यशवंतराव चव्हाण (13)

१९३२ मध्ये महात्मा गांधींनी जातीय निवाड्याविरुद्ध (कम्युनल ऍवार्ड) आमरण उपोषण सुरू केले.  शेड्यूलकास्टना (दलितांना) स्वतंत्र मतदार संघ देण्याची योजना जाहीर करून ब्रिटिश सत्तेने देशात मतभेदाचे वातावरण निर्माण केले.  एका समाजापासून दुसर्‍या समाजाला दूर करून देशात दुहीचे बीज पेरण्याचा डाव इंग्रजांनी टाकल्याचे गांधीजींच्या लक्षात आले.  मुसलमानांना वेगळा मतदार संघ दिल्याने देशात दुफळीचे वातावरण निर्माण झाले होते याची गांधीजींना पूर्ण कल्पना होती.  त्यांच्या उपोषणामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.  गांधीजींच्या जीवाला धोका आहे असे जाणून मध्यस्थीचे प्रयत्‍न सुरू करण्यात आले.  यशवंतराव या काळात तुरुंगातच होते.  डॉ. आंबेडकरांनी गांधीजींची भेट घ्यावी आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करावी या दृष्टीने प्रयत्‍न सुरू करण्यात आले.  उपोषणासंबंधी तुरुंगात साधकबाधक चर्चा व्हायची.  यशवंतराव या चर्चेत भाग घेऊन सांगायचे की गांधीजींचे प्राण निश्चितपणे वाचवायला हवेत.  पण त्याचबरोबर दलित समाजाच्या वेदना पण समजून घ्यायला हव्यात.  दलितांच्या मनांत राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी या दृष्टीनेही पावले उचलायला हवीत.  डॉ. आंबेडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्वतंत्र मतदार संघाची योजना सोडून दिली.  पुणे करारावर सही केली आणि गांधीजींचे प्राण वाचविण्याची मोलाची कामगिरी केली.  गांधीजी येरवडा जेलमध्ये असताना कॅम्प जेलमधील राजबंद्यांना गांधीजींची भेट घ्यावी, त्यांचेशी खूप बोलावे असे वाटायचे.  जेलच्या प्रमुख अधिकार्‍यांजवळ त्यांनी आपली इच्छा बोलून दाखविली.  गांधीजींशी बोलून तुरुंगाधिकार्‍याने महिन्यातून दोन प्रतिनिधींना गांधीजींना भेटण्याची परवानगी दिली.  या व्यवस्थेत यशवंतरावांचा नंबर काही लागू शकला नाही.  तथापि शेजारच्या तेरा नंबरच्या बराकीत त्यांचे मित्र गौरीहर सिंहासने होते, त्यांचा नंबर लागला.  सिंहासने गांधीजींना भेटून आले.  गांधीजींबरोबर काय बोलणे झाले ते त्यांनी यशवंतरावांना सांगितले.  त्यानंतर यशवंतरावांना येरवड्यावरून विसापूरच्या तुरुंगात नेण्यात आले.  विसापूर जेलची ख्याती वाईट होती.  हवामान वाईट, पाण्याची टंचाई, निर्दय अधिकारी, कष्टप्रद जीवन असा या तुरुंगाचा लौकिक होता.  यशवंतरावांना ज्या बराकीत ठेवण्यात आले होते तेथे बडोद्याचे काँग्रेसचे नेते मगनभाई पटेल होते.  दुसर्‍या बराकीत मुंबईचे स. का. पाटील होते.  कांही दिवसांनी ह. रा. महाजनी यांना पण येरवड्यामधून विसापूरला पाठविण्यात आले.  पाटलांकडे तुरुंगात पुस्तकांचा मोठा संग्रह असायचा.  यशवंतरावांना त्यांची पुस्तके वाचायला मिळायची आणि महाजनींबरोबर चर्चा करण्याची संधी मिळायची.  दिवस भरभर जात असताना १९३३ च्या मे महिन्यात यशवंतरावांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आणि त्यांना दौंडमार्गे पुण्याला जाणार्‍या रेल्वे गाडीत बसवून देण्यात आले.