मुंबईत तांबे यांच्या आरोग्य भवनमध्ये ३० मार्च, १९४८ रोजी काँग्रेसजनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शे. का. पक्षाला आणि समाजवादी पक्षाला तोंड देऊन काँग्रेसचे ऐक्य कसे राखावयाचे हा या बैठकीचा उद्देश होता. बैठकीला सुमारे ७० ते ८० आमदार हजर होते. बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचा एक धोरणात्मक मसुदा मान्य करण्यात आला. बैठकीसाठी जे पत्रक तयार करण्यात आले होते त्याच्यावर यशवंतराव चव्हाण, स्वामी सहजानंद, बाबासाहेब आखाडकर शिंदे, बाबासाहेब घोरपडे, शिवराम राणे, डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर, अमृतराव रणखांबे आदींच्या सह्या होत्या. काँग्रेस पक्ष हा कुणाशीही वैरभावाने वागणार नाही, काँग्रेसजन हे पक्षाशी निष्ठावंत राहून काँग्रेसचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न करतील असे त्या पत्रकात म्हटले होते. जेधे-मोरे यांच्या आवाहनाला अनुसरून काँग्रेसमधील बहुजन मंडळी गठ्ठ्याने शेकापमध्ये गेली असती तर महाराष्ट्र काँग्रेस पक्ष संपुष्टात आला असता. तथापि यशवंतरावांनी जी वैचारिक भूमिका मांडली, भाऊसाहेब हिरे आदि मंडळींनी काँग्रेससाठी जी पायपिट केली त्यामुळे काँग्रेस पक्ष टिकला, नंतर वाढला व बळकट झाला. यशवंतराव आणि नानासाहेब कुंटे यांनी महाराष्ट्रभर दौरा करून जनतेला वस्तुस्थिती समजावून दिली. काकासाहेब गाडगीळ त्यावेळी मंत्री म्हणून दिल्लीत होते आणि शंकरराव देव घटना समितीत मग्न होते. जेधे-मोरे-दत्ता देशमुख यांच्या प्रचाराला तोंड देण्याची त्यांची तयारी नव्हती असे दिसून आले. १९४८ मध्ये शेकापची स्थापना झाली. महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष कुतुहलाने या पक्षाकडे पाहू लागले. अशा स्थितीत १९५० मध्ये नाशिकला काँग्रेसचे अधिवेशन भरविण्यात आले. भाऊसाहेब हिरे यांच्याकडे स्वागताध्यक्षपद आले आणि त्यांची काँग्रेस वगि कमिटीवर नियुक्ती करण्यात आली. या अधिवेशनामुळे भाऊसाहेबांना पंडित नेहरूंच्याजवळ जाण्याची संधी मिळाली. तथापि ना नेहरूंच्यावर ते प्रभाव पाडू शकले ना वगि कमिटीवर. हिरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून दूर व्हावे यासाठी काही हितसंबंधियांनी प्रयत्न केला. प्रस्थापित नेतृत्वापैकी देव-गाडगीळ-कुंटे यांनी भाऊसाहेबांच्या भोवती कोंडाळे केले. त्यांच्या कमकुवत प्रवृत्तीचा फायदा घेतला. यशवंतरावांनी हा डाव ओळखून, प्रसंगी पडते घेतले आणि भाऊसाहेबांना सांवरून धरले. शंकरराव देवांची मजल तर त्यापुढे गेली. काँग्रेसचे सभासद नसतानाही त्यांनी मागणी केली की, ''यशवंतरावांना काँग्रेसमधून हांकलून द्या.'' देवांनी भाऊसाहेबांचे कान भरविण्याचा खूपच प्रयत्न केला. प्रांताध्यक्षपदासाठी हिरे आणि चव्हाण यांच्यात चुरस लावण्याचा प्रयत्न केला गेला. तथापि यशवंतरावांनी तो डाव उधळून लावला. दिवसेंदिवस भाऊसाहेब हलक्या कानाचे बनत गेले. यशवंतरावांविरुद्ध उघड बोलण्यात, त्यांच्यावर तोंडसुख घेण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
१९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका महाराष्ट्रात मोठ्या हिरिरीने लढविण्यात आल्या. काँग्रेसचा सामना शेकापक्षाशी होता. जेधे-मोरे यांनी शिकस्त केली. तथापि त्यांना बहुमत न मिळता काँग्रेसलाच प्रचंड बहुमत मिळाले. मोरारजीभाई देसाई यांनी मंत्रिमंडळ बनविले. हिरे आणि चव्हाण या दोघांचाही त्यांनी मंत्रिमंडळात समावेश केला. हिरे यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले आणि यशवंतराव चव्हाणांना नागरी पुरवठा, समाज कल्याण आणि वन ही खाती दिली गेली. भाऊसाहेब हिरे यांच्याकडे प्रांताध्यक्षपदही होते. त्यांचा सल्ला न घेता मोरारजीभाईंनी मालोजीराजे नाईक निंबाळकर आणि गणपतराव तपासे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला त्यामुळे भाऊसाहेब चिडले आणि त्यांनी हा प्रश्न धसास लावण्याचे ठरविले. तथापि यशवंतरावांनी त्यांना त्यापासून परावृत्त केले. मुख्यमंत्र्याला आपले सहकारी निवडण्याचा अधिकार असतो हे यशवंतरावांनी हिरे यांना पटवून दिले. शंकरराव मोरे यांनी ''दाभाडी प्रबंध'' सादर केल्यावर शेकापमध्ये धुसफूस सुरू झाली. केशवराव जेधे यांना मोरे यांचे विचार, त्यांची उक्ती व कृती मान्य झाली नाही. काँग्रेसला शर्थीने विरोध करण्यात शेकापने बरेच यश मिळविले होते. तथापि पक्षाला कम्युनिस्टांच्या मार्गाने नेले जात असल्याची शंका बर्याच कार्यकर्त्यांच्या मनात उद्भवली आणि जिल्ह्याजिल्ह्यांतून पक्ष प्रचाराचे आणि प्रसाराचे जे काम जोम धरून चालले होते त्याला खीळ पडली. केशवराव जेधे हे खूपच नाराज झालेले होते. काही काळाने जेधे-जाधव-खाडिलकर-मोरे आदि मंडळी शेकाप बाहेर पडून त्यांनी काँग्रेस पक्षास पुन्हा प्रवेश केला.