कराड जवळचे शिरवडे स्टेशन जाळण्याचा कार्यक्रम कासेगांवकर वैद्य यांनी आंखल्यावर सदाशिव पेंढारकर यांच्याकडे त्या कार्यक्रमाचे नेतृत्व देण्यात आले. त्यांनी दहा-पांच निवडक कार्यकर्ते बरोबर घेऊन मोठ्या हिंमतीने कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. यशवंतरावांचे भाचे श्री. बाबूराव कोतवाल यांनी स्टेशन जाळण्याच्या कामात महत्त्वाचा भाग उचलला. त्यावेळी बाबूराव हायस्कूलमध्ये शिकत होते. पोलिसांच्या हातून त्यांच्या बंदुका हिसकावून घेऊन त्या पळवून मग स्टेशनला आग लावण्यात आली. त्या रात्री यशवंतराव हे ओगलेवाडीला व्यंकटराव ओगले यांच्याकडे मुक्कामाला होते. भूमिगत चळवळीतील कार्यकर्त्यांना ओगले यांनी मोलाची मदत केली. भाचा बाबूराव याने लहान वयात धाडसाच्या कार्यक्रमात भाग घेतला याचा यशवंतरावांना अभिमान वाटला. शिरवडे स्टेशन जाळले गेल्यानंतर धरपकडीची मोहीम हाती घेऊन पोलिसांनी धाडी घालण्यास सुरुवात केली. रोज रात्री धाडी पडू लागल्या. लोकांचा छळ सुरू झाला. यशवंतरावांना पकडण्यासाठी पोलिसांनी शिकस्तीचे प्रयत्न सुरू केले. मित्रांनी त्यांना सल्ला दिला की कांही दिवस दूर कोठेतरी जावे. तथापि आपल्या कार्यकर्त्यांच्या रक्षणाची जबाबदारी अंगावर घेतली गेली असल्याने चव्हाण दूर जायचे टाळीत होते. श्री. अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी मुंबईला या असा निरोप पाठविल्यावर मात्र यशवंतराव नोव्हेंबरमध्ये नीलकंठराव कल्याणी यांच्या मोठ्या गाडीतून मुंबईला गेले. मुंबईत सातारा जिल्ह्यातील बरेच कामगार होते. त्यांच्याकडे चव्हाणांची अदलून बदलून राहण्याची व्यवस्था केली गेली. त्यांना अच्युतराव पटवर्धनांना भेटावयाचे होते. पण तो हेतू सफल झाला नाही. एस. एम. जोशी मात्र भेटले. बोहरी मुसलमानाच्या वेशात ते राहायचे आणि मुंबईत वावरावयाचे. अण्णासाहेबांच्या मध्यस्थीतून यशवंतरावांची आणि राम मनोहर लोहिया यांची भेट झाली. लोहियांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील चळवळीची इत्थंभूत बातमी समजत असे. लोहिया बेडरपणे वावरावयाचे. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे कार्यकर्त्यांना चळवळीबाबत मार्गदर्शन करावयाचे. गुप्त बैठका व्हायच्या, कार्यकर्ते मनातील प्रश्न वा कल्पना मोकळेपणाने बोलून दाखवायचे. माहीमच्या बैठकीत उभी पिके जाळण्याच्या प्रस्तावाला यशवंतरावांनी विरोध केला. शेतकर्यांची पिके जाळून त्यांच्याशी कां लढावयाचे आहे असा प्रश्न त्यांनी बैठकीत विचारला. अण्णासाहेबांनी यशवंतरावांच्या विचारांना पाठिंबा दर्शविला. मुंबईतून सातारच्या चळवळीला मदत होत होती. तसेच उत्तर प्रदेश, बिहारला सूचना रवाना केल्या जात होत्या. मुंबईतला मुक्काम संपवून सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी यशवंतराव आतूर झाले होते. तथापि यशवंतरावांना त्यासाठी बर्याच युक्त्या योजाव्या लागल्या. प्रथम ते शिराळ्याला गेले, तेथून चिखलीला. आनंदराव नाईकांच्या मळ्यात दोन दिवस राहिले. तेथून के. डी. पाटलांना भेटण्यासाठी कामेरीला गेले. तेथे त्यांना के. डी. पाटलांकडून समजले की, फरारी गुन्हेगार संघटित होत आहेत. सुरुवातीला या गुन्हेगारांची चळवळीला मदत झाली. नंतर मात्र ते डोईजड होऊ लागले. त्यांना बाजूला करावे, जरूर पडल्यास संघर्ष करावा लागला तरी करावा असा सूर कार्यकर्त्यांच्या चर्चेतून निघाला. सरकार आणि गुन्हेगार या दोन आघाड्यांविरुद्ध लढण्याची कार्यकर्त्यांनी तयारी दर्शविली.