारक आहे.

आयुष्यक्रमावर, अनुभवावर, सामाजिक प्रवाहांवर यशवंतरावांनी केलेली भाष्ये हे या पुस्तकाचे महत्त्वाचे सौंदर्य आहे.  वैयक्तिक भावनांचा आविष्कार यशवंतरावांनी या चरित्रात अपरिहार्य तेव्हाच केला आहे.  त्यांच्या मातोश्री, ज्येष्ठ बंधू, थोरले बंधू गणपतराव, पत्‍नी सौ. वेणूताई, काही जवळचे मित्र यांच्यासंबंधी भावनेचे कढ या लेखनात आहेत.  नवीन लग्न करून आलेल्या पत्‍नीला आपण काहीच देऊ शकलो नाही अशी खंत आहे.  याच दुःखातून त्यांनी वेणूताईंना लांब पत्र लिहिले, त्याची नोंद आहे.  पण हे सारे सांगताना यशवंतराव संयम सोडत नाहीत.  वाहवत जात नाहीत.  अथवा, एका वेगळ्या प्रकाराने, 'राजकीय संकटकाळात पुढार्‍याने पत्‍नीला लिहिलेले आगळे पत्र' अशी स्वतःच्या वेगळेपणाची जाहिरातही करीत नाहीत.  मराठी साहित्यात असा अलित्प समतोल दुर्मिळ आहे.  या पुस्तकाचा हा गुण, म्हणूनच, विशेष आल्हाददायक वाटतो.