यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २६

२६. 'कृष्णाकाठ' - (प्रा. स. शि भावे)

यमुनातीरी लिहिलेले एक अभिजात आत्मचरित्र

कै. श्री. यशवंतराव चव्हाण यांना प्रा. स. शि. भावे यांनी त्यांच्या 'कृष्णाकाठ' या ग्रंथाविषयी आपला सविस्तर अभिप्राय लिहून पाठविला होता.  त्यांना तो आवडला होता.  त्यांना उत्तरदाखल पत्रही पाठविण्याचे ठरविले होते.  तसे त्यांनी श्री. राम खांडेकर यांना सांगितले.  परंतु श्री. भावे यांचा पत्ता मिळू न शकल्यामुळे ते तसेच राहून गेले.  श्री. खांडेकर यांनी हा समीक्षा लेख जपून ठेवला होता.  तो या ग्रंथात समाविष्ट करण्याची श्री. भावे यांनी संमती दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खासदार यशवंतरावजी चव्हाण यांचेसंबंधी मराठी मनात उदंड प्रेम आहे.  त्याचप्रमाणे एक कुतूहलही त्याच मराठी मनात सतत वागत आले आहे.  लोकमान्य टिळकांनंतर मराठी मनावर स्वतःची एक मुद्रा ठसविणारा नेता हे त्यांचे मोठेपण आता इतिहासानेच मान्य केले आहे.  इतिहासात सर्वांत विशाल मराठी मुलूख जेव्हा एका राज्यात एकत्र आला त्या वेळचे पहिले मुख्यमंत्री, येथपासून केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, वित्तमंत्री, परराष्ट्रमंत्री, पहिला अधिकृत विरोधी पक्षनेता... आणि शेवटी उपपंतप्रधान अशी यशाची शिखरे हस्तगत करणार्‍या या नेत्याचा गुणगौरव केवळ महाराष्ट्रात, देशातच नव्हे पण परदेशी अभ्यासक-चिंतकांच्या विश्लेषणालाही झाला आहे.  अगदी आजही, पंतप्रधान म्हणून कोण जबाबदारी पेलू शकेल अशी चर्चा निघते त्या वेळी जी नावे सहज सर्वांच्या मनात येतात, त्यात यशवंतरावांचे नाव अगदी सहज आणि एकमताने घेतले जाते.  गेल्या पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनात यशवंतरावांनी किती श्रेष्ठ दर्जाची मान्यता आणि विश्वसनीयता प्राप्‍त करून घेतली आहे ते अशा प्रकारच्या उत्स्फूर्त मताने उत्तम व्यकत होते.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे या मान्यतेला आणि विश्वसनीयतेला कुतूहलाचे एक अस्तर आहे.  १९५६ साली यशवंतरावांनी छोटे द्वैभाषिक का स्वीकारले ?  पंतप्रधान शास्त्रींच्या आकस्मित निधनानंतर त्यांनी त्याच वेळी सहजसाध्य पंतप्रधानपद का स्वीकारले नाही ?  नंतर तीन वर्षांनी त्यांनी अल्पावधीतच दोन परस्परविरोधी निर्णय घेतले, त्या निर्णयांबरोबर महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ आणि काँग्रेसपक्ष हे दोन्ही उलटसुलट फिरल, हे का झाले ?  १९७५ ते १९८० या काळात त्यांच्या भूमिका वेळोवेळी बदलल्या त्या तशा का बदलल्या ? अगदी अलीकडे 'मुख्य प्रवाहा'त परत येण्याचा निर्णय त्यांनी का घेतला ?  स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारताच्या इतिहासात यशवंतरावांनी नेमकी कोणती कामगिरी (role) बजावजी आहे ? ..... असे कुतूहल माझ्यासारख्या त्यांच्या अनेक चाहत्यांच्या मनामध्ये सतत वसत आलेले आहे.

यशवंतरावांचे माणूस म्हणून जे व्यक्तिमत्त्व आहे, त्या व्यक्तिमत्त्वाने हे कुतूहल थोडे अधिक वाढलेच आहे.  ते पुढारी आहेत, पण सर्वांत कमी बोलणारे पुढारी आहेत.  आधी ते कमी वेळा बोलतील.  पुन्हा जे बोलतील ते कमी बोलतील. दुसर्‍या व्यक्तीविषयी बोलणार नाहीत.  बोलले तरी कुचेष्टेने, निंदाव्यंजक किंवा मूल्यमापनात्मक बोलणार नाहीत.  सामान्यपणे आवाज चढवून किंवा मुठी वळून, बोलणार नाहीत.  आक्रस्ताळेपणा तर नाहीच नाही.  जे वार्ताहर परिषदेत, तेच कार्यकर्त्यांच्या सभेत, तेच जाहीर सभेत.  प्रांजळपणा, मृदू, गोड भाषा, स्वतः सौजन्य ठेवून दुसर्‍यांच्या सौजन्याला आवाहन करण्याची पद्धती.  यामुळे 'साहेबो'चे मत कळते, सौजन्य मनावर ठसते, पण मन कळत नाही.

जे जाहीर तेच खाजगीत.  दुसर्‍याशी खाजगीत बोलतानादेखील यशवंतराव दुसर्‍याच्या अडचणी विचारतील, त्याच्या पाठीवर हात फिरवतील, मायेने दुसर्‍याच्या मनाला ऊब देतील.  पण दुसर्‍याकडून स्वतः अशी ऊब क्वचितच घेतील.  जवळजवळ नाहीच म्हटले तरी चालेल.

यामुळे हे कुतूहल जसे नेता म्हणून, तसे व्यक्ती म्हणूनदेखील आहे.  मी स्वतः त्यांचा चाहता आहे तो माझ्या शाळकरी वयापासून.  माझे वडील व सातारचे साहित्यिक आणि स्वातंत्र्यसैनिक कै. शिवराम गोविंद ऊर्फ राजाभाऊ भावे हे यशवंतरावांचे वडिलधारे राजकीय सहकारी.  त्यांच्यापेक्षा वयाने १३-१४ वर्षांनी वडील.  आमच्या घरी यशवंतराव येत-जात असत.  उभयतांना परस्परांविषयी आदर होता.  माझे वडील १९६७ साली अपघातात वारले.  त्यावेळी यशवंतरावांचे मला दीर्घ पत्र आले.  त्या पत्रात दादांबद्दलची भावना यशवंतरावांनी उत्कटतेने व्यक्त केली आहे.  या घरोब्यामुळे लहानपणापासून मी यशवंतरावांच्या कार्याकडे व व्यक्तित्वाकडे आपुलकीने व आदराने पाहात आलो आहे.  वर उल्लेखिलेले कुतूहलाचे रंग माझ्याही मनात होते-आहेत.