यासंबंधी यशवंतरावांनी चंद्रोजी पाटील यांच्याशी चर्चा केली. कामेरीहून यशवंतराव सरळ मोठ्या रस्त्याने कराडला निघाले. डोक्याला फेटा बांधून सायकलवरून त्यांनी कराड गांठले. घरी जावे अशी मनाला ओढ वाटत होती. सरळ घरी गेले आणि आईला भेटले. माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोघा भावांची भेट पण झाली. भूमिगत कार्यकर्ते पोलिसांना सांपडत नव्हते, म्हणून ते चिडल्यासारखे झाले होते. घरी फार वेळ थांबणे धोक्याचे होते म्हणून यशवंतराव सर्वांच्या गांठीभेटीनंतर बाहेर पडले आणि पुढील कामाच्या आंखणीला लागले. यशवंतरावांवर दडपण आणण्यासाठी त्यांचे बंधू गणपतरावांना अटक करून विजापूर तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे घरची परिस्थिती बिकट झाली. डिसेंबरात प्रमुख कार्यकर्ते काले या गांवी एकत्र आले आणि त्यांनी निर्णय घेतला की प्रमुख मंडळींनी सातारा जिल्हा सोडून कांही दिवस बाहेर रहावे. यशवंतरावांनी पुण्याला जायची तयारी दर्शविली. पण जाणार कसे ? मोटारीचे शक्यच नव्हते. रेल्वेने प्रवास करण्याचे ठरवून ते एके रात्री कराड स्टेशनजवळच्या पिकात जाऊन बसले. वेश बदलण्याची खबरदारी घेतली होती. जोधपुरी कोट आणि फरची ऊंच टोपी घातलेल्या चव्हाणांनी गाडी स्टेशनात येताच हातातील बॅगेसह दुसर्या वर्गाच्या डब्यात प्रवेश केला. जवळ तिकीट नव्हतेच. डबा रिकामाच होता. गाडी सुटल्यावर एक माणूस आंत शिरला आणि त्याने तिकिटाची मागणी केली. तो तिकीट तपासनीस नव्हता तर हेड कॉन्स्टेबल होता. त्याने तिकिटाचे पैसे घेऊन रात्रभर यशवंतरावांचे रक्षण केले. पुणे स्टेशनऐवजी घोरपडी स्टेशनवरच यशवंतराव उतरले. पुण्यात दारुवाला पुलानजीक बबनराव गोसावी यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला. दिवसभर घरात थांबायचे आणि रात्री बाहेर पडायचे असा त्यांनी दिनक्रम सुरू केला. १९४३ मधील जानेवारीचे दिवस पुण्यात असे चालले असताना एके दिवशी कराडहून यशवंतरावांना निरोप आला की त्यांची पत्नी वेणूताई यांना अटक करून कराड जेलमध्ये ठेवले आहे. १४ जानेवारीला पहिल्या संक्रांतींच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे यशवंतराव व्यथित झाले. लग्नानंतर पत्नीला अल्पावधित तुरुंगवास घडावा याचा त्यांना विषाद वाटला. सौ. वेणूताईंनी कराड व इस्लामपूर तुरुंगात सहा आठवडे काढले. बंधू गणपतराव तुरुंगात, पत्नी वेणूताई तुरुंगात आणि आपली भूमिगत भटकंती, कुटुंबाचे कसे होणार हा विचार यशवंतरावांना यातना देऊ लागला. गणपतरावांना तुरुंगातून सोडवून आणावे यासाठी यशवंतरावांचे थोरले बंधू श्री. ज्ञानोबा यांनी आपल्या पाठीवरील आवाळूवर शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेनंतर जखमेचे सेप्टिक झाले, त्यातून न्यूमोनिया झाला आणि आठ-दहा दिवसांनी श्री. ज्ञानोबा यांचे निधन झाले. ही बातमी यशवंतरावांना पुण्यात १०-१५ दिवसांनी समजली. त्यांना अतीव दुःख झाले. आईला भेटायला जाण्यासाठी ते तगमग करू लागले.