पांच महिने संपल्यावर १९४४ च्या जानेवारीत यशवंतरावांची तुरुंगातून मुक्तता झाली. पुण्याहून ते कराडला गेले.घरी गेल्यावर ते गणपतरावांना आणि इतर कुटुंबियांना भेटले. गणपतरावांची तुरुंगातून मुक्तता झालेली होती. तथापि जेलमधून बाहेर पडताना त्यांनी बरोबर क्षयासारखा आजार आणला होता. दोन-तीन आठवडे घरी मुक्काम केल्यावर यशवंतराव पत्नीसह फलटणला गेले. सातारा जिल्ह्याचे पोलीस त्यांच्या मागावर होते. स्थानबद्धता कायद्याचे वॉरण्ट त्यांना बजावयाचे होते. येरवड्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला. या खेपेला यशवंतरावांना 'ब' वर्ग मिळालेला नव्हता तर 'क' वर्ग देण्यात आलेला होता. 'थर्ड सर्कल' मधील एक बराकीत व्यवस्था केलेली होती. जाधव, लाड आदि कार्यकर्ते याच बराकीत होते. समोरच्या बराकीत ना. ग. गोरे वगैरे मंडळी होती. तीन महिन्यानंतर पॅरोलवर सुटून यशवंतराव बाहेर पडले. पॅरोलची मुदत दोन महिन्यांची होती. गणपतरावांना उपचारासाठी मिरज येथे ठेवण्यात आले. मिरज आणि कराड या दोन्ही ठिकाणच्या खर्चाची जबाबदारी अंगावर येऊन पडल्यावर यशवंतरावांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची स्थानबद्धता मागे घेण्यात आली. वकिली करत असताना यशवंतरावांचे लक्ष 'पत्री सरकार'कडे होते, पत्री सरकार चालविणार्या नेते मंडळींकडे होते. किसन वीर हे भूमिगत चळवळीचे संघटनात्मक प्रमुख म्हणून काम करीत होते. त्यांच्याशी संपर्क साधून यशवंतरावांनी त्यांना सांगितले की, वेगवेगळे गट आणि त्यांच्यातील स्पर्धा टाळायला हवी. लोकांमध्ये चळवळीबद्दल जे चांगले मत झाले आहे त्याला जपा असेही निरोप देण्यात आले.
१९४४ च्या जूनमध्ये महायुद्धाने वेगळे वळण घेतले. युरोपात दुसरी आघाडी उघडली गेली. नॉर्मंडीत उतरविलेले सैन्य पॅरिसच्या दिशेने पुढे सरकू लागले. याचा परिणाम असा झाला की रशियावरील जर्मनीचा दबाव ढिला पडला. रशियन सैन्याने पोलंडमध्ये आणि बाल्कन देशामध्ये मुसंडी मारली. १९४५ साल निर्णायक ठरून युद्धाचा निकाल लागणार असे अंदाज व्यक्त होऊ लागले. पूर्वेकडे जपानची प्रगती रोखली जाऊन दोस्त राष्ट्रांचे मनोधैर्य वाढू लागले होते. अशातच ऍटमबॉम्बने जपानी युद्धाचा शेवट केला. ब्रिटनमध्ये राजकीय क्षेत्रात उलथापालथ झाली. राष्ट्रीय सरकार संपुष्टात आले. ऍटलींनी १९४५ मध्ये राष्ट्रीय सरकार पुढे न चालविता निवडणुका घेण्याचे ठरविले. चर्चिल निवडणुकांना उत्सुक नव्हते. तथापि जुलैमध्ये निवडणुका झाल्या. चर्चिल यांचा पराभव झाला. युद्धकाळात इंग्लंडचे नेतृत्व केलेला नेता पराभूत पक्षाचा नेता ठरला. भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची ठरली. भारतातही निवडणुका होणार असे बोलले जाऊ लागले. ऍटलींनी चर्चेसाठी एक शिष्टमंडळ भारतात पाठविले.