२२ नोव्हेंबर १९६२ रोजी यशवंतराव दिल्लीत आले तेव्हापासून त्यांचे घर हे दुसरे महाराष्ट्र केंद्र झाले. यशवंतरावांकडे जाणे हा नित्य कार्यक्रम असे. म. म. दत्तो वामन पोतदार यांच्यासारखे विद्वान असोत किंवा महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत असोत, या सर्वांना यशवंतरावांकडे घेऊन जाणे हा एक माझा नित्य कार्यक्रम असे.
दिल्लीत आणि कोठेही शिफारशीवजा काहीही पाहिजे ते होत नाही. अगदी रेल्वे तिकिटापासून लोकसभेच्या निवडणूक तिकिटापर्यंत ! महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या अनेक प्रकरणांची दाद त्याविना लागत नाही. यशवंतरावांची किंवा त्यांचे स्वीय सहायक श्री. श्रीपाद डोंगरे किंवा श्री. राम खांडेकर यांची मदत आणि मागदर्शन घ्यावेच लागे. त्यांनी ती मुक्त हस्ताने दिली. त्यात आनंद मानला. भारत सरकार किंवा कुठलेही सरकार असो ते चालविण्याचे काम माणसे करीत असली तरी ती स्वभावतः निर्गुण, निर्विकार असतात. अशा सरकारशी सामान्य माणसे जेव्हा व्यवहार करतात तेव्हा त्याचा हा थंडपणा डोके गरम करतो. त्यामुळे दिल्लीसारख्या शहरात माणसे वैतागतात. अशा वेळी स्वतःची भाषा बोलणार्या मराठी भाषिकांची मदतीसाठी आठवण होते. दिल्लीत तर राजकीय दबाव असल्याखेरीज काहीच होत नाही. पूर्वी काकासाहेब गाडगिळांचा आणि नंतर यशवंतरावांचा या राजकीय दबावासाठी उपयोग होई. राजकीय दाब हा रक्तदाबासारखा आवश्यक आहे याचा अनुभव दिल्लीत राहिल्यावर येतो.
महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला 'भारत मान्यता' मिळवून देणे हे एक माझे उद्दिष्ट असे. यासाठी मदत करण्यास यशवंतराव सदैव तयार असत. प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपतींकडून केला जाणारा सन्मान हे राष्ट्रमान्यतेचे गमक असते. त्याच्या सूचना राज्य सरकारकरीत असले तरीही केंद्रीय गृहमंत्री म्हणून किंवा महाराष्ट्राचे सामर्थ्यवान प्रतिनिधी म्हणून यशवंतरावांच्या शब्दाला प्रतिष्ठा असे. या बाबतीत अनेक सूचना मी योग्य वेळी करीत असे.
असेच एकदा मला वाटले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' ही पदवी मिळाली तर त्यांच्यासारख्या जिवंत हौतात्म्य जगणार्या महापुरुषाचे ॠण अंशतः फिटू शकेल. एका रात्री मुद्दाम चव्हाणांकडे जाऊन ही कल्पना त्यांना सांगितली. यशवंतरावांनी स्वतःच त्या वेळचे गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांना फोन केला. इतकेच नव्हे तर त्याच रात्री त्यांनासमक्ष भेटून इच्छा प्रदर्शित केली. परंतु दुर्दैव असे की जानेवारी ६६ मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींचे निधन झाले आणि हा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. यशवंतरावांची आर्तता समजावी म्हणून हे उदाहरण दिले.
दिल्लीतील सांस्कृतिक जीवनात मराठी संगीतकार आणि नाटक यांचा ठसा उमटावा असे प्रयत्न महाराष्ट्र परिचय केंद्राने केले. त्या सर्व कार्यक्रमांना यशवंतराव सावर्जून उपस्थित असत. कलावंतांचे समाधान त्यामुळे द्विगुणित होत असे. कलावंतांप्रमाणेच साहित्यिकांच्या भेटी व त्यांची कामेही यशवंतराव करीत. सर्वश्री ग.दि.माडगूळकर, पु.भा. भावे, पु.ल.देशपांडे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस यांची अशीच एक मैफल संस्मरणीय अशी झाली.
दिल्लीतील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे यशवंतराव हे आधारस्तंभ होते. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचे काम करणार्या बृहन्माहाराष्ट्र परिषद, दिल्ली महाराष्ट्रीय शिक्षण संस्था, महाराष्ट्र सांस्कृतिक समिती, दिल्ली दरवाजा व बंडोपंत सरपोतदार आदींच्या उपक्रमांना यशवंतरावांचा आधार असे. मराठी नाटके यशवंतराव आवडीने पाहात असत. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याविषयी होणार्या कार्यक्रमांना उपस्थित राहात. या थोर पुरुषांची जी स्मारके दिल्लीत उभी आहेत त्यामागे यशवंतरावांचे मार्गदर्शन आणि मदत उभी होती. महाराष्ट्र ट्रस्ट नावाचे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जनत करून ती अन्य भाषिकांना समजावून सांगण्यासाठी एक प्रतिष्ठान काढले होते. न्या. गजेंद्रगडकर हे त्याचे अध्यक्ष होते. यशवंतराव त्याचे एक विश्वस्त होते. तसेच १९६५ मध्ये 'स्वाती' नावाचे, दैनिक व नियतकालिके यातून प्रकाशित होणार्या साहित्यातील वेचक लेख, कथा संग्रहित करणारे द्वैमासिक मी सुरू केले होते. प्रा. ल.ग.देव त्याचे संपादक होते. १९६५ मध्ये त्याचा प्रकाशन समारंभ यशवंतरावांच्या हस्तेच झाला. अशा रीतीने महाराष्ट्र संस्कृतीचे दिल्लीतील माहेरघर म्हणजे यशवंतरावांचे घर बनले होते. माहेरवाशीण जशी हक्काने आपल्या घरी वागते तसेच मराठी भाषिक दिल्लीत या घरात वागत असत. यशवंतराव आणि त्यांच्या कार्यालयातील मराठी सेवकवर्ग यांचे मोठेपण इतके 'मोठे' की त्यांना हे कार्य म्हणजे बोजा वाटत नसे.
आता यशवंतरावांचे दिल्लीत स्मारक व्हावयाचे असेल तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवाह राष्ट्रीय प्रवाहात आणून सोडणारेच ते झाले पाहिजे.