यशवंतराव चव्हाण (29)

खेर मंत्रिमंडळाच्या धोरणासंबंधात मतभेदाचे प्रदर्शन सुरू झाले, वादही बरेच झाले. बहुजन समाजातील हुशार, बुद्धिवादी, कर्तबगार अशा नेत्यांना बाजूला ठेवून भलतीच माणसे मंत्रिमंडळात घेतली असे जेधे, मोरे, काकासाहेब वाघ जाहीरपणे बोलू लागले. शिक्षणातून इंग्रजीची हकालपट्टी करून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावी अशा आशयाचे एक बिल राज्य विधिमंडळात सादर करण्यात आल्यावर बहुजनांचे नेते खवळून उठले. इंग्रजी बंद करून ज्ञानाच्या आमच्या किती पिढ्या बाद करणार असा प्रश्न हे नेते जाहीरपणे विचारू लागले. श्रीमंत वर्ग, अधिकरी वर्ग आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालून इंग्रजीतून शिक्षण देणार, ज्ञानाची कवाडे त्यांना खुली करणार, मग गरिबांच्या मुलांनी, ग्रामीण भागातल्या शेतकर्‍यांच्या-कष्टकरी लोकांच्या मुलांनी काय पाप केले आहे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. ग्रामीण भागातून जे नेतृत्व तयार होत होते त्याची धास्ती घेऊन हा नवा डाव टाकण्यात आला असावा असा ग्रह पक्का होऊ लागला. आपल्याला पुन्हा शे-दीडशे वर्षे मागे ढकलण्यात येत असल्याचे जेधे, मोरे सांगू लागले. काँग्रेसच्या अंगर्तत एक स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला. त्यात शंकरराव मोरे, भाऊसाहेब हिरे, केशवराव जेधे, भाऊसाहेब राऊत, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख आदि मंडळी होती. त्यांच्या बैठका सुरू झाल्या, चर्चा सुरू झाली, दौरे सुरू झाले. जाहीर सभांतून प्रचार सुरू झाला. त्यातच टेनन्सी बिलाची भर पडली. सर्वसामान्य जनतेकडून पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळतोय असे दिसून येताच जेधे-मोरे-जाधव आदि मंडळींनी ''शेतकरी कामगार पक्ष'' नांवाचा वेगळा पक्ष स्थापन करण्याची योजना तयार केली. १९४८ च्या जानेवारी महिन्यात नथूराम गोडसे यांनी दिल्लीत प्रार्थनेच्या वेळी महात्मा गांधींची हत्या केल्यावर महाराष्ट्राच्या काही भागांत जाळपोळ, लुटालुटीचे प्रकार घडले. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद दक्षिण महाराष्ट्रात वर उफाळून आला. लोकांनी राग व चीड व्यक्त केल्यावर नेत्यांनी त्यांना शांत केले. याच काळात मुंबईत भाऊसाहेब राऊतांच्या निवासस्थानी खेर-मोरारजी विरोधी गटाची बैठक झाली. जेधे-मोरे-हिरे-जाधव आदि नेत्यांखेरीज यशवंतराव चव्हाण व पी. के. सावंत तसेच र. के. खाडिलकर हेही उपस्थित होते. काँग्रेसमधून फुटून निघून वेगळा पक्ष काढायचा या योजनेला यशवंतराव चव्हाणांनी विरोध दर्शविला. काँग्रेस अंतर्गत गट स्थापन केल्यावर त्या गटातर्फे ग्रामीण विकासाचे काम करणे शक्य आहे, वेगळी चूल मांडण्याची गरज नाही असे यशवंतरावांनी स्पष्ट सांगितले. नेहरूंसारखे पुरोगामी नेते, समाजवादी विचारांचे नेते असताना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून कशासाठी दूर व्हायचे असाही प्रश्न यशवंतरावांनी विचारला. बरीच चर्चा झाली आणि अंतिम निर्णय न घेता ही बैठक समाप्‍त झाली.

यशवंतरावांच्या जीवनात काँग्रेसपासून अलग होण्याबाबतचा हा पहिला प्रसंग नव्हता तर तिसरा होता. पहिला प्रसंग समाजवादी काँग्रेसच्या वेळी, दुसरा रॉयवाद्यांच्या सान्निध्याचे वेळी आणि तिसरा राऊतांचे निवासस्थानातील वरील चर्चेच्या प्रसंगी. चव्हाणांच्या नकारानंतर जेधे-मोरे गट आणि चव्हाण गट असे दोन गट काँग्रेस आमदारात निर्माण झाले. जेधे-मोरे यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर हिरे-गाडगीळ ही जोडी बहुजन समाजापुढे आली. भाऊसाहेब हिरे यांना बहुजन समाजाचा पाठिंबा होताच. तथापि सर्व समाजाचे नेतृत्व त्यांना पेलवेल की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. शे. का. पक्षाने काँग्रेसला जो हादरा दिला होता त्यातून सांवरण्याकरिता हिरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवून यशवंतरावांनी बहुजन समाजाच्या मनावर हे बिंबविले की काँग्रेसच बहुजनांच्या हिताचे रक्षण करू शकेल, अन्य पक्ष नव्हे. १९४७ साल या दृष्टीने घालमेलीचे गेले. जेधे बाहेर गेल्यानंतर हिरे यांनी गाडगीळांबरोबर काँग्रेसची बाजू सांभाळण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वास यशवंतरावांनी निष्ठापूर्वक साथ दिली. कारण हिरे यांचे काम सोपे नव्हते, अवघड होते. त्यांना एकेकाळच्या आपल्याच नेतृत्वाविरुद्ध सामना द्यावयाचा होता. या कामी हिरे-चव्हाण-घोरपडे यांनी महाराष्ट्रभर दौरे काढून काँग्रेसला सांवरून धरण्याचा जोमाने प्रयत्‍न केला. घोरपडे हे ''सकाळ'' चे संपादक होते, आमदार होते. मोरारजीभाईंचा त्यांच्यावर लोभ होता. कोल्हापुरात त्यांच्या शब्दाला मान होता. भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण या दोन नेत्यांबद्दल त्यांना ममत्व होते, अभिमान होता.