सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळ सशस्त्र चळवळीचे रूप धारण करू लागल्यावर ''पत्री सरकार'' या नांवाने ती ओळखली जाऊ लागली. कार्यकर्त्यांजवळ हत्यारे जमली होती आणि त्यांचा वापर ते सरकारविरुद्ध आणि समाजकंटकांविरुद्ध करू लागले होते. सातारा जिल्ह्यात परतण्याची इच्छा असूनही शक्य न झाल्याने यशवंतरावांनी मुंबई गांठली. मुंबईत वावरणे, कार्यकर्त्यांना भेटून चर्चा करणे शक्य होत असल्याने मुंबई शहर हे चळवळीचे केंद्र बनले होते. किसन वीर मुंबईतच होते. त्यांनी सातारा जिल्ह्यात जाऊन चळवळीवर नजर ठेवावी असे ठरले आणि वीरांनी ते मान्यही केले. यशवंतराव घरातील आजार, अडचणी यामुळे अस्वस्थ झाले होते. सौ. वेणूताईंची तुरुंगातून मुक्तता झाल्यावर त्यांनी आजारी ज्ञानोबांची शुश्रूषा केली. दिराच्या निधनाचा धक्का घेऊन त्या स्वतः आजारी पडल्या. अशक्यता वाढून वरचेवर बेशुद्ध पडण्यापर्यंत मजल गेली. यशवंतरावांनी मुंबई सोडली आणि पुणे गांठले. पत्नीला पुण्याला आणविले. एक-दोन तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविले. निश्चित निदान होत नाही हे लक्षात आल्यावर वेणूताईंना फलटणला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर यशवंतराव पण आजारी पडले. डॉक्टरांनी सांगितले की, पुणे सोडून ग्रामीण भागात राहायला जा. यशवंतराव घोडनदीला गेले आणि तेथे एका सामान्य कुटुंबात दोन आठवडे विश्रांतीसाठी राहिले. पंधरा दिवसांनी पुण्याला परतले. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूमिगत पद्धतीने कसे काम करता येईल याचा विचार यशवंतराव करीत असताना सौ. वेणूताई फारच आजारी असल्याचा निरोप पोहोचला. त्यांनी रात्री भाड्याची टॅक्सी केली आणि पहाटे फलटण गांठले. त्यांच्या आगमनाचा वेणूताईंच्या प्रकृतीवर फार चांगला परिणाम झाला. बर्वे डॉक्टरांनी वेणूताईंच्या आजारावर इलाज करण्याची जबाबदारी स्वीकारल्यावर एक दिवस राहून, रात्री निघून जायचे यशवंतरावांनी मनाशी ठरविले. तथापि दुपारीच फलटणच्या पोलिसांनी सासरे श्री. मोरे यांच्या घराला वेढा घातला. पोलिसांनी यशवंतरावांना अटक करून फलटण संस्थानच्या तुरुंगात टाकले. यशवंतरावांच्या अटकेची बातमी समजताच त्यांची आई कराडहून फलटणला भेटायला आली. मायलेकांची तुरुंगात भेट झाली. आठ-दहा दिवसांनी यशवंतरावांना फलटणहून हलवून सातारा जेलमध्ये बंदिस्त करण्यात आले. त्यांना स्थानबद्ध करावे की त्यांच्यावर खटला भरावा याचा खल अधिकार्यांकडे बरेच दिवस चालू राहिल्याने यशवंतरावांची आणि जिल्ह्यातील कित्येक कार्यकर्त्यांची तुरुंगात भेट होऊ शकली.
यशवंतरावांना सत्याग्रहींच्या संगतीत न ठेवता तुरुंगातील अधिकार्यांनी एका अट्टल दरोडेखोराच्या खोलीत ठेवले होते. त्याचे नांव म्हातारबा रामोशी. गुन्हेगार असूनही माणूस नीटनेटका, टापटीपीत राहणारा, सरळ, स्वच्छ बोलणारा. दरोड्यात स्त्रियांचे अंगावर हात टाकायचा नाही आणि दरोड्यातील मिळकतीपैकी चौथा हिस्सा गोरगरिबांना वाटून टाकायचा हा त्याचा बाणा. म्हातारबांची आणि यशवंतरावांची चांगलीच दोस्ती जमली असे दिसून आल्यावर त्यांना त्या खोलीतून दुसरीकडे हलविण्यात आले. नंतर सातारहून कराडला हलविण्यात आले. तांबवे येथील सभेत भाषण केल्याबद्दल खटला भरण्यात येऊन यशवंतरावांना सहा महिने सक्त मजुरीची राजकीय शिक्षा ठोठावण्यात आली आणि येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. 'बी' वर्गाच्या राजकीय कैद्यांसाठी ज्या राहुट्या बांधलेल्या होत्या त्यापैंकी एका राहुटीत यशवंतरावांना ठेवण्यात आले. स्वामी रामानंद, सदाशिवराव पेंढारकर याच तुरुंगात राजबंदी होते. शेजारी 'अ' वर्गाच्या राजबंद्यांची छावणी होती. आपापसांत चर्चा करणे, पुस्तके वाचणे असा राजबंद्यांचा दिनक्रम असायचा.